▼

Thursday, 15 June 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 15.06.2017 6.50




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 June 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १५ जून २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·        कृषी कर्जाच्या व्याजदरात अनुदान देण्याचा केंद्राचा निर्णय; कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ

·       सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीचा काँग्रेस पक्षाकडून पुनरुच्चार; संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेना ठाम

·       मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी; दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

आणि

·        चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारत बांगलादेश सामना; इंग्लंडवर मात करत पाकिस्तान अंतिम फेरीत दाखल

****

कृषी कर्जाच्या व्याजदरात अनुदान देण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत, कृषी कर्जासाठी दोन टक्के अनुदान तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त तीन टक्के अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. शेतकऱ्यांना नऊ टक्के व्याज दरानं मिळणारं कर्ज, या योजनेमुळे , चार टक्के दरानं मिळेल. एका वर्षासाठी तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी २० हजार ३३९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या या बैठकीत वित्तीय तोडगा आणि ठेव विमा विधेयक २०१७ ला मंजुरी देण्यात आली. बॅंका, विमा कंपन्यांसह अन्य वित्तीय संस्थांसाठी हे विधेयक उपयुक्त ठरणार आहे.

****

शेतकऱ्यांना शब्दांच्या जाळ्यात न अडकवता, सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीचा काँग्रेस पक्षानं पुनरुच्चार केला आहे. याबाबतची आपली भूमिका काँग्रेस पक्ष सरकारला लवकरच लेखी कळवेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली, त्यानंतर ते बोलत होते. कर्जमाफीसाठी जमिनीच्या क्षेत्राची किंवा कर्जाच्या रकमेची मर्यादा घालू नये, असं चव्हाण म्हणाले. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सरसकट दहा हजार रूपये उचल देण्यापेक्षा पेरणीसाठी प्रति एकर मदत द्यावी असंही चव्हाण यांनी नमूद केलं.

****

शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल सायंकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कर्जमाफी योजनेच्या निकषांबाबत पाटील यांनी ठाकरे यांना माहिती दिली. राज्य मंत्रिमंडळातले शिवसेनेचे मंत्रीही या वेळी उपस्थित होते. संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेना ठाम असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.

****

राज्यातल्या सर्व कृषी विद्यापीठांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, संशोधनावर भर द्यावा अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. कृषी महाविद्यालयं, कृषी तंत्र विद्यालयांच्या बळकटीकरणासंबंधात काल मुंबई इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर किफायतशीर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची शेती विकसित झाली पाहिजे, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘खात्रीदर्शक मतदान पावती यंत्र’ - व्हीव्हीपॅट खरेदीसाठीचा आवश्यक निधी राज्य निवडणूक आयोगाला प्राधान्याने उपलब्ध करून दिला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत बोलत होते. राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया या वेळी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाचंही स्वतंत्र स्थान अबाधित राखण्यात शासन कुठेही कसर ठेवणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

राष्ट्रपती निवडणुकीसाठीची अधिसूचना निवडणूक आयोगानं काल जारी केली. या पदासाठी अर्ज करण्याची मुदत २८ जून पर्यंत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी वेगवेगळा उमेदवार उभा केल्यास १७ जुलै रोजी मतदान होईल, आणि त्याचा निकाल २० जुलैला जाहीर होणार आहे.

****

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा, ‘पुढारी’कार पद्मश्री डॉक्टर ग. गो. जाधव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, विजय कुवळेकर यांना काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि ५० हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

सक्तवसुली संचालनालयानं उद्योजक विजय मल्ल्या याच्या विरोधात मुंबईतल्या विशेष न्यायालयात काल आरोपपत्र दाखल केलं. २००९ मध्ये एका बॅंकेनं किंगफिशर विमान वाहतुक कंपनीला ९०० कोटी रुपयांचे कर्ज दिलं होतं. या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

मराठवाड्यात पुढचे दोन दिवस सर्वच जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी या काळात दक्षता घ्यावी, तसंच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं सतर्क राहावं, अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.

दरम्यान, विभागात औरंगाबाद, उस्मानाबाद, तसंच जालना इथं काल पाऊस झाला, उस्मानाबाद शहर परिसरात पहाटे सुमारे दोन तास पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातही काल दुपारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचलं होतं. जालना जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंतच्या पावसामुळे तावरजा तसंच मांजरा नद्या वाहत्या झाल्या आहेत.

दरम्यान, काल नाशिक शहरात काल सायंकाळी सुमारे तीन तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरात सखल भागात तसंच रस्त्यांवर पाणी साचल्यानं, वाहतुकही काही काळ ठप्प झाली होती, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्ह्यात मनमाड, निफाड, सटाणासह सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे.

****

क्रिकेट - चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यातल्या विजेत्या संघाची अंतिम फेरीत पाकिस्तानशी लढत होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं इंग्लंडवर आठ गडी राखून मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाला २११ धावांत सर्वबाद करत, पाकिस्ताननं ३८ व्या षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य साध्य केलं. 

****

उन्हाळी सुटीनंतर शाळांना आजपासून सुरुवात होत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं अभिनव पध्दतीनं स्वागत केलं जाईल. अनेक ठिकाणी पाठपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिठाई देऊन शाळेचा पहिला दिवस साजरा केला जाणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ५६३ शाळा डिजिटल झाल्या असून, ई लर्निंग तसंच कौशल्य प्रशिक्षणासह एकूणच गुणवत्तेत सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यानं प्रथम क्रमांक पटकावल्याचं, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष अर्चना पाटील यांनी म्हटलं आहे. काल उस्मानाबाद इथं प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या संकेतस्थळाचं लोकार्पण करण्यात आलं.

****

बीड जिल्ह्यात परळी इथल्या औष्णिक विद्युत केंद्रात नव्यानं बसवलेल्या आठव्या वीज निर्मिती संचाचं आज सायंकाळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वी आज सकाळी मांजरसुंभा इथल्या वीज उपकेंद्राचं लोकार्पण तसंच विविध वीज उपकेंद्रांचं भूमीपूजनही बावनकुळे यांच्याहस्ते होणार आहे.

****

दीड हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी परभणी जिल्हा न्यायालयानं सरकारी वकिलाला दीड वर्ष कारावास आणि सहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. सरकारी वकील नामदेव घुगे यानं बळीराम बुधवंत या आपल्या सहकाऱ्याच्या मदतीनं, एका हत्येच्या खटल्यात तक्रारदाराकडून ही लाच घेतली होती. लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं त्याला लाच घेताना, रंगेहाथ अटक केली होती. या प्रकरणी न्यायालयानं काल घुगे याला शिक्षा सुनावत, बुधवंत याची निर्दोष सुटका केली.

****

शेतकऱ्यांनी शेतीला जोडूनच दुग्ध व्यवसायाकडे वळावं, असं आवाहन पशूविकास अधिकारी डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात माळ बोरगाव इथं शेतकऱ्यांसाठी रात्रसभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. शेतीला दुध व्यवसायाची जोड दिल्यास आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते, असं डॉक्टर खानसोळे यांनी नमूद केलं.

****

नांदेड - तिरुपती - नांदेड आणि नगरसोल - तिरुपती - नगरसोल या दोन विशेष रेल्वे गाड्यांना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. नांदेड - तिरुपती ही गाडी नांदेडहून दर मंगळवारी संध्याकाळी निघून तिरुपती इथे बुधवारी दुपारी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी तिरुपती इथून बुधवारी दुपारी निघून गुरुवारी सकाळी नांदेड इथं पोहोचेल. नगरसोल - तिरुपती ही गाडी नगरसोल इथून दर शुक्रवारी संध्याकाळी निघून दुसऱ्या दिवशी तिरुपतीला पोहोचेल. तर तिरुपती इथून ही गाडी शनिवारी निघून रविवारी नगरसोल इथं पोहोचेल.

****

शेगावहून पंढरपूरकडे निघालेली संत गजानन महाराजांची पालखी काल परभणी शहरात दाखल झाली. शहरात ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. वारकऱ्यांसाठी अनेक ठिकाणी उपाहाराची व्यवस्था करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****


No comments:

Post a Comment