Sunday, 6 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 06.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

केंद्र सरकारनं तूर डाळीची आयात प्रतिबंधित श्रेणीत वर्ग केली आहे. तसंच डाळ आयातीची मर्यादाही सरकारनं निश्चित केली आहे. परदेशी व्यापार संचालनालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली असून, यात तूर डाळीची आयात एका वर्षात दोन लाख टनांपेक्षा जास्त होता कामा नये, असं म्हटलं आहे.

****

वस्तू आणि सेवा कर जीएसटीतल्या तरतुदींनुसार ५० हजार रुपयांवरील वस्तू किंवा सेवांसाठी ई- वे बिलांची नोंदणी करणं आवश्यक असून, या प्रणालीतून वगळण्यात आलेल्या वस्तूंसाठी मात्र ही पूर्वनोंदणी करणं बंधनकारक नसल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. जीएसटी परिषदेच्या काल नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ई - वे बिलांबाबतच्या नियमांना तत्वत: मंजुरी देण्यात आली असून संपूर्ण देशभरात याची अंमलबजावणी प्रक्रिया पूर्णत: तंत्रज्ञानाच्या आधारे राबवण्यात येईल, असंही जेटली यांनी सांगितलं.

****

मृत व्यक्तीची नोंदणी करताना येत्या एक ऑक्टोबर पासून आधार क्रमांक आवश्यक असणार आहे, मात्र तो बंधनकारक नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं गेल्या शुक्रवारी याबाबत एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं होतं. आधार क्रमांक अनिवार्य नाही, मात्र मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आधारचा उपयोग केल्यास त्याचे नातेवाईक अथवा ओळखीच्या व्यक्तींनी पुरवलेल्या माहितीची अचूकता पडताळून पाहता येईल, तसंच यामुळे नोंदणीसाठी अनेक कागदपत्रांची गरज संपुष्टात येईल, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

****

शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी शैक्षणिक क्षेत्रात संशोधन आणि प्रयोगशीलतेवर सरकार भर देत असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते जयपूर इथं आयोजित शिक्षण महोत्सवात बोलत होते. शिक्षण अधिकाराअंतर्गत पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी परीक्षा पद्धती सुरु करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याचं ते म्हणाले. परीक्षा पद्धतीमुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

****

औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांना नियमानुसार आवश्यक त्या सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचं, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहाच्या त्रैमासिक बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली, त्यावेळी ते बोलत होते. कैद्यांना विधी सेवा मिळणं गरजेचं असून त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, कैद्यांना न्यायालयात तसंच रुग्णालयात नेण्यासाठी पोलिस विभागाकडून पूर्णपणे पोलिस पथक पुरवण्यासाठी संबंधितांना आदेशित करण्यात येईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.

****

नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या उत्तरसूचीवर गेल्या आठवडाभरात जवळपास पाचशे जणांचे आक्षेप आणि तक्रारी आल्या असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी दिली. शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारी शिक्षक पात्रता परीक्षा नुकतीच पार पडली असून राज्य परीक्षा परिषदेकडून अंतरिम उत्तरसूचीही जाहीर करण्यात आली होती. यामध्ये कोणते आक्षेप खरोखरच योग्य आहेत आणि त्यानुसार प्रश्न रद्द होऊ शकतात का याची पाहणी केली जाईल आणि त्यानंतर साधारण आठवडाभरात अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात येईल असं डेरे यांनी सांगितलं.

****

'सीएम फेलोशिप प्रोग्राम'अंतर्गत नव्या पिढीच्या नाविन्यपूर्ण कल्पना, सूचनांचा शासनात अधिक कार्यक्षमतेनं, सुशासनाची अंमलबजावणी करण्यासाठी निश्चितच उपयोग केला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 'सीएम फेलोशिप प्रोग्राम'अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांशी मुंबई इथं संवाद साधताना ते बोलत होते. राज्याचा माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकाधिक सक्षम करण्यास प्राधान्य, तसंच, ई- प्रशासनाचा गतीमान वापर करण्याकडे विशेष लक्ष दिलं जात असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, राज्यातल्या जनतेला माहिती तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचं आवाहन केलं.

****

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं दुसरं राष्ट्रीय महाअधिवेशन उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. ओबीसी समाजासाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं, मंडल आयोग आणि स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी लागू कराव्या, यांसारख्या विविध मागण्या या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. राष्ट्रीय मागासवर्ग महासंघाचे माजी अध्यक्ष व्ही ईश्वरैय्या आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून, शेटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात चार बाद 30८ धावा झाल्या होत्या. उमेश यादव, रवीचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी एक बळी घेतला. भारत अजूनही १३१ धावांनी आघाडीवर आहे.

****

No comments:

Post a Comment