Monday, 6 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 06 February 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ फेब्रुवारी २०१ दुपारी .००वा.

*****

माजी केंद्रीय मंत्री खासदार ई अहमद यांच्या निधनानंतर सरकारच्या भूमिकेवर निषेध आक्षेप घेत काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज आज सकाळी सुरू होताच, अवघ्या काही मिनिटांतच बारा वाजेपर्यंत स्थगित झालं. लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज सुरू करताच, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हौद्यासमोर उतरून घोषणाबाजी सुरू केल्यानं, अध्यक्षांनी कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू झाली, त्यानंतरही विरोधी सदस्यांकडून घोषणाबाजी सुरू होती.

दरम्यान, आज सकाळी संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी याच मुद्यावरून संसद परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निदर्शनं केली. काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस तसंच तृणमूल काँग्रेस पक्षाचे सदस्य या निदर्शनात सहभागी झाले होते.

या निदर्शनानंतर गांधीजींच्या पुतळ्याजवळ एक बेवारस बॅग आढळली. सुरक्षा रक्षकांनी तत्काळ ही बॅग ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्यात काहीही संशयास्पद वा आक्षेपार्ह साहित्य नसल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जम्मू काश्मीरमधल्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं आज शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी सैन्यानं आज सकाळी दोन वेळा गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा केला. भारतीय सैन्यानं या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं, मात्र या चकमकीत कोणीही जखमी झालं नसल्याचं सीमा सुरक्षा बलाच्या जवानांनी सांगितलं.   

****

एका जनहित याचिकेला निर्धारित वेळेत उत्तर न दिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारवर तीस हजार रुपये दंड ठोठावला आहे. जम्मू काश्मीरमध्ये बहुसंख्याक असलेल्या मुस्लीम समाजानं अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेतल्यासंदर्भात ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, मोबाईल फोन वापरणाऱ्या नागरिकांची ओळख पटवण्यासंदर्भात येत्या वर्षभरात एक प्रभावी यंत्रणा कार्यान्वीत करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत.

****

तामिळनाडूचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी ओ पनीरसेल्वम यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला असून, नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत पनीरसेल्वम यांना कामकाज सांभाळण्यास सांगितलं आहे. सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाच्या महासचिव शशिकला नटराजन यांची विधीमंडळ नेत्या म्हणून निवड झाली असून, लवकरच त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.  

दरम्यान, पक्षाच्या या निर्णयामुळे विविध स्तरावरुन संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. प्रमुख विरोधी पक्ष द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी या निर्णयावर टीका करत, हा नागरिकांचा विश्वासघात असल्याचं म्हटलं आहे. 

****

उच्च आणि माध्यमिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा - एन टी ए स्थापन करणार आहे. शिक्षण प्रणालीत सुधारणा आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षांचं आयोजन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ करतं, यात दर महिन्यात १० लाख विद्यार्थी सहभागी होतात. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा सुरवातीला आय आय टी, एन आय टी आणि विद्यापीठांच्या आणि त्यानंतर माध्यमिक स्तरावरील परीक्षा आयोजित करणार आहे.

****

परवानगी नसताना सभा घेतल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातल्या कळवा मुंब्रा इथले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर निवडणूक आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. काल सायंकाळी चार वाजता आव्हाड यांनी मुंब्रा इथं एक प्रचार सभा घेतली, मात्र या सभेसाठी निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी न घेतल्यानं, ही कारवाई करण्यात आल्याचं, युएनआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नव्या प्रशासक मंडळानं माजी अध्यक्ष तसंच सचिवांची कार्यालयं बंद केली आहेत. या कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रशासक मंडळानं संपुष्टात आणल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पुणे इथं सुरु असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत भारतामं न्यूझीलंडवर चार-एक अशी मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. या लढतीत सुरवातीचे एकेरीचे दोन्ही सामने भारतानं जिंकले, तर दुहेरीची एक लढत जिंकून न्यूझीलंडनं आपलं आव्हान कायम राखलं होतं. काल झालेल्या परतीच्या एकेरीच्या पहिल्या लढतीत रामकुमार रामानाथन यानं फिन टिआर्निवर ७ - ५, ६ - १, ६ - १ अशी मात केली, तर दुसऱ्या लढतीत युकी भांबरीनं जोस स्टेथमचा ७ - ५, ३ - ६, ६ - ४ असा पराभव केला. 

//********//

No comments:

Post a Comment