Saturday, 11 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 February 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ फेब्रुवारी २०१ दुपारी .००वा.

*****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्त्रो येत्या १५ फेब्रुवारीला पी एस एल व्ही सी ३७ या प्रक्षेपकाद्वारे एकाचवेळी १०४ उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजून २८ मिनिटांनी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोट्टा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन या उपग्रहांचं प्रक्षेपण होणार आहे. पृथ्वी निरीक्षण करणाऱ्या मालिकेतील कार्टोसॅट -दोन हा यात मुख्य उपग्रह असून त्याचं वजन ७१४ किलो आहे. अन्य १०१ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहेत. पी एस एल व्ही प्रक्षेपकाचं हे ३९ वं उड्डाण असेल. एकाचवेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम सध्या रशियाच्या नावावर आहे.

****

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचं मतदान आज सुरु आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. १५ जिल्ह्यातल्या ७३ मतदारसंघासाठी ८३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  

****

विमुद्रीकरणानंतर बनवाट नोटांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला असल्याचं अर्थ मंत्रालयानं सांगितलं आहे. संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेता के वी थॉमस यांनी विमुद्रीकरणावर चर्चा करण्यासाठी अर्थ मंत्रालयाच्या सचिवांची बैठक बोलावली होती, त्यात ही माहिती देण्यात आली. विमुद्रीकरणानंतर नऊ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर या कालावधित चार हजार १७२ कोटी रुपये इतकं अघोषित उत्पन्न समोर आलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हत्यारं आणि अंमली पदार्थांची तस्करी थांबवणं, तसंच काळ्या पैशाला आळा घालणं, हाच विमुद्रीकरणाचा मुख्य उद्देश असल्याचं मंत्रालयानं सांगितलं.  

****

तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी राज्यातल्या सध्याच्या राजकीय स्थितीबाबत केंद्र सरकारला कोणताही अहवाल दिला नसल्याचं त्यांच्या कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. माध्यमांनी याबाबत प्रसारित केलेलं वृत्त खरं नसल्याचं राज्यपालांचे प्रधान सचिव रमेशचंद मीणा यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात सत्ताधारी पक्ष अण्णा द्रमुकमधल्या दोन गटात सत्तासंघर्ष सुरु असल्यामुळे राज्यात अनिश्चिततेचं वातावरण आहे. कार्यवाहक मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम आणि पक्षाच्या सरचिटणीस शशिकला यांनी राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेचा दावा केला. राज्यपालांकडून अद्याप याबाबत काही उत्तर आलं नाही. 

****

केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नवी दिल्ली इथं दृष्टीबाधितांसाठीचा ब्रेल भाषेतला नकाशा संच प्रकाशित केला. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत नॅशनल ॲटलास ॲण्ड थिमॅटिक ऑर्गनायझेशननं हा संच तयार केला आहे. देशातल्या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी या संचाचं वितरण केलं जाणार असल्याचं हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितलं. एकूण २० नकाशांचा या संचात समावेश आहे.

****

पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली अर्पण केली आहे. उपाध्याय यांचे सामाजिक सेवेशी संबंधित सिद्धांत लोकांसाठी प्रेरणा असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

ख्यातमान वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी ओडीशातल्या पुरी समुद्र किनाऱ्यावर उभारलेल्या शिल्पाची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे. ४८ पूर्णांक आठ फुट उंचीचं हे शिल्प जगातली सर्वात मोठी कलाकृती असल्याचं गिनिस जागतिक विक्रमाचे स्वप्नील डांगरेकर यांनी म्हटलं आहे. या शिल्पात जागतिक शांततेचा संदेश देण्यात आला असून, यात महात्मा गांधी, गौतम बुद्ध आणि नेल्सन मंडेला यांच्या प्रतिमा आहेत. 

****

भारतीय प्रशासन सेवा - आयएएसचे वरिष्ठ अधिकारी अजय त्यागी यांची भारतीय प्रतिभूती नियामक मंडळ - सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यागी हे सध्या अर्थ मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आहेत. 

****

पुण्याच्या सुशिल माधव न्यास या संस्थेकडून देण्यात येणारा भक्ती सेवा पुरस्कार यंदा सायली गुजर यांना जाहीर झाला आहे. गुजर या अंधशाळेतील आणि अनाथाश्रमातील मुलींना नृत्याचे मोफत शिक्षण देण्याचं काम करतात. संस्थेचा संस्कृत साधना पुरस्कार चंद्रपूरच्या रशिद शेख यांना जाहीर झाला आहे.  

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर पालिकेच्या वतीनं नळाद्वारे २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ आज करण्यात येणार आहे. यासाठी सदरील भागात नळांना मीटर बसविण्याचे अंतिम काम युद्धपातळीवर सुरू आहे. याआधी पहिल्या टप्याचा शुभारंभ परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला.

//*******//

No comments:

Post a Comment