▼

Wednesday, 14 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 14.06.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 June 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ जून  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

कृषी कर्जासाठी दोन टक्के अनुदान देण्याच्या तसंच वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त तीन टक्के अनुदान देण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. विविध राज्यांमध्ये कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला. तीन लाख रुपयांपर्यंत अल्प मुदतीचं कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे. इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम या कमी दरात पीककर्ज देण्याची ही योजना आहे. कर्जावरची पाच टक्के रक्कम सरकार देणार असल्यानं शेतकऱ्यांवरच्या कर्जाचं ओझं कमी होईल. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नऊ टक्के व्याजानं मिळणारं कर्ज चार टक्के दरानं मिळणार असून एका वर्षासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेसाठी सरकारच्या तिजोरीवर १९ हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार असून चालू आर्थिक वर्षासाठी २० हजार ३३९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

****

येत्या १७ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगानं आज जारी केली. अर्ज भरण्याची मुदत २८ जून पर्यंत आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ५० मतदारांचा पाठिंबा हवा, तसंच अन्य ५० जणांचं अनुमोदन आवश्यक असणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार तसंच सर्व राज्य विधिमंडळाचे आमदार उमेदवाराला पाठिंबा किंवा अनुमोदन देऊ शकतात. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी वेगवेगळा उमेदवार उभा केल्यास मतदान होईल, आणि त्याचा निकाल २० जुलैला जाहीर होईल.
दरम्यान, राष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्थापन केलेली समिती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

****

स्मार्ट सिटी योजनेत देशातल्या आणखी ३२२ शहरांचा समावेश करण्यासाठीची पुढची यादी सरकार २३ जून रोजी जाहीर करणार आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ही माहिती दिली. स्मार्ट सिटीसह अमृत शहरांच्या यादीतल्या ५०० शहरांमध्ये विकास कामं सुरू असून त्यातल्या १४७ शहरांना गुंतवणूक श्रेणीही मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. बांधकाम क्षेत्रात गैरप्रकार थांबवण्यासाठी नियमावली बनवण्यात आली असून, त्यासाठी रेरा विधेयक संमत करण्यात आलं आहे. हे विधेयक संसदेच्या पुढील अधिवेशनात मांडलं जाईल, असंही नायडू यांनी सांगितलं.

****

घाऊक किंमतींवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात मे महिन्यात घट होऊन तो दोन पूर्णांक १७ शतांश अंकावर पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात हा दर तीन पूर्णांक ८५ शतांश टक्के इतका होता.

****

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत एकूण २७ विषयांवर चर्चा करण्यात आली. शिर्डी, पुरंदर, बेलोरा, कराड, मोरवा, सोलापूर, धुळे या विमानतळाच्या विकासकामाबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.

****

राज्यातल्या सर्व कृषी विद्यापीठांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करतांना कृषी संशोधनावर भर द्यावा अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. मुंबई इथं कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालये, कृषी तंत्र विद्यालयांच्या बळकटीकरणासंबंधी आयोजित बैठकीत ते आज बोलत होते. यावेळी राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर किफायतशीर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची शेती विकसित झाली पाहिजे, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

****

देशातल्या अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून, ईशान्येकडच्या राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यात केंद्र सरकारनं बचाव कार्यासाठी लष्करी मदत पाठवली आहे. या राज्यांशी केंद्र सरकार संपर्क ठेऊन असल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राज्यातही आज अनेक भागात पाऊस पडल्याचं वृत्त आहे. नाशिक, उस्मानाबाद, लातूर इथं आज पाऊस पडला, तर औरंगाबाद शहरातही आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. मात्र नांदेड, सातारा आणि वाशिम जिल्ह्यात आज पावसाचं वृत्त नाही.

****

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकावलेला खेळाडू रोहन बोपन्नाचा आज नवी दिल्ली इथं क्रिडा मंत्री विजय गोयल यांच्या हस्ते सत्कार झाला. या यशामुळे बोपन्नानं देशाची मान उंचावल्याचं सांगत, त्याच्या कामगिरीचं गोयल यांनी कौतुक केलं.

****

No comments:

Post a Comment