Friday, 18 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 18.08.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 AUG. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                                Language Marathi         

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** कर्जमाफी योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय सरकार हात आखडता घेणार नाही - मुख्यमंत्र्यांची ग्वाही

** अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी आज आणि उद्या विशेष प्रवेश फेरी 

** राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हं; २४ तासात मोठ्या पावसाची शक्यता

आणि

** बाजार समित्यांना आर्थिक तसंच तांत्रिक सहकार्य पुरवावं - बाबा आढाव यांची मागणी

****

कर्जमाफी योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय सरकार हात अखडता घेणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल मुंबईत भाजपा कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी बोलत होते. पक्षातल्या संघटनात्मक बदलाच्या बातम्या फेटाळून मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार स्थिर असल्याचा विश्वास व्यक्त केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी बोलताना, राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर तिचं निराकरण करण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना राबवण्यास सरकार सक्षम असल्याचं सांगितलं.

****

दरम्यान, राज्य सरकारनं कर्जमाफी करुनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत. यावरुन या समस्यांबाबत सरकार गंभीर नाही हे स्पष्ट होत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी काल केला. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी सामुहिक बलात्कार प्रकरणी पाच जणांचा जवाब नोंदवला जावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. आरोपीच्या वकिलांनी ही याचिका दाखल केली होती. मात्र सत्र न्यायालयात हा खटला सुरू असताना वेगळ्या सुनावणीची गरज नाही, असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली.

****

मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहितच्या जामीन अर्जावरचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल राखून ठेवला. राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं पुरोहितच्या विरोधात सबळ पुरावे असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवावा, असं सांगत, त्याला जामीन देण्यास विरोध केला. या प्रकरणातली आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगला जामीन दिल्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहितलाही जामीन देण्याची मागणी होत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता.

****

देशभरातल्या पेट्रोलपंपावर आता एलईडी दिवे, ट्यूबलाईट आणि पंख्यांची विक्री होणार आहे. एलईडी दिवे ७० रुपये प्रतिनग, ट्यूबलाईट २२० रुपये प्रतिनग आणि पंचतारांचे मानांकन असलेले पंखे एक हजार दोनशे रुपये प्रतिनग या दरानं खरेदी करता येणार आहेत. येत्या सहा महिन्यांत ही इलेक्ट्रॉनिक उत्पादनं सर्व पेट्रोल पंपांपर उपलब्ध होतील, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं.

****

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातली सात हजार रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत असून २२ ऑगस्टनंतर या पदावरील शंभर टक्के नियुक्त्यांमुळे आरोग्य विभागाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा इथं ग्रामीण रुग्णालयातील आधुनिक ट्रामा केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं भरण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर देण्यात आले आहेत. याचबरोबर ७८१ बीएएमएस वैद्यकिय अधिकाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठीच्या विशेष फेरी अंतर्गत आज आणि उद्या या दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करावयाचे आहेत. विशेष फेरीच्या यादीत समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणं अनिवार्य असून, प्रवेश रद्द करता येणार नसल्याचं विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता आला नाही, अथवा पहिल्या फेरीतल्या प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना या विशेष प्रवेश फेरीत संधी देण्यात आली आहे.

****

येत्या २२ तारखेला बँक कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. बँकींग क्षेत्रात सुधारणांच्या नावाखाली खाजगीकरणाला वाव दिला जात असल्याच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियन्स या बँक कर्मचारी संघटनांच्या शिखर संघटनेनं काल या संपाची घोषणा केली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ ऑगस्टला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या श्रृंखलेचा हा ३५वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. बंगालच्या उपसागरात होणाऱ्या या बदलामुळे पावसाचा जोर वाढेल आणि राज्याला गेल्या १५ दिवसांपासून ओढ दिलेला मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. येत्या २४ तासात मराठवाड्यासह कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात गेल्या सुमारे महिनाभरापासून समाधानकारक पावसाअभावी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

****

कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सरकारनं आर्थिक तसंच तांत्रिक सहकार्य पुरवलं पाहिजे, अशी मागणी हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष बाबा आढाव यांनी केली आहे. काल औरंगाबाद इथं विभागीय शेतकरी परिषदेत ते बोलत होते. बाजार समित्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातल्या हवामानानुसार पीक पद्धत ठरवावी, उत्पादनापासून विक्रीपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं आढाव म्हणाले.

****

औरंगाबाद जिल्ह्यात बंधाऱ्यांची कामं हाती घेताना टँकरग्रस्त गावांना प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गावांमध्ये पाणीवाटप संस्थेनं जबाबदारी घेऊन पाण्याचं योग्य नियोजन करावं, तसंच प्रत्येक गावात कोल्हापूर बंधाऱ्यांच्या दरवाजांच्या दुरुस्तीवर लक्ष द्यावं, असं कदम यांनी सांगितलं.

****

हिंगोली शहरात काल पोलीसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला अटक केली. शहरातल्या गांधी चौक परिसरात एका चारचाकीतून या तीन संशयितांना ९३ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह पोलीसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्या ताब्यातून इतरही साहित्यही जप्त करण्यात आलं असून, या साहित्याचा पंचनामा करण्यात आला आहे. या टोळीमध्ये आणखी काही लोक असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

***

परभणी जिल्ह्यातल्या लोअर दूधना धरणाच्या उजव्या कालव्याला तीन ठिकाणी मोठी भगदाडं पडली आहेत. यामुळे डिग्रस परिसरात शेतातली माती वाहून गेल्यानं नुकसान झालं आहे. कालव्याचं निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांच्या चौकशीची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

****

विद्यार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता गुणवत्तेच्या बळावर मोक्याच्या जागा पटकावल्या पाहिजेत, असं मत जालना जिल्हा परिषदेचे सहाय्यक लेखाधिकारी रविंद्र बोर्डे यांनी व्यक्त केलं आहे. जालना इथं गुणवंतांना मार्गदर्शन करताना काल ते बोलत होते. स्वत:चे उद्योग व्यवसाय निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षण घ्यावं, असं बोर्डे म्हणाले. बोर्डे यांच्या हस्ते या वेळी चाळीस गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं.

****

बल्गेरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद लक्ष्य सेन या सोळा वर्षाच्या भारतीयानं पटकावलं आहे. सोफिया इथं झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात लक्ष्यनं क्रोएशियाच्या झुनिमिर तुर्कींजाचा १८-२१, २१-१२, २१-१७ असा पराभव केला.

****

विविध प्रकारच्या कर्करोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं लातूर इथं उद्यापासून दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषद होणार आहे.

****

No comments:

Post a Comment