Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 March 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ मार्च २०१७ दुपारी १.००वा.
*****
वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी
राज्य स्तरावर सामायिक समुपदेशनाची तरतूद केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं
केली आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणेनुसार राज्य आणि
केंद्रशासित प्रदेश स्तरावर नियुक्त संबंधित अधिकारी राज्यातल्या सर्व वैद्यकीय शिक्षण
संस्थांसाठी सामायिक समुपदेशन करतील. यामुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि
खासगी महाविद्यालयांद्वारे कॅपिटेशन फी आकारण्याच्या प्रथेला आळा बसेल. तसंच विद्यार्थ्यांना
एकाच राज्यात प्रवेशासाठी अनेक संस्थांकडे अर्ज करावा लागणार नाही, असं मंत्रालयानं
स्पष्ट केलं आहे.
****
उत्तर
प्रदेश आणि पंजाबसह ५ राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालांचं उद्योग जगतानं
स्वागत केलं आहे. या निकालांमुळे देशातल्या सुधारणांना गती मिळेल, असं भारतीय उद्योग
महासंघाचे अध्यक्ष नौशाद फोर्ब्स यांनी म्हटलं आहे. या राज्यांमध्ये विजयी झालेल्या
राजकीय पक्षांचं त्यांनी अभिनंदन केलं. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ-अॅसोचॅमनंही
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे.
****
देशाचे
माजी उपपंतप्रधान आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थान इथं यशवंतराव चव्हाण यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त
मुख्य सचिव भगवान सहाय आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन
केलं.
आधुनिक
महाराष्ट्राचे शिल्पकार, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील
त्यांच्या पुतळ्याला विधानसभेचे माजी सदस्य मधु चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
केलं.
यावेळी
विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही
यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.
औरंगाबाद
विभागीय आयुक्त कार्यालयात आज दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांना
विनम्र अभिवादन करण्यात आलं. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी चव्हाण यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर यांच्यासह
विभागीय आयुक्त कार्यालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील प्रतिमेस पुष्प अर्पण
करुन आदरांजली वाहिली. यावेळी नायब तहसीलदार ए.जी.पटवारी यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या
जीवन कार्याची माहिती दिली.
औरंगाबाद
जिल्हाधिकारी कार्यालयातही आज माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना विनम्र
अभिवादन करण्यात आलं. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी यशवंतराव चव्हाण
यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
बीड
जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी यशवंतराव
चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अभिवादन केलं.
तसंच यावेळी बीडचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस
पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.
जालना
जिल्हाधिकारी कार्यालयातही निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
****
धनगर समाजातल्या विविध संघटनांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी काल भेट घेतली. टाटा समाज विज्ञान संस्थेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी, संस्थेनं
केलेल्या धनगर समाजाच्या सामाजिक मानववंशशास्त्रीय अभ्यासाबाबत माहिती दिली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल मुंबई इथं पहिल्या तरंगत्या हॉटेलचं
उद्घाटन केलं. राज्य पर्यटन महामंडळ आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहकार्यानं
हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. आपलं सरकार पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध संकल्पनांचं
स्वागत करेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या
पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
****
राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी फेटाळून लावली आहे. उत्तरप्रदेशातल्या निवडणुकीमुळे देशातल्या जनमताचं प्रतिबिंब
दिसलं आहे, असं सांगत राज्यात मात्र मध्यावधी निवडणूका होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं
मुख्यमंत्री म्हणाले. जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवरचा आपला विश्वास व्यक्त केला
असल्याचं ते म्हणाले. आपलं सरकार शेतकरी कर्जमाफीविरोधात नाही, मात्र कर्जमाफीचा फायदा
बँकांना न होता शेतकऱ्यांना व्हावा, असं त्यांनी नमूद केलं. २००८ साली शेतकऱ्यांना
कर्जमाफी दिल्यानंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत, असं ते म्हणाले.
//*****//
No comments:
Post a Comment