Saturday, 11 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      विजेपासून वंचित ३० कोटींहून अधिक जनतेला वीजपुरवठा करणं हे मोठं आव्हान - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

·      महिला सक्षमीकरण विधेयक लवकरात लवकर संमत करण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न

·      ाहनचोरांच्या आंतरराज्यीय टोळीतल्या दोन जणांना जालना पोलिसांकडून अटक

·      दृष्टीबाधितांसाठीच्या दुसऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश   

आणि

·      हैदराबाद कसोटीत विराट कोहलीचं द्विशतक; सलग चार कसोटी मालिकेत द्विशतकं झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू

****

देशात विजेपासून वंचित असलेल्या ३० कोटींहून अधिक जनतेला वीजपुरवठा करणं हे मोठं आव्हान असल्याचं, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. काल दिल्लीत प्रेसिडेंस्ट्स इस्टेटमध्ये सौरऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. विकासासाठी विजेची गरज असल्यानं, उर्जासंवर्धन करणं आवश्यक आहे, ऊर्जेचा पुनर्वापर हवामानासाठी योग्य असून त्यामुळे प्रदूषण कमी होतं, असंही राष्ट्रपती म्हणाले.

****

महिला सक्षमीकरण विधेयक लवकरात लवकर संमत करण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. आंध्रप्रदेशातल्या अमरावती इथं आयोजित राष्ट्रीय महिला संसद परिषदेत ते काल बोलत होते. या परिषदे संसदेसह सर्व राज्य विधिमंडळातील महिला लोकप्रतिनिधी तसंच देशभरातून उच्च शिक्षण घेणारे महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत.

****

सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे मिळणाऱ्या अनुदानित धान्यासाठी आता आधारकार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे. सरकारनं आधार क्रमांक नोंदणीसाठी ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

****

भिवंडीत रिक्षाचालकांच्या मारहाणीनंतर एसटीचालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत. रिक्षा चालकांच्या मुजोरीला आळा घालण्यासाठी विशेष मोहिम राबवली जाणार असून, बोगस परवाने तसंच परवाने नसलेल्या रिक्षा चालकांच्या रिक्षा जप्त करण्याचे आदेशही रावते यांनी दिले आहे.

भिवंडीतल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल ठाणे इथं राज्य परिवहन महामंडळाच्या दोन्ही आगारातल्या वाहक आणि चालकांनी बंद पुकारला होता. मराठवाड्यासह राज्यातही अनेक ठिकाणी एसटीच्या चालक वाहकांनी काही अंशी बंद पाळल्यानं, प्रवासी वाहतुक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती.

****

मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकरांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ५ कोटी २२ लाख रूपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या कर्जाची परतफेड करण्यासाठी एकूण १७१ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. यापैकी ६५ कोटी रुपये निधी गेल्या मार्चअखेरपर्यंत वितरित करण्यात आला होता.

****

यंदाचा मराठी भाषा गौरव दिन ‘संगणक आणि महाजालावरील मराठी’ या संकल्पनेवर साजरा केला जाणार आहे. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांची जयंती २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देवनागरी लिपीत एक परिच्छेद विकिपीडियावर टंकलिखित करावा, असं आवाहन मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे.

****

सर्व विद्यापीठांमध्ये हुतात्मा जवानांच्या पाल्यांसाठी काही जागा आरक्षित असाव्यात, अशी मागणी प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी केली आहे. पौडवाल यांच्या संगीत क्षेत्रातल्या योगदानाबद्दल राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते येत्या अठरा तारखेला पौडवाल यांचा गौरव होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. या सत्कार सोहळ्यात सूर्योदय फाउंडेशनच्या वतीनं पाच हुतात्म्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत दिली जाणार असल्याचं, पौडवाल यांनी सांगितलं.

****

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केल्या जात आहेत, हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

ाहनचोरांच्या एका आंतरराज्‍यीय टोळीतल्या दोन जणांना जालना पोलिसांनी हैदराबाद इथून जेरबंद केलं आहे. त्यांच्या ताब्यातून तीस लाख रुपये किमतीच्या दोन इनोव्हा गाड्याही हस्तगत करण्यात आल्या असून, त्यापैकी एक गाडी मुंबई विमानतळावरून, तर दुसरी गाडी  जळगाव जिल्ह्यात जामनेर इथून पळवलेली आहे. या टोळीचं जाळ अनेक राज्यात असल्याची शक्यता असून, अधिक तपास सुरू असल्याचं, जालना पोलिसांकडून सांगण्यात आलं.

****

दृष्टीबाधितांसाठीच्या दुसऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हैदराबादमध्ये काल झालेल्या उपांत्य सामन्यात, भारतानं श्रीलंकेचा दहा गडी राखून पराभव केला. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर १७५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सलामीवीर प्रकाशनं ११५ तर अजयकुमार रेड्डीनं ५१ धावांची खेळी करत तेराव्या षटकातच हे लक्ष्य साध्य केलं. उपांत्य फेरीचा दुसरा सामना आज पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये होणार असून अंतिम सामना उद्या  बंगळुरु इथं चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

****

भारत आणि बांग्लादेश दरम्यान हैदराबाद इथं सुरू असलेल्या कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसाअखेर बांग्लादेशच्या १४ षटकात एक बाद ४१ धावा झाल्या. त्यापूर्वी भारतानं आपला पहिला डाव ६८७ धावांवर घोषित केला. भारताकडून कर्णधार विराट कोहलीनं २०४, मुरली विजयनं १०८, रिद्धीमान सहानं नाबाद १०६, चेतेश्वर पुजारानं ८३ आणि अजिंक्य रहाणेनं ८२ धावा केल्या. कर्णधार विराट कोहली हा सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

****

युवकांनी यश आणि अपयशाचा हसतमुखानं स्वीकार करावा, असं प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर इथं ३२ व्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ते काल बोलत होते. श्रीमंत शाहु छत्रपती महाराजांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्धाटन झालं. देशभरातून ७७ विद्यापीठांचे संघ या महोत्सवात सहभागी झाले आहेत.

****

उस्मानाबाद इथं होणाऱ्या सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचा काल मुंबईत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते मोहन जोशी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. येत्या ७ ते ९ एप्रिल दरम्यान आयोजित या संमेलनात विविध विषयांवरचे परिसंवाद, लावणीसह लोककला आदी कार्यक्रम होणार असून, नाट्यरसिकांना उन्हाची झळ बसू नये, यासाठी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात हे कार्यक्रम सादर होणार आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं पुढच्या महिन्यात होणाऱ्या नाथषष्ठी सोहळ्यात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशा सूचना औरंगाबादच्या जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी दिल्या आहेत. पैठण इथं आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. दरम्यान, पैठण नगर परिषदेतर्फे राबवण्यात आलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील लाभार्थींशी जिल्हाधिकारी पांडेय यांनी प्रत्यक्ष चर्चा केली. 

****

स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनुदान उचलूनही स्वच्छता गृह न बांधणाऱ्यांवर लातूर महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे. सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांच्या पथकानं दोन वसाहतीत केलेल्या सर्वेक्षणात ३५ लाभार्थींनी स्वच्छता गृह बांधली नसल्याचं निदर्शनास आलं. या पैकी ३० जणांनी स्वच्छतागृह बांधण्याचं शपथपत्र सादर केलं. मात्र पाच जणांनी टाळाटाळ केल्यानं, त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

****

नांदेड जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयांमध्ये आज राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण सात हजार ९६१ प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. संबंधित पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून करण्यात आलं आहे.

****

बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काल धारुर आणि वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, निवडणूक निरीक्षक पी एल सोरमारे आजपासून बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते आष्टी, पाटोदा, धारूर आणि केज या तालुक्यांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांनी मतदान प्रक्रियेबाबत काही अडचणी असल्यास, प्रशासनाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

//*******//

No comments:

Post a Comment