Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 February 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० फेब्रुवारी २०१७ दुपारी १.००वा.
*****
लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेचा हाफीज सईद
आणि त्याच्या दहशतवादी संघटनांविरोधात जागतिक स्तरावर प्रभावी कारवाई करणं आवश्यक असल्याचं,
परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार
असलेला हाफीज सईद जागतिक पातळीवरचा दहशतवादी असून, पाकिस्तानच्या शेजारी देशात दहशतवाद
भडकवण्यात त्याचा मोठा हात असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलताना
सांगितलं.
****
दक्षिण पूर्व आशियाई देश - आसियान आणि भारताच्या संबंधांना
२५ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल आज नवी दिल्ली इथं भारत आणि आसियान राष्ट्रांच्या दूरसंचार
मंत्र्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा भारताचं
प्रतिनिधीत्व करत आहेत. बांग्लादेश, कंबोडिया, लाओस, इंडोनेशिया आणि
भूतानचे दूरसंचार मंत्री, या बैठकीत सहभागी झाले आहेत. भारत आणि आसियान राष्ट्रांमध्ये
डिजिटल भागीदारीवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
****
तामिळनाडूचे राज्यपाल सी विद्यासागर राव
यांनी शनिवारी राज्य विधानसभेत विश्वास प्रस्तावादरम्यान झालेल्या घटनांचा विस्तृत
तपशील मागवला आहे. मुख्यमंत्री ई पलानीसामी यांचा विश्वास दर्शक प्रस्ताव संमत होण्याआधी
सभागृहात झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी विधानसभेच्या महासचिवांना
संपूर्ण घटनाक्रमाचा तपशील देण्यास सांगितलं आहे.
****
नागालँडचे मुख्यमंत्री टी. आर. जेलियांग यांनी काल राजीनामा
दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी आज सत्ताधारी पक्ष नागा पीपल्स फ्रंट - एन पी
एफ च्या विधिमंडळ सदस्यांची बैठक झाली. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिला आरक्षणाच्या
मुद्यावरून जेलियांग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपाल पी.बी.आचार्य
यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. मात्र, त्यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत पदावर
कायम राहण्यास सांगितलं. सत्ताधारी एन पी एफ च्या ४० आमदारांनी मुख्यमंत्री जेलियांग
यांना हटवून नाईफ्यू रियो यांना मुख्यमंत्री बनवण्याची याआधीच मागणी केली होती.
****
अरुणाचल प्रदेश आणि मिझोरामचा आज राज्य स्थापना दिन साजरा होत आहे. यानिमित्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही राज्यांनी
जलद गतीनं विकास साधल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ फेब्रुवारीला आकाशवाणीवरील
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा
हा २९वा भाग असेल. या कार्यक्रमांसाठी नागरिकांना आपल्या सूचना आणि विचार परवा २२ फेब्रुवारीपर्यंत
नरेंद्र मोदी ॲप वर किंवा माय जीओव्ही ओपन फोरम वर, तसंच एक आठ शून्य शून्य एक एक सात
आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर पाठवता येणार आहेत.
****
चाकोरीच्या बाहेर जाऊन तरूणांनी विचार करावा, असं आवाहन केंद्रीय
मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. पुणे इथं अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांसाठी
नव्या कल्पना आणि तंत्रज्ञानविषयक स्पर्धेच्या बक्षिस समारंभात ते बोलत होते. नव्या
कल्पनांच्या मदतीनंच देश प्रगतीपथावर जाऊ शकेल, असं ते यावेळी म्हणाले.
****
वाशिम जिल्ह्यात कर्तव्यात कसूर करणाऱ्या सहा ग्रामसेवकांना
कारागृहात बंद करण्याची शिक्षा जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी दिली होती. त्याप्रमाणे
स्थानिक गुन्हे शाखेनं तीन ग्रामसेवकांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी कारागृहात केली
आहे. उर्वरीत तीन ग्रामसेवक फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
****
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी
आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. पानसरे, दाभोलकर,
कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा तपास लवकरात लवकर लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नायगाव शाखेच्या वतीनं काढण्यात आलेल्या या मॉर्निंग
वॉकमध्ये शाखा सचिव भाऊराव मोरे यांच्यासह अनेक जबाबदार नागरिक सहभागी झाले होते.
****
पाकिस्तान क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू
शाहिद अफ्रिदीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. एकदिवसीय आणि
कसोटी क्रिकेटमधून त्यानं याआधीच निवृत्ती घेतली होती. अफ्रिदीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये
२८ कसोटी सामन्यात एक हजार १७६ धावा आणि ४८ बळी तर ३९८ एकदिवसीय सामन्यात आठ हजार ६४
धावा आणि ३९५ बळी घेतले. ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अफ्रिदीने ९८ सामने खेळत एक
हजार ४५ धावा केल्या आणि ९७ बळी घेतले आहेत.
//*******//
No comments:
Post a Comment