Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
¨ शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्याबाबत केंद्र सरकार
गंभीर- अर्थमंत्री अरुण जेटली
¨ काँग्रेस पक्षाच्या
राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रं राहुल गांधी यांनी स्वीकारली
¨ कोळसा घोटाळा
प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा आणि माजी सचिव एच सी गुप्ता यांना तीन
वर्षांच्या तुरुंगवासासह आर्थिक दंडाची शिक्षा
¨ आणि
¨ दुबई सुपर सिरीज
बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.सिंधुचा आज अंतिम फेरीचा सामना
****
केंद्र सरकार शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्याबाबत
गंभीर असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. सातत्यपूर्ण विकासासाठी
ग्रामीण आणि कृषी व्यवस्थेची भूमिका याबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते काल नवी दिल्लीत
बोलत होते. ग्रामीण भागात दळणवळणाची चांगली व्यवस्था, सिंचन व्यवस्थेत सुधारणा करणं,
प्रत्येक घरापर्यंत वीज पोहचवणं, चांगल्या आरोग्य व्यवस्था निर्माण करणं हे सरकारचं
उद्दिष्ट असल्याचं जेटली म्हणाले.
****
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची
सूत्रं राहुल गांधी यांनी काल नवी दिल्ली इथं स्वीकारली. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक
समितीनं राहुल गांधी यांना अध्यक्षपदाचं औपचारिक प्रमाणपत्र प्रदान केलं. मावळत्या
अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांच्यासह अनेक नेते यावेळी
उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी, देशातल्या तरुणांना एकत्र
येऊन देशाचा विकास करण्याचं आवाहन केलं. सध्याच्या सरकारचं राजकारण लोकांच्या कल्याणासाठी
राहीलेलं नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.
****
कोळसा घोटाळ्यात दिल्लीच्या विशेष न्यायालयानं
झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा, माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता यांना तीन वर्षाचा
तुरूंगवास आणि अनुक्रमे २५ लाख आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. झारखंडचे
माजी मुख्य सचिव ए के बसु आणि मधु कोडा यांचे निकटवर्तीय विजय जोशी यांनाही तीन वर्षाच्या
तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसंच या प्रकरणात न्यायालयानं कोलकात्याच्या विनी
आयर्न ॲण्ड स्टील उद्योग लिमीटेड या कंपनीलाही ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अनियमित
पद्धतीनं खाण वाटप करण्याचा आरोप सिद्ध झाल्यानं मधू कोडा यांच्यासह सर्व आरोपींना
कट रचणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली न्यायालयानं गेल्या बुधवारी दोषी ठरवलं होतं.
न्यायालयानं या निर्णयावर उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी दोन महिन्यांची स्थगिती
दिली आहे.
****
सर्वोच्च
न्यायालयानं वेगवेगळे दुखणे आणि आजारांसाठी नियमीत डोस म्हणून देण्यात येणाऱ्या ३४९
औषधींची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश, औषधी तांत्रिक सल्लागार मंडळाला दिले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयानं या औषधींवर बंदी आणण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय रद्दबातल
ठरवला आहे. केंद्र सरकारनं ही बंदी घालताना औषधी आणि सौंदर्यप्रसाधन उत्पादक कायद्याच्या
तरतुदींचं पालन करत नसल्याचं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मात्र, केंद्र
सरकारनं औषधी कायद्याच्या तरतुदीखालीच अध्यादेशाद्वारे या ३४९ औषधींवर बंदी आणली असल्याचं
सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मात्र याबाबत अधिक तपशील मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं
या औषधींची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
****
कोट्यावधी रूपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्यातला मुख्य
आरोपी अब्दुल करीम तेलगीच्या मालमत्तांची शहानिशा करून, त्या सरकारजमा कराव्यात आणि
या मुद्रांक घोटाळ्याचा फेरतपास करावा अशी मागणी तेलगीची पत्नी शाहिदा हिनं एका अर्जाद्वारे
विशेष न्यायालयाकडं केली आहे.
तेलगीचा महिन्याभरापूर्वीच बंगळुरू इथल्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घोटाळ्यात शाहिदा
हिलादेखील आरोपी करण्यात आलं होतं, मात्र न्यायालयानं तिची जामिनावर मुक्तता केली आहे.
****
नागपूर इथं काल पहिल्या जागतिक संत्रा महोत्सवाचं उद्धाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी
संत्रा प्रक्रिया उद्योगात तसेच संत्रा उत्पादनातील वाढीसाठी संशोधनाची गरज असल्याचं
सांगून झालेलं संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं
पाहिजे असं प्रतिपादन केलं. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात होणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा
असं आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह
अनेक मान्यवर महोत्सवाला उपस्थित होते.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्यात स्वतंत्र हवामान संशोधन केंद्र उभारण्याची गरज
असल्याचं परभणी इथल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू बी. वेंकटेश्वरलू यांनी
व्यक्त केली आहे. औरंगाबाद इथं हवामान बदल आणि त्यांचे कृषी आणि जल क्षेत्रावर होणारे
परिणाम या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी
ते काल बोलत होते. हवामान बदलाचा शेतीसह विविध क्षेत्रांवर विपरीत परिणाम होत असल्याचं
ते म्हणाले.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तूळजापूर तालुक्यातल्या
नळदुर्ग इथं काल ‘जिल्हास्तरीय बाल महोत्सवा’चं उद्घाटन, राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष
प्रवीण घुगे यांच्या हस्ते झालं. १८ वर्षांखालील मुलांमध्ये इंटरनेटचा वापर वाढत असल्यामुळे
उद्भवणाऱ्या समस्यांविषयी युनिसेफच्या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या बाल
महोत्सवाच्या आयोजनातून मुलांच्या विविध कलागुणांना वाव देण्याची गरज घुगे यांनी व्यक्त
केली. या दोन दिवसीय महोत्सवात अनाथ मुलांच्या विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
दुबई इथं सुरु असलेल्या दुबई सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत
भारताच्या पी.व्ही.सिंधुनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या
सामन्यात सिंधुनं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या अकाने यामागुची
हिचा अवघ्या ३६ मिनिटांत २१ - ९, २१ - १३ असा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. अंतिम सामना
आज पी.व्ही.सिंधु आणि चीनच्या चेन युफेई यांच्यात होणार आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान तिसरा आणि
शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना आज आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं खेळला जाणार
आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ
एक - एकनं बरोबरीत आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र
माळेगाव इथल्या खंडोबाच्या यात्रेला कालपासून सुरूवात झाली. दक्षिण भारतातली सर्वात
मोठी यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे. बेल -फुल भंडाऱ्याची उधळण आणि येळकोट येळकोट
जय मल्हारच्या गजरात हजारो भाविकांनी काल खंडेरायाचं दर्शन घेतलं.
****
आणि आता ऐकू या पॉझिटीव्ह इंडिया मोहिमे अंतर्गत एक सकारात्मक
बातमी…..
नाशिक इथले लघुउद्योजक योगेश रणधीर यांनी केंद्र सरकारच्या
लुघ उद्योजकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुद्रा योजनेतून आपल्या उद्योगाला भरारी दिली.
ऐकू या त्यांची ही यशकथा…….
नमस्कार, मि योगेश रणधीर आहे. मि नाशिक येथे राहतो.तसंच नाशिक
मध्थे उबंड एम.आय.डि.सी श्री बालाजी इंडस्ट्री
या नावाने माझी स्वॉम्ल स्किल्स इंडस्ट्रीज आहे. या युनिट मध्ये गेल्या दोन वर्षापासून
इयर कॉम्प्रेसरच्या रिलेटेड पार्ट मेनिफेकचरींग
करतो. दोन वर्षा पुर्वी माझा उद्योग हा एक छोट्या गाळया मधये सुरु केला होता . परंतु केंद्र सरकारणे
त्या उद्योगासाठी जि मदत मुद्रा योजना आणली त्या योजने अंतगर्त मि विदाउुट कौल अठ्ररा
सिटी म्हणजे कुठल्याही प्रकारची गांरटी किंवा
गॉरेटर न देता सहा लाख कर्ज घेउुन मशनरी वाढवल्या. आणि माझा उद्योगक वाढणयासाठी मदत झाली. या मुद्रा योजनांचा
मला खूप फायदा झाला. आणि आता माझ्या कडे
10 कामगार कामाला आसून साधारणतंहा 80 लाखा ते 1 करोड परीयंत माझी वार्षीक उलाढाल होत
असते. मांननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या योजना मुळे माझे आयुष्यंच बदलून गेले.
धन्यवाद माझे सरकार.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातल्या घारेगाव इथं
जलयुक्त शिवार अभियांनातर्गत सुखना नदीच्या खोलीकरणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी नवल किशोर
राम यांच्या हस्ते करण्यात आला. या नदीचं ६०० फुट रुंद आणि १२ किलोमीटर लांब खोलीकरण
करण्यात येणार आहे त्यामुळं आजूबाजूच्या सहा
गावांचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी मदत होणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यात वाळुची अवैध वाहतूक
करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनानं धडक कारवाई केली
आहे. काल पहाटे धामणी, वझुर तसंच खरबडा परिसरात वाळुचे ट्र्क पकडण्यात आले असून दोषींना
प्रत्येकी २० हजार आठशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती तहसिलदार श्याम मदनूरकर
यांनी दिली.
*****
No comments:
Post a Comment