आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०३ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार
करण्यात आला असून, नऊ नवीन मंत्र्यांचा शपथविधी राष्ट्रपती भवनात सुरु आहे. राष्ट्रपती
रामनाथ कोविंद त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देत आहेत. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या
नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह सर्व केंद्रीय
मंत्री आणि खासदार यावेळी उपस्थित आहेत. धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल, निर्मला सितारामन,
मुख्तार अब्बास नक्वी या राज्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
उत्तर प्रदेशमधले राज्यसभा
सदस्य शिव प्रताप शुक्ल, बिहारमधल्या बक्सर इथले लोकसभा सदस्य अश्विनी कुमार चौबे,
मध्य प्रदेशातल्या टिकमगढ इथले लोकसभा सदस्य डॉ. विरेंद्र कुमार, कर्नाटकचे लोकसभा
सदस्य अनंत कुमार हेगडे, बिहारमधल्या आरा इथले लोकसभा सदस्य राजकुमार सिंग यांनी राज्यमंत्री
पदाची शपथ घेतली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून
चीन आणि म्यानमार या दोन देशांच्या तीन दिवसीय दौ-यावर रवाना होणार आहेत. पंतप्रधान
मोदी दौ-याच्या पहिल्या दिवशी चीनमधल्या झीयान शहरात होणा-या ९ व्या ब्रीक्स शिखर परिषदेला
उपस्थित राहणार आहेत. प्रबळ ब्रिक्स भागीदारीसाठी आपण चीनसह पाचही सदस्य देशांशी एकत्रित
विकासासंदर्भात सकारात्मक चर्चा करणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण
भागात शौचालय बांधकामाची गती वाढविण्यासाठी आता ग्रामसेवक, विस्तार अधिकारी आणि गट
विकास अधिकारी यांच्या कडून दररोज बांधकामाचा आढावा घेतला जाणार आहे. यासाठी संनियंत्रण
आणि मूल्यांकनही केलं जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्या
मार्गदर्शनात ही मोहिम राबविली जाणार असल्याचं, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काल सांगण्यात
आलं.
****
वस्तू आणि सेवा कर प्रणाली
जी.एस.टी अंतर्गत ज्या व्यापारी तसंच कंपन्यांनी अद्याप विवरण पत्र सादर केलेलं नाही,
त्यांना विलंबाबाबत दंड न आकारण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. केंद्रीय उत्पादन मंडळ
आणि सीमाशुल्क विभागानं याबाबत परिपत्रक जारी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment