Saturday, 4 November 2017

AIR NEWS AURANGABAD 04.11.2017 06.50AM




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 November 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ नोव्हेंबर २०१७ सकाळी .५० मि.

******

·    कृषी मालाची दोन लाख रुपयांपर्यंत व्यापाऱ्यांना केलेली रोख विक्री, आयकर अधिनियमातून मुक्त असल्याचं, आयकर विभागाकडून स्पष्ट

·    दूरशिक्षण अभ्यासक्रमांद्वारे तंत्र शिक्षण देता येऊ शकत नाही - सर्वोच्च न्यायाल

·    प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत १०० निवडक शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तयार करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्याची शिक्षण मंत्र्यांची घोषणा

·    यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर

·    शेतमालाला हमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत - राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

आणि

·    भारतीय महिला हॉकी संघाची आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

****

कृषी मालाची दोन लाख रुपयांपर्यंत व्यापाऱ्यांना केलेली रोख विक्री आयकर अधिनियमातून मुक्त असल्याचं, आयकर विभागानं स्पष्ट केलं आहे. विभागाकडून जारी एका पत्रकानुसार दोन लाख रुपयांपेक्षा कमी कृषी मालाच्या रोख विक्रीवर शेतकरी किंवा व्यापाऱ्यांना कर भरावा लागणार नाही, तसंच, त्यांना पॅन किंवा अर्ज क्रमांक १६ भरून देण्याचीही आवश्यकता नसल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे.

****

आधार कायद्याची घटनात्मक वैधता तसंच आधार क्रमांक बँक खातं आणि मोबाईल क्रमांकाशी संलग्नीकरणाला आव्हान देणाऱ्या चार याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय अंतरिम आदेश देणार नसून, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्वतंत्र पीठासमोर आधारसंबंधी दाखल सर्व याचिकांवर सुनावणी होणार आहे.



विमुद्रीकरणानंतर रद्द झालेल्या नोटा बँकेत जमा करण्यासाठीच्या १४ याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल निकाली काढल्या. पाच न्यायाधीशांचं एक घटनापीठ या संदर्भात निर्णय घेईल, असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं. दरम्यान, घटनापीठासमोर सुनावणी पूर्ण होईपर्यंत रद्द झालेल्या नोटा बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार नसल्याचं, सरकारनं, न्यायालयात सांगितलं आहे.

****

दूरशिक्षण अभ्यासक्रमांद्वारे तंत्र शिक्षण देता येऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. यापूर्वी अशा शिक्षणाला ओडिशा उच्च न्यायालयानं परवानगी दिली होती. मात्र दूरशिक्षणाद्वारे मिळवलेली अशी पदवी, नियमित वर्गात शिकून मिळवलेल्या पदवीच्या समकक्ष मानता येणार नाही, असा निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दोन वर्षांपूर्वीच दिला होता. हा निकाल ग्राह्य धरत, दूरशिक्षण कार्यक्रमाद्वारे अभियांत्रिकीसारख्या तंत्रशिक्षणाचे अभ्यासक्रम चालवू नयेत, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

****

नगरपरिषदांनी महत्त्वाच्या नागरी सेवा या सेवा हमी कायद्याच्या कक्षेत आणून डिजिटल स्वरुपात देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल नगरविकास विभागाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर बोलत होते. राज्यातल्या ३४ नगरपरिषदांचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते. शासनाचे विविध प्रकल्प राबवताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

*****

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रउपक्रमांतर्गत राज्यातल्या १०० निवडक शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तयार करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवणार असल्याची घोषणा, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. माध्यमिक शिक्षणात मुलींच्या गळतीचं प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत खाली आणणं तसंच शैक्षणिक कामगिरीत महाराष्ट्राला देशात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये आणण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम राबवणार असल्याचं, ते म्हणाले. पुढील काळात राज्यातल्या सर्वच शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनवण्यासाठी राज्यभरात हा कार्यक्रम राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या विचाराधीन असल्याचंही तावडे यांनी सांगितलं.

****

साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे. ११ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कृष्णा सोबती यांना यापूर्वी साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांची जिंदगीनामा, समयसंग्राम, तीन पहर, मित्रों मरजानी, ऐ लडकी, दार से बिछुडी, आदी साहित्यकृती प्रसिद्ध आहेत.

****

पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आहारभत्ता जवळपास दुपटीने वाढवण्यात आला आहे. येत्या एक डिसेंबर २०१७ पासून हा वाढीव लाभ मिळणार आहे.

****

राज्यावर कर्ज असतांना आणि कर्जमाफीसाठी पैसा नसताना सरकार जाहिरातबाजी करत असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. विशेष प्रसिद्धी मोहिमे अंतर्गत प्रसिद्धीवर २७ कोटी रुपये खर्च करण्याच्या शासन निर्णयावर त्यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली.

****

शेतकऱ्यांना हमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करणारा अध्यादेश सरकारनं तातडीने काढावा, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलं. वीज बिलाची थकबाकी दुष्काळाच्या काळातली आहे, त्यामुळे थकबाकीपोटी कृषी पंप वीज जोडणी तोडण्याचा आदेशही सरकारनं मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी या निवेदनातही केली आहे.

****

राज्यातल्या पहिल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचं आज अहमदनगर जिल्ह्यात राळेगण सिद्धी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, लोकार्पण होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातल्या या पहिल्या प्रकल्पातून आगामी तीन महिन्यात दोन मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक परिसरात उभारण्यात आलेल्या २१० फूट उंचीचा ध्वजस्तंभ आणि स्वातंत्र्य संग्राम स्मारकाचं लोकार्पण राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत आज होणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी हा कार्यक्रम होणार आहे.

****

भारतीय महिला हॉकी संघानं जपानमधल्या काकामिगाहारा इथं सुरु असलेल्या आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारतानं यजमान जपान संघाचा चार दोन असा पराभव केला. उद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा सामना चीनसोब होणार आहे.

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान दुसरा टी-ट्वेंटी सामना आज होणार आहे. संध्याकाळी सात वाजता राजकोट इथं या सामन्याला सुरुवात होईल. गेल्या बुधवारी दिल्ली इथं झालेला पहिला सामना भारतानं जिंकून तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.

****

शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांची ५४८ वी जयंती आज साजरी होत आहे. या निमित्तानं अडीच हजार भाविकांचा जत्था पाकिस्तानात नानकदेव यांचं जन्मस्थान नानकाना साहिबकडे रवाना झाला आहे. नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वाऱ्यातही गुरु नानक जयंतीनिमित्त शबद, कीर्तन, आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.   

****

जालना जिल्ह्यातल्या मंठा-तळणी मार्गावर काल रात्री जीप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागेवर मृत्यू झाला तर जीपमधील सातजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त जीप मजुरांना घेऊन मुंबईकडे जात असतांना हा अपघात घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी ५० हजार रुपये लाच घेणाऱ्या प्रभारी सहायक निबंधकास काल रंगेहाथ अटक करण्यात आली. साहेबराव सोनटक्के असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

****

लातूर जिल्हा नियोजन विकास समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातल्या पाच बसस्थानकांवर सुरक्षेसाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसंच खासदार डॉ सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत, प्रत्येक गावात अधिकृत स्मशानभूमी बांधण्यासह विविध निर्णय घेण्यात आले.

*******

No comments:

Post a Comment