Tuesday, 14 February 2017


आकाशवाणीऔरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१४ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

जम्मू काश्मीरमधल्या बंदिपुरा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, तर चार जवान जखमी झाले आहेत. या भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच लष्करानं आज पहाटे शोधमोहीम सुरु केली. ही चकमक अजूनही सुरू असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.   

****

राजस्थाना जोधपूर इथं आयोजित सातव्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस कमांडो संघानं पुन्हा एकदा उपविजेते पद पकावलं आहे. या स्पर्धेत राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल- एन एस जी, १७ राज्य पोलीस संघ आणि सात केंद्रिय पोलीस संघटना अशा एकूण २५ संघां ७५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. राजस्थान पोलीस कमांडो संघास प्रथम, तर एन एस जीनं तिसरा क्रमांक मिळवला.

****

अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्षाच्या सरचिटणीस व्ही के शशिकला यांच्याविरोधात सुरू असलेल्या बेहिशोबी संपत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज निर्णय सुनावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चेन्नईत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बीड जिल्हा सहकारी बँकेच्या बेकायदा कर्जवाटप प्रकरणात शिक्षा सुनावलेल्या १६ जणांना अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. या सर्व जणांना ५ वर्ष कारावास आणि प्रत्येकी ६० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता. काल न्यायालयानं त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

****



ज्येष्ठ सतारवादक आणि संगीतकार पंडीत श्रीनिवास केसकर यांचं काल संध्याकाळी पुणे इथं प्रदिर्घ आजारानं निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. पुणे आकाशवाणीवर १९८३ ते १९९५ या काळात ते संगीत दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानेशाची, संत नामदेवांची उत्तर भारत यात्रा, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म अशा अनेक गाजलेल्या संगीतिकांना त्यांनी संगीतबद्ध केलं होतं.

****

कांद्याच्या वाहतुकीसाठी धुळे तसंच नांदगाव इथून रेल्वे वाघिणी उपलब्ध करून देण्याची मागणीसाठी कांदा व्यापारी संघटनेनं मालेगाव तहसीलदार तसंच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनद्वारे काल केली. यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत मुंगसे इथला कांद्याचा लिलाव व्यापाऱ्यांनी बंद ठेवला होता. लिलाव सुरू झाल्यावर शेतकऱ्यांनी सर्व वाहनांमधील कांद्याचा लिलाव पूर्ण होईपर्यंत लिलाव सुरूच ठेवण्यासाठी तसंच योग्य भाव मिळावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केलं.

//*****//

No comments:

Post a Comment