Friday, 3 November 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 03.11.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 November 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

आधार कायद्याची घटनात्मक वैधता तसंच आधार क्रमांक बँक खातं आणि मोबाईल क्रमांकाशी संलग्नीकरणाला आव्हान देणाऱ्या चार याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय कोणताही अंतरिम आदेश देणार नसून, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्वतंत्र पीठासमोर आधारसंबंधी दाखल सर्व याचिकांवर सुनावणी होणार आहे. आधार क्रमांक बँक खात्याशी जोडण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर असल्याचं बँकांनी तर, मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्याची शेवटची तारीख सहा फेब्रुवारी २०१८ असल्याचंही दूरसंचार कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना सांगावं, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****

विमुद्रीकरणानंतर रद्द झालेल्या नोटा बँकेत जमा करण्यासाठीच्या १४ याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज निकाली काढल्या. पाच न्यायाधीशांचं एक घटनापीठ या संदर्भात निर्णय घेईल, असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं. जे लोक विहित मुदतीत आपल्याकडच्या नोटा जमा करू शकले नाहीत, त्यांच्या वैयक्तिक याचिकांवरही हे घटनापीठ सुनावणी घेईल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. एक हजार आणि पाचशे रुपये मूल्याच्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाची वैधता पडताळून पाहण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी १६ डिसेंबरला एक घटनापीठाला दिले होते.

****

दूरशिक्षण अभ्यासक्रमांद्वारे तंत्र शिक्षण देता येऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायलयानं स्पष्ट केलं आहे. यापूर्वी अशा शिक्षणाला ओडिशा उच्च न्यायालयानं परवानगी दिली होती. मात्र दूरशिक्षणाद्वारे मिळवलेली अशी पदवी, नियमित वर्गात शिकून मिळवलेल्या पदवीच्या समकक्ष मानता येणार नाही, असा निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दोन वर्षांपूर्वी दिला होता. हा निकाल ग्राह्य धरत, शैक्षणिक संस्थांनी दूरशिक्षण कार्यक्रमाद्वारे अभियांत्रिकीसारख्या तंत्रशिक्षणाचे अभ्यासक्रम चालवू नयेत, असं सर्वोच्च न्यायालयानं बजावलं आहे.

****

आयसीआरटीसीच्या पोर्टलवरून तिकीट आरक्षणाची मर्यादा प्रतिमहिना सहावरून, बारा करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी संबंधित व्यक्तीचे आरक्षण खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणं आवश्यक आहे. २६ ऑक्टोबरपासून हा बदल करण्यात आला आहे. 

****

साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे. हिंदी भाषेच्या कल्पित वाङमय आणि निबंध लेखिका असलेल्या कृष्णा सोबती यांना यापूर्वी साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

****

शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांची ५४८ वी जयंती उद्या साजरी होत आहे. या निमित्तानं अडीच हजार भाविकांचा जत्था पाकिस्तानात नानकदेव यांचं जन्मस्थान नानकाना साहिबकडे रवाना झाला आहे. नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वाऱ्यातही गुरु नानक जयंतीनिमित्त शबद, कीर्तन, आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.  

****

‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’उपक्रमांतर्गत राज्यातल्या १०० निवडक शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तयार करण्याचा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबवणार असल्याची घोषणा, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. ते आज मुंबईत बोलत होते. माध्यमिक शिक्षणात मुलींच्या गळतीचं प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी तसंच शैक्षणिक कामगिरीत महाराष्ट्राला देशात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये आणण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम राबवणार असल्याचं, ते म्हणाले. पुढील काळात राज्यातल्या सर्वच शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनवण्यासाठी राज्यभरात हा कार्यक्रम राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या विचाराधीन असल्याचंही तावडे यांनी सांगितलं.

****

आरोग्य क्षेत्रात विविध सेवा पुरवण्यासाठी प्रशिक्षीत कुशल मनुष्यबळ निर्माण होण्याकरता कुटुंब कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राच्यावतीनं ‘आरोग्याची निगा आणि कौशल्य प्रशिक्षण’ अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातल्या युवकांना रोजगाराची संधी निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

थेट लाभ योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातल्या सर्व खत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना ई-पॉस मशीनद्वारेच रासायनिक खतांची विक्री करण्याचे निर्देश जिल्हा परिषद कृषी विभागानं दिले आहेत. यासाठी ६३१ कृषीकेंद्र चालकांना ई-पॉस मशीन मोफत देण्यात आल्या आहेत. या प्रणालीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई चा इशारा कृषी विकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी दिला आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक परिसरात उभारण्यात आलेल्या २१० फूट उंचीच्या ध्वजस्तंभ आणि स्वातंत्र्य संग्राम स्मारकाचं लोकार्पण राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत उद्या होणार आहे. उद्या संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी हा कार्यक्रम होणार आहे.

****

No comments:

Post a Comment