Monday, 20 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 20 February 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारत आणि आसियान राष्ट्रांमध्ये डिजिटल संपर्क व्यवस्था वाढवण्याला भारताचं प्राधान्य असल्याचं, दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी म्हटलं आहे. दक्षिण पूर्व आशियाई देश - आसियान आणि भारताच्या संबंधांना २५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आज नवी दिल्ली इथं भारत आणि आसियान राष्ट्रांच्या दूरसंचार मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारत दूरसंचार उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं ते म्हणाले. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत बांग्लादेश, कंबोडिया, लाओस, इंडोनेशिया आणि भूतानचे दूरसंचार मंत्री सहभागी झाले आहेत.

****

मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या प्रत्यर्पणासंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं इंग्लंडमधील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. प्रत्यर्पणासंदर्भात मुंबई विशेष न्यायालयाच्या निर्णयासह आवश्यक कागदपत्रं गृहमंत्रालयानं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला सादर केली. काळा पैसा नियमित करून घेण्यासंदर्भात सक्तवसुली संचालनालयानं न्यायालयाकडे मल्ल्या याच्या प्रत्यर्पणाची मागणी केली होती.

****

तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री ई पलानीसामी यांनी राज्यातली ५०० दारूची दुकानं तत्काळ बंद करण्याची घोषणा केली आहे. पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच पाच लोककल्याणकारी घोषणा केल्या. या घोषणांचा पक्षाच्या वचननाम्यात समावेश होता.  

दरम्यान, विरोधी पक्ष डीएमकेनं राज्य विधानसभेत शनिवारी संमत झालेला विश्वास मत ठराव रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वे येत्या काही दिवसांत आपल्या दहा रेल्वे स्थानकांवर डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करून देणार आहे. आज काचिगुडा रेल्वे स्थानकावर या सुविधेला प्रारंभ करताना विभागीय महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी ही माहिती दिली. 

****

राज्यातल्या दहा महापालिकांसह दुसऱ्या टप्प्यातल्या अकरा जिल्हा परिषदांसाठी उद्या मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्यासह मतदान केंद्र अधिकारी तसंच कर्मचारी आज मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत. उद्या सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही टप्प्यातल्या मतदानाची एकत्रित मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे. 

****

वनहक्क कायदा अस्तित्वात येऊन दहा वर्ष झाली, तरी आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी ढिसाळ असल्याची तक्रार करत, आदिवासी समाजाच्या वतीनं नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकसंघर्ष मोर्चा काढण्यात आला. आदिवासींची वनहक्क दाव्यांची प्रकरणं अद्यापही प्रलंबित आहेत, याबाबतीत ठोस कारवाई होईपर्यंत, जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाण मांडून बसणार असल्याचा निर्धार, मोर्चेकऱ्यांनी केला आहे. 

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या पांगरमल इथल्या दारुकांडातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, या आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि या प्रकरणी उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी या मागण्यासाठी पांगरमल ग्रामस्थांनी आज पांढरीपूल इथं रस्ता रोको आंदोलन केलं. यामुळे नगर औरंगाबाद रस्त्यावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्या मध्यस्तीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

****

थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी आज धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाची वीज जोडणी कापण्यात आली. गेल्या वर्षभराचं चार लाख ७७ हजार रुपये वीज देयक थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातल्या वीज देयकं थकवणाऱ्या इतरही कार्यालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं, वीज वितरणकडून सांगण्यात आलं.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा एकोणिसावा दीक्षान्त समारंभ येत्या रविवार २६ फेब्रुवारीला होणार आहे. या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून राज्यपाल तथा कुलपति सी विद्यासागर राव तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या वतीनं पवार यांना डी लिट ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या दीक्षान्त समारंभात २४२ विद्यार्थ्यांना पीएच.डी. तर ११ हजार ८१२ विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रदान करण्यात येणार आहे.

****

इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वासाठी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला साडे चौदा कोटी रुपयांत पुणे सुपरजायंट्स संघानं करारबद्ध केलं आहे. आज बंगळुरू इथं ही प्रक्रिया पार पडली. इंग्लंडच्या इयॉन मॉर्गनला किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं दोन कोटी रुपयात करारबद्ध केलं आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघानं श्रीलंकेच्या अॅंजलो मॅथ्यूजला दोन कोटी रुपयात, न्यूझीलंडच्या कोरी अॅडरसनला एक कोटी रुपयात तर दक्षिण आफ्रिकेच्या कॅगिसो रबाडाला पाच कोटी रुपयांत करारबद्ध केलं. हैदराबाद संघानं अफगाणीस्तानच्या मोहम्मद नाबी या खेळाडूला करारबद्ध केलं आहे. आयपीएल स्पर्धेत समाविष्ट होणारा तो पहिलाच अफगाण क्रिकेटपटू आहे.

****

No comments:

Post a Comment