Tuesday, 14 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 14 February 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राष्ट्रगीत चित्रपट किंवा माहितीपटाचा भाग असेल तर त्यासाठी उभं राहणं बंधनकारक नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मात्र चित्रपट सुरू होण्यापूर्वी लावण्यात येणाऱ्या राष्ट्रगीतासाठी प्रेक्षकांनी उभं राहावं असं न्यायालयानं सांगितलं आहे.  चित्रपटांदरम्यानही राष्ट्रगीत वाजल्यास उभं राहण्यासंबंधी नियम निश्चित करावे, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रगीतासाठी उभं न राहिल्यास, कारवाई करणारा कोणताही कायदा नसल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी १८ एप्रिलला होणार आहे.

****

मुस्लिम धर्मातल्या तिहेरी तलाकबद्दल फक्त कायदेशीर बाबींचाच विचार केला जाईल, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी १६ फेब्रुवारीला होणार असून, न्यायालयानं सर्व पक्षांना उद्यापर्यंत यासंदर्भात सूचना देण्यास सांगितलं आहे. न्यायालयांना मुस्लिम कायद्याअंतर्गत तलाकच्या मुद्यावर निर्णय घेण्याची परवानगी देण्याबाबत काही निर्देश देणार नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.     

****

सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला मानसिक रुग्णांसाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तर प्रदेशातल्या विविध रुग्णालयांमधून ३०० मनोरुग्णांना उपचार पूर्ण होण्यापूर्वीच घरी सोडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, या रुग्णांवर उपचारासंबंधी नियम जाणून घेण्याची मागणी करणारी याचिका, न्यायालयात दाखल झाली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले.

****

सीमा सुरक्षा दल-बी एस एफच्या जवानांना जम्मूमधल्या सांबा जिल्ह्यात भारत - पाकिस्तान सीमेवर एक भुयार आढळलं आहे. वापर होण्यापूर्वीच हे भुयार आढळल्यानं पाकिस्तानचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला असल्याचं, बी एस एफच्या सूत्रांनी सांगितलं. याआधीही पाकिस्तानकडून अशा भुयारांमार्फत घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

****

समाजातल्या वंचित वर्गातल्या लोकांना जबरदस्तीनं मजूरी करण्यासाठी भाग पाडल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असं केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं मजुरांच्या राष्ट्रीय परिसंवादात ते आज बोलत होते. सध्याच्या कामगार कायद्यांना एकत्रित करुन कामगार संहिता तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

अण्णाद्रमुक पक्षाच्या सरचिटणीस शशिकला यांना, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा सुनावताच त्यांनी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. शशिकला यांच्या मर्जीतील ई पलनीस्वामी यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, पनीरसेल्वम यांच्या गटानं पलनीस्वामी यांचा विधिमंडळ नेतेपदी स्वीकार करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

****

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाचा स्वतंत्र जाहीरमाना आज मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक यांनी मुंबई इथं सादर केला. प्रत्येक किलोमीटरवर शौचालयं उभारण्यात यावी, महिला आणि बालकल्याण विभागाचं स्वतंत्र अंदाज पत्रक असावं, आदी मागण्या करणार असल्याचं नाईक यांनी यावेळी सांगितलं. 

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं “रिसेन्ट ऍडव्हान्सेस इन मॅथेमॅटिक्स” या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप झाला. या दोन दिवसीय परिषदेमध्ये देशभरातून प्राध्यापक, संशोधक तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. विविध विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्यानं तसंच संशोधनपर लेख परिषदेत सादर झाले.

****

गडचिरोली इथं सरकारी कामगार अधिकारी संध्या देवराव पेंदोर यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं ४० हजार रुपये लाच घेताना आज रंगेहात अटक केली. न्यायालयात प्रकरण दाखल न करण्यासाठी पेंदोर यांनी तक्रारकर्त्याकडे ५० हजार रुपये लाच मागितली होती, त्यापैकी चाळीस हजार रुपये लाच घेताना त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली.

****

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुरळीत होईपर्यंत पाकिस्तानशी क्रिकेट संबंध ठेवू नये, असं मत भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अजरुद्दीन यांनी व्यक्त केलं आहे. कोल्हापूर इथं ते आज एका कार्यक्रमात बोलत होते. ग्रामीण भागातल्या चांगल्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शनाची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

****

भारत ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी भारतीय संघ आज जाहीर झाला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यांसाठीच्या या संघातून शिखर धवनला वगळण्यात आलं असून, विराट कोहलीला कर्णधारपदी कायम ठेवण्यात आलं आहे. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघ मुंबईत दाखल झाला असून, मालिकेतला पहिला सामना २३ फेब्रुवारीला पुणे इथं खेळला जाणार आहे.

****

No comments:

Post a Comment