Saturday, 4 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 04.03.2017 10.00am


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०४ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचं आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. उत्तर प्रदेशात सात जिल्ह्यातल्या ४९ मतदारसंघासाठी हे मतदान होत असून, ६३ महिलांसह ६३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर मणिपूरमध्ये सहा जिल्ह्यातल्या ३८ मतदारसंघासाठी मतदान होत असून, सात महिलांसह १६८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उत्तर प्रदेशात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तर मणिपूरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे.

****

न्हाळ्यात पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन, औरंगाबाद तसंच फुलंब्री तालुक्यात बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामं मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सूचना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केल्या आहेत. औरंगाबाद इथं यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाअंतर्गत मंजूर झालेल्या विहीरींवर पंप बसवण्याचं, नवीन विहीरी खोदण्याचं तसंच जलशुद्धीकरणाची कामं तत्परतेनं करण्याचे निर्देशही बागडे यांनी यावेळी दिले.

****

अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यातल्या महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना खरपुडे, पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले, भानुदास बांदल या तिघांना निलंबित करण्यात आलं असून एक पोलीस निरीक्षक तसंच सहा पोलीस कर्मचारी यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी ही कारवाई केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला आणि बालकांच्या विकासासाठी काम करणारी युनिसेफ ही संस्था तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीनं आज शनिवारी ‘मराठवाडा आमदार गोलमेज़ परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आज सकाळी साडेदहा वाजता या परिषदेचं उद्घाटन होणार आहे.

विद्यापीठातल्या मुख्य इमारतीतील व्यवस्थापन कक्षात होणाऱ्या या परिषदे मराठवाड्यातल्या आमदारांच्या उपस्थितीत सर्वांसाठी आरोग्य आणि सर्वांसाठी शिक्षण यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

****

No comments:

Post a Comment