Sunday, 12 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 12.03.2017 10.00am


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१२ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं होणार आहे. बहुमत मिळालेल्या राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांची नावं निश्चित करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. पक्षानं उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तीन चतुर्थांश बहुमत मिळवलं आहे. इथल्या मुख्यमंत्र्यांची निवड करताना गुणवत्ता आणि क्षमतेला प्राधान्य दिलं जाईल, असं पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं.

****

      गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी दावा करणार असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. पक्षाकडून नेत्याची निवड केल्यानंतर सरकार स्थापण्याची प्रक्रिया पुढे नेली जाईल, असं पक्षाचे सरचिटणीस आणि गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी काल पणजी इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. भारतीय जनता पक्ष सोडून अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, भाजपनं गोव्यात सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीनं अन्य पक्षांशी या आधीच चर्चा सुरू केली असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या गुरुवारी दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत वीरमरण आलेले सातारा जिल्ह्यातले जवान दीपक घाडगे यांच्या पार्थीव देहावर काल फत्त्यापूर  या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कर आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.

****

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्यात आलं आहे. याचा फायदा औरंगाबाद, जालना, परभणी या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना होत आहे. एक हजार ३०० दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद या वेगानं हे पाणी सोडण्यात येत असून जवळपास एक लाख २० हजार हेक्टर शेतीला त्याचा लाभ होणार असल्याचं जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

//******//

No comments:

Post a Comment