Tuesday, 14 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 February 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ फेब्रुवारी २०१ दुपारी .००वा.

*****

अण्णाद्रमुक पक्षाच्या सरचिटणीस व्ही के शशिकला यांची तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. शशिकला यांना बेहिशेबी संपत्ती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दोषी ठरवत या प्रकरणी शिल्लक असलेली चार वर्ष कारावासाची शिक्षा पूर्ण करण्यासाठी तत्काळ आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले. सुमारे दोन दशकांपासून सुरू असलेल्या या खटल्यात आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत, शशिकला यांच्यासह व्ही एन सुधाकरन आणि अन्य एक जण दोषी असल्याचा निर्णय सुनावला. या निर्णयामुळे पुढची दहा वर्षे कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवण्यास शशिकला अपात्र ठरल्या आहेत.

****

जम्मू काश्मीर मधल्या बंदीपुरा जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले, तर सहा जवान आणि एक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. या परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच लष्करानं आज पहाटेपासून शोधमोहीम सुरु केली. ही चकमक अद्यापही सुरु असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.  

****

पी एस एल व्ही सी ३७ या प्रक्षेपकाद्वारे उद्या एकाचवेळी प्रक्षेपित होणाऱ्या १०४ उपग्रहांच्या प्रक्षेपणाची विपरित गणना आज सकाळी पाच वाजून २८ मिनिटांपासून सुरु झाली. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोट्टा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन उद्या सकाळी नऊ वाजून २८ मिनिटांनी या उपग्रहांचं प्रक्षेपण होणार आहे. कार्टोसॅट-दोन हा यात मुख्य उपग्रह असून त्याचं वजन ७१४ किलो आहे. अन्य १०१ उपग्रह परदेशी आहेत. पी एस एल व्ही प्रक्षेपकाचं हे ३९ वं उड्डाण असेल. एकाचवेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम सध्या रशियाच्या नावावर आहे.

****

अर्थसंकल्पात केलेल्या विविध उपाययोजनांच्या माध्यमातून ग्रामीण जनतेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. बंगळुरु इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. चांगली दळणवळण सुविधा आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या लोकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.  

****

ऑपरेशन क्लीन मनी अंतर्गत प्राप्तीकर विभागानं १८ लाख लोकांना नोटीस बजावली होती, त्यापैकी ५ लाख १७ हजार जणांनी प्राप्तिकर विभागाला उत्तर सादर केलं आहे. या मोहिमेअंतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी उद्यापर्यंत या नोटीसला उत्तर देण्यास, प्राप्तीकर विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****

महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या जाहीर प्रचाराची मुदत आज संपल्यानंतर राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. त्याचप्रमाणे आज रात्री बारा वाजेपासून २१ फेब्रुवारी रोजी मतदान संपेपर्यंत जनमत आणि मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी राहील, असं राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस सहारिया यांनी सांगितलं. मुंबई इथं ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका लागोपाठ होत असल्यानं मतदारांवर होणारा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन हे स्पष्ट करण्यात आल्याचं सहारिया यांनी सांगितलं.

****

ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे सनातन संस्थेचा हात असल्याचा आरोप करत या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे. दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम एम कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरली गेलेली शस्त्रं सारखीच असून गोवा, ठाणे आणि पनवेलच्या स्फोटांमागेही याच संस्थेच्या सदस्यांचा हात असल्याचा संशय आहे, असा आरोप समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलताना केला. 

****

विविध शहरांमध्ये ११ बँकांना फसविणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे. पुणे, औरंगाबाद, नाशिक, पनवेल, चाकण, मंचर, बारामती इत्यादी ठिकाणच्या बँकांमधून या टोळीनं खोटी कागदपत्रं सादर करून वाहन कर्जे घेतली होती. मात्र त्याची परतफेड केली नव्हती. त्यामुळे बँकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

****

महिलांविरूद्धच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांतर्गत औरंगाबाद इथं प्रत्येक पोलीस स्थानकात, ४ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या दामिनी पथक स्थापन करण्याचा निर्णय औरंगाबाद शहर पोलीस विभागानं घेतला आहे. आजपासून ही पथकं कार्यरत करण्यात आली असून, महाविद्यालयं, शाळा आणि गर्दीच्या ठिकाणी ही पथकं गस्त घालणार आहेत.

//******//

No comments:

Post a Comment