Monday, 6 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 6 February 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ६ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

संसदेत आज दोन्ही सदनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. लोकसभेत सकाळी ई अहमद यांच्या निधनाच्या मुद्यावरून झालेल्या गोंधळानंतर सदनाचं कामकाज एकदा स्थगित झालं. त्यानंतर मात्र चर्चा सुरळीत सुरू झाली. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय, बिजू जनता दलाचे भर्तृहरी महताब, शिवसेनेचे आनंद अडसुळ यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

****

सरकार ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आधार नोंदणी करण्याची मुदत वाढवण्याची शक्यता आहे. ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. मनरेगा अंतर्गत आधार नोंदणी करण्यासाठी सरकारनं ३१ मार्च ही अंतिम तारीख निश्चित केली होती. मात्र आधार कार्ड काढण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला काही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांनी मांडला. यावर ही मुदत वाढवण्याचा सरकार विचार करेल, असं तोमर यांनी सांगितलं. मनरेगा अंतर्गत काम करण्यासाठी अद्याप आधार कार्ड अनिवार्य केलं नसल्याचंही तोमर यांनी स्पष्ट केलं.  

****

दिल्लीतल्या लाल किल्यात मोठ्या प्रमाणावर रायफल्सची काडतुसे आणि काही हातबॉम्ब आढळले आहेत. या स्फोटकांची मुदत संपलेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुरातत्व विभागाकडून साफसफाईचं काम सुरू असताना एका अडगळीच्या कोपऱ्यात ही काडतुसं आणि स्फोटकं आढळली.

****

तीन वेळा तलाक मुद्याचं कोणत्याही राजकीय पक्षानं राजकारण करु नये, असं आवाहन केंद्रीय मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. संसद परिसरात ते आज वार्ताहरांशी बोलत होते. या मुद्यावर कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन देत नायडू यांनी, मुस्लिम महिलांना समाजात समान हक्क मिळाला पाहिजे, असं मत व्यक्त केलं.    

****

राज्यात सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी तीन ठिकाणी तंत्रज्ञान सहायित गुन्हे अन्वेषण केंद्र स्थापन करण्यास, गृह विभागानं प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय गृह विभागाने नुकताच प्रसिध्द केला. पुण्यात गुन्हे अन्वेषण विभाग तसंच महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी इथं आणि मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागात ही केंद्रं स्थापन होणार आहेत. 

****

आगामी जिल्हा परिषद तसंच पंचायत समिती निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या मतदारसंघात निवडणूक साहित्यासह मतदान कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी वाहतुकीसाठी २ हेलिकॉप्टर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १६ आणि २१ फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. जिल्ह्यातल्या अतिदुर्गम तसंच नक्षलग्रस्त भागासाठी हेलिकॉप्टर सेवा पुरवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

****

परभणी जिल्ह्यात वॉटरग्रीड योजना लवकरच सुरु करणार असल्याचं पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातल्या मौजे राणी सावरगाव इथं ते आज बोलत होते. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांतल्या चार महानगरपालिका, ५० नगरपालिका आणि २५ नगरपंचायतींमध्ये ४६ पूर्णांक ५२ टी एम सी पाण्याचं नियोजन वॉटर ग्रीडच्या माध्यमातून केलं जाणार असल्याचं, लोणीकर यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातल्या ४० टक्के गावांसाठी ही योजना राबवली जाणार असून, वाटूर-मंठा -जिंतूर -परभणी या मार्गासाठी ४५० कोटी रुपये निधीची तरतूद केली असल्याचं ते म्हणाले.

****

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून डी लिट पदवी जाहीर झाली आहे. मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश भोंडे यांनी आज नाशिक इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.

****

मनमाड -धुळे -इंदूर रेल्वे मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी ही माहिती दिली. या रेल्वेमार्गासाठी रेल्वे मंत्रालयासोबत जहाज बांधणी मंत्रालय संयुक्त करार करून ५०-५० टक्के खर्च केला जाणार आहे. याबाबतचे प्राथमिक टप्पे पूर्ण झाले असल्याचं भामरे यांनी सांगितलं.

****

राज्य शासनातर्फे पाच फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारीपर्यंत मौखिक आरोग्य सप्ताह पाळण्यात येत आहे. यानिमित्त औरंगाबादच्या शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातर्फे आज जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. घाटी रुग्णालय परिसरातून निघालेली ही फेरी सिद्धार्थ उद्यानात विसर्जित झाली. यात महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी तसंच घाटीचे कर्मचारी सहभागी झाले होते.

****

अहमदनगर जिल्ह्यात आष्टी नगर रस्त्यावर वटनवाडी जवळ दूचाकी आणि कंटेनरच्या झालेल्या अपघातात अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक संदीप तागड आणि त्यांची पत्नी जागीच ठार झाले. आज पहाटे अपघात झाला. यात त्यांची दोन मुलं गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

****

No comments:

Post a Comment