Thursday, 16 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 February 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ फेब्रुवारी २०१ दुपारी .००वा.

*****

मराठवाड्यात आठ जिल्हा परिषदा, ७६ पंचायत समित्यांसाठी सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत सहा पूर्णांक ८९ टक्के, उस्मानाबाद इथं नऊ टक्के, तर परभणी इथं दहा टक्के मतदान झालं. बीड इथं साडे अकरा वाजेपर्यंत ३० टक्के, तर लातूर इथं २० टक्के मतदान झालं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या सहा गावांनी मुलभूत सुविधांसाठी मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला होता, या गावात सकाळपासून कोणीही मतदान केलं नसल्याचं वृत्त आहे. या सहा गावांमध्ये वागदरवाडी, बितनाळ, तुराटी, बोथी, सोनपेठवाडी, पळसवाडीतांडा या गावांचा समावेश आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात पांगरमल इथं बनावट दारूमुळे सहा जणांचा मृत्यू झाल्यानं, इथल्या नागरिकांनी निवडणुकीवर अघोषित बहिष्कार टाकला आहे. सकाळपासून एकही मतदार मतदानासाठी आला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मतदारांसाठी सुटी जाहीर केली असल्यानं हिंगोली बाजार समितीच्या मोंढ्यातील खरेदी-विक्रीचे व्यवहारही आज बंद राहणार आहेत. बाजार समितीच्या वतीनं ही माहिती देण्यात आली.

****

तमिळनाडूमध्ये राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी ऑल इंडिया अण्णा द्रमुक पक्षाचे विधीमंडळ नेते ई. के. पलानिसामी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे. पलानिसामी यांनी आज सकाळी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. आज सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास पलानिसामी शपथग्रहण करण्याची शक्यता आहे. त्यांना १५ दिवसात बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आलं आहे.

****

सर्वोच्च न्यायालयात पाच नवीन न्यायाधिशांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे न्यायालयात न्यायाधिशांची संख्या २८ झाली आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती करण्यात आली.

****

देशात यंदा अन्नधान्याचं उत्पादन सुमारे २७२ दशलक्ष टन इतकं होईल, असा अंदाज कृषी मंत्रालयानं वर्तवला आहे. गहू, तांदूळ, डाळी, कडधान्यं आणि तेलबिया यांचं उत्पादन आधीच्या वर्षाच्या उत्पादनाच्या तुलनेत विक्रमी होणार असल्याचं कृषी मंत्रालयानं आपल्या दुसऱ्या अंदाज पत्रकात म्हटलं आहे. सलग दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा चांगला पाऊस झाल्यानं कृषी उत्पादनात चांगली वाढ झाल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.

****

सरकारनं २०१७-१८ वर्षासाठी गव्हाची खरेदी ३३ दशलक्ष टन इतकी निश्चित केली आहे. यासंदर्भात नवी दिल्ली इथं झालेल्या अन्न सचिवांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

देशातली सुमारे दीड लाख आरोग्य उपकेंद्रं टप्प्याटप्प्यानं आरोग्य केंद्रांमध्ये रुपांतरित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी दिली. नवी दिल्ली इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. मधुमेह आणि विविध कर्करोगांच्या चाचण्या या आरोग्य केंद्रात केल्या जाणार आहेत. असंसर्गजन्य रोगांच्या प्रतिकारासाठी देखील विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आल्याचं नड्डा यांनी यावेळी सांगितलं.

****

कर्मचारी निवृत्ती वेतन निधीनं या वर्षाची “कर्मचारी नोंदणी” सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कर्मचारी निवृत्ती वेतन निधीचे फायदे न मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती स्वेच्छेनं देण्याची संधी आस्थापना मालकांना उपलब्ध होणार आहे. ही मोहीम ३१ मार्च २०१७ दरम्यान कार्यान्वित राहणार आहे.

****

लोकसहभागातून वन, वन्यजीव संवर्धन आणि संरक्षण प्रभावीपणे करण्यासाठी राज्यात वन विभागामार्फत हरित सेना अभियान राबविण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात जास्तीत जास्त विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, महिला बचत गट, पर्यावरण आणि वृक्षप्रेमी नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केलं आहे. लातूर इथं आयोजित वृक्ष लागवड मोहिमेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

****

प्रशासकीय विभागानं २०१७ ते २०१९ या कालावधीमध्ये ५० कोटी वृक्षलागवड संगोपन आणि देखभाल या कार्यक्रमांतर्गत दिलेल्या उद्दिष्टांसंदर्भात नियोजन आराखडा आणि कृती कार्यक्रम तयार केला आहे. याशिवाय ग्रामपंचायतींना पुढील ३ वर्षांसाठी १२ कोटी वृक्षारोपणाचे उद्दीष्ट देण्यात आलं आहे. कालच्या शासनपरिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. जिथे निधीची अडचण असेल त्या ठिकाणी वन आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत मोफत रोप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

//***** //

No comments:

Post a Comment