आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
११ डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
गुजरातमध्ये निवडणूक आयोगानं
सहा मतदान केंद्रांवर आज फेरनिवडणुकीचे आदेश दिले आहेत. या मतदार संघात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं होतं. निवडणूक आयोगाच्या पत्रकाप्रमाणे ही
सहा मतदान केंद्रं अहमदाबाद, वडोदरा आणि बनासकांठा इथली आहेत. एका मतदान केंद्रावर अधिकारी मतदानाचं
प्रात्यक्षिक देण्यास विसरले तर वडगाव विधान सभेच्या दोन मतदान केंद्रांवर अपक्ष उमेदवार
जिग्नेश मेवान यांच्या ईव्हीएम मशीनवर शाईचे डाग आढळून आल्यानं भाजपच्या उमेदवारानं हरकत घेतल्यानं
पुनर्मतदान होणार आहे.
****
पर्यावरणाला नुकसान करणाऱ्या प्लास्टिकचा पुनर्वापर करता यावा, तसंच वाढत्या नागरिकरणामुळे दिवसेंदिवस
गंभीर होत असलेल्या घनकचरा व्यवस्थापनासाठी रासायनिक तंत्रज्ञान क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी
संशोधन करावं, असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई
यांनी केलं आहे. मुंबई इथं रासायनिक तंत्रज्ञान संस्थेच्या वतीनं आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या
सत्कार आणि तिसाव्या वार्षिक मेळाव्यात ते बोलत होते. शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक
क्षेत्रानं समन्वयानं काम करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
****
औरंगाबाद इथल्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीतल्या प्रलंबित कामांसाठी शासनाकडे
पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद
इथं यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. वैद्यकीय सेवेबाबत दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई
केली जाईल असा इशारा खैरे यांनी यावेळी दिला.
****
नागपूर इथं काल
पहिल्या जागतिक संत्रा महोत्सवाचं उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
झालं. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी, संत्रा प्रक्रिया उद्योगात तसंच संत्रा उत्पादनातल्या
वाढीसाठी संशोधनाची गरज असल्याचं सांगून, झालेलं संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे
असं मत व्यक्त केलं.
*****
No comments:
Post a Comment