▼

Thursday, 16 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.11.2017 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१६ नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

*****

राष्ट्रीय पत्रकार दिवस आज साजरा होत आहे. स्वतंत्र पत्रकारिता ही जागृत लोकशाहीचा मुख्य आधार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ट्विटरवरील आपल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधानांनी, माध्यमांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं सांगितलं. स्वच्छ भारत अभियानाला माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनीही राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, वृत्तपत्रासंबंधी आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे अंदोलन करण्यात येणार आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समीती, मराठी पत्रकार परीषद तसंच विविध पत्रकार संघटनांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येणार आहे.  

****

रस्त्यांवरील खड्डे आणि दुरावस्थेबाबतच्या तक्रारीसंदर्भात, संबधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांची  नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं रस्त्यांच्या दूरावस्थेसंदर्भात सर्व सामान्य जनतेच्या तक्रारींना दाद मिळावी याकरता हा कक्ष निर्माण केला आहे.

****

राज्य परिवहन महामंडळाच्या माफक दरातल्या शिवशाही बसेसचा विस्तार करण्यात येत असून, औरंगाबाद विभागासाठी ३४ शिवशाही बसेसला मंजूरी मिळाली आहे. काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही मंजूरी मिळल्याची माहिती, विभागीय वाहतूक नियंत्रक संदीप रायलवार यांनी दिली. राज्यातल्या, तसंच, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा,मध्य प्रदेश या राज्याबाहेरच्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर लवकरच औरंगाबाद इथून या बसेस सुरू होणार आहेत.

****

बीड तालुक्यातल्या कुटेवाडी इथला ग्रामसेवक जगन्नाथ टूले याला तीन हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहात पकडलं. इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलात विद्युत मीटरचे पीटीआर देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

अमृतसरहून येणारी सचखंड जलदगती रेल्वेगाडी बारा तास उशिरा धावत आल्यामुळे नांदेडहून अमृतसरला जाणारी सचखंड जलदगती गाडी, आज नांदेड इथून दुपारी दीड वाजता सुटणार आहे.

****

औरंगाबाद महसूल विभागात २०१५ - १६ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांना विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीनं विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, गावस्तरीय पुरस्कारांचा समावेश आहे.

****

No comments:

Post a Comment