Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 November 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
*******
अहमदनगर इथं ऊस दरवाढीविरोधातल्या आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची आज माजी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. या आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरलेल्या घोटण,
खानापूर गावातल्या शेतकऱ्यांशीही पवार यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांवर झालेल्या या
गोळीबाराबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं सांगत, या प्रकरणाची
चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांचे प्रश्न
सोडवण्यात या सरकारला पूर्णपणे अपयश आल्याची टीकाही त्यांनी केली.
****
प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांची
पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान
गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय
चित्रपट महोत्सवात बच्चन यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचं केंद्रीय सूचना
आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे. बच्चन यांनी ५० वर्षांच्या कारकिर्दीत १९० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांना चार वेळा
सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित
करण्यात आलं आहे.
****
बँक ऑफ इंटरनॅशनल
सेटलमेंटच्या वित्तीय स्थैर्य संस्था अर्थात एफ एस आय च्या सल्लागार मंडळावर
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँक
ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट ही जगभरातल्या ६० सदस्य मध्यवर्ती बँकांच्या मालकीची आहे.
एफ एस आय ही संस्था जगभरात वित्तीय क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वित्तीय
संस्था मजबूत करण्यासाठी सहकार्य करते.
****
वस्तू आणि सेवा कराच्या कमी
झालेल्या दरांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, यासाठी राज्यांच्या संबंधित विभागांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशी सूचना
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान
यांनी दिली आहे. कमाल किरकोळ किमतीतल्या बदलांवर दररोज देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली
आहे. कंपन्यांनी नव्या
जीएसटी करांनुसार, विक्रीसाठी तयार
मालावर कमाल किरकोळ किंमतीचे स्टीकर्स लावणं आवश्यक
असल्याचं पासवान यांनी सांगितलं.
****
भारतीय
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री
हौसाबाई बंडू आठवले यांचं आज सकाळी मुंबईत वार्धक्यानं
निधन झालं. त्या ८३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता
वांद्रे इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या
निकटवर्तीयांनी कळवलं आहे.
****
राज्यात येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. मतदार यादीत ऑनलाईन
नोंदणीची सुविधा डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी ई ओ डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही
डॉट इन या संकेस्थळावरही उपलब्ध असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं मार्च
२०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या
इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत
वाढवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता
येतील, असं मंडळानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा - एनएसडीच्या धर्तीवर चित्रनगरीमध्ये ‘महाराष्ट्र स्कूल
ऑफ ड्रामा’ स्थापन करण्यासाठी राज्य शासनानं कार्यकारी समिती स्थापन केली आहे. दादासाहेब
फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक हे या कार्यकारी समितीचे अध्यक्ष असतील, तर
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य असतील. ही समिती येत्या सहा
महिन्यात प्रस्तावित महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामामध्ये विविध अभ्यासक्रम, शिकवण्यात
येणारे विषय, शिकवण्याची कार्यपद्धती याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करणार आहे.
****
चीनमधल्या फुझोऊ इथं सुरु असलेल्या चायना खुल्या सुपर सिरीज
बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालचा पराभव झाल्यानं तिचं या
स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. आज झालेल्या दुसऱ्या
फेरीतल्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीनं सायनाचा २१ - १८, २१ - ११ असा पराभव
केला. पुरुष एकेरीतही दुसऱ्या फेरीत
एच एस प्रणयचा पराभव झाला. हाँगकाँगच्या यिऊ लीनं प्रणयचा १९ - २१, १७ - २१ असा
पराभव केला.
पी. व्ही. सिंधूचा दुसऱ्या
फेरीतला सामना आज चीनच्या युए हान विरुद्ध होणार आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन क्रिकेट
कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अद्याप सुरु झाला
नाही. कोलकाता इथं सकाळी साडे नऊला या सामन्याला सुरूवात होणार होती.
****
औरंगाबाद जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं विभागीय सायकलिंग
स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या सकाळी दहा वाजता शेंद्रा इथल्या औद्योगिक विकास
महामंडळाच्या कार्यालयासमोर ही स्पर्धा होणार आहे. जिल्हास्तर स्पर्धांचे विजेते खेळाडू
यात सहभागी होऊ शकतात, असं क्रीडा कार्यालयानं कळवलं आहे.
*******
No comments:
Post a Comment