Friday, 15 December 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 15.12.2017 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 December 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ डिसेंबर २०१७ सकाळी .५० मि.

****

·       संसदेच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ; २५ विधेयकं चर्चेला येणार

·       राज्यातला एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·       राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा विलगीकरणासाठी फ्रॅक्सिनेशन सेंटर सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार

आणि

·       राज्यातल्या चार नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्ता

****

आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर काल केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या धिवेशनात २५ विधेयकं मांडली जाणार असून यामध्ये तिहेरी तलाक, तसंच मागासवर्गीय आयोगाच्या घटनात्मक स्थितीबाबतची विधेयकं मंजुरीसाठी येण्याची अपेक्षा आहे.

****

राज्यातला एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देत बोगस खातेधारकांना योजनेच्या लाभापासून रोखता यावं आणि त्याची पारदर्शक अंमलबजावणी करण्याच्या उद्देशानंच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विधानसभेत या संदर्भात विरोधी पक्षाच्यावतीनं उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देतांना ते बोलत होते.

या योजनेतून आतापर्यंत ४३ लाख १६ हजार ७६८ शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाली आहे, अर्ज केलेल्या उर्वरीत शेतकऱ्यांच्या अर्जातल्या त्रुटी दूर करुन त्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले.

विधान परिषदेत या विषयावरच्या चर्चेला सुरूवात करताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारविरूद्ध जोरदार टीका करत सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली, आणि शिवसेनेनं फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं राजकारण केलं, असा आरोप केला. या चर्चेत बोलताना भाजपाचे सुजित सिंह ठाकूर यांनी, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक उपाययोजना करत असल्यानं शेतकऱ्यांचा या सरकारवर विश्वास आहे, असं सांगत विरोधकांचे आरोप फेटाळले.

****

मुस्लिम आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळाल्यानं विधानपरिषदेत काल विरोधकांनी सरकार विरोधी घोषणा देत सभात्याग केला. मुस्लिम समाजाला शासकीय सेवा आणि शैक्षणिक सोयी सुविधांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्यासंदर्भात संबंधित आमदार आणि अन्य लोकांची राज्याच्या महाधिवक्त्यांसोबत बैठक घेऊन त्यांची याबाबतची मतं जाणून घ्यावीत, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात राज्य सरकारला दिले. काँग्रेसचे संजय दत्त यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारची भूमिका अल्पसंख्याकांविरोधी असल्याचा आरोप केला. विविध धर्मातल्या मागास घटकांना आरक्षण मिळावं, हीच सरकारची भूमिका असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात रक्तातील प्लाझ्मा विलगीकरणासाठी फ्रॅक्सिनेशन सेंटर सुरु करण्याचं विचाराधीन असल्याचं आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काल विधानसभेत सांगितलं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. रक्ताच्या विहित दरापेक्षा जास्त दर आकारणाऱ्या ७२ रक्तपेढ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुख्य इमारत आणि कार्यशाळा इमारत दुरूस्तीच्या बांधकामासाठी एक कोटी ४७ लाख रूपयांचा निधी देण्यात येणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारत दुरूस्ती बांधकामासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

****

आयएनएस कलवरी या स्कॉर्पिन श्रेणीतल्या पहिल्या पाणबुडीचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आलं. कलवरीची शक्ती, भारतीय नौदलाला अधिक मजबूत करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राज्यातल्या चार नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला आहे. यात हुपरी, किनवट, शिंदखेडा, या नगरपरीषदा आणि फुलंब्री या नगरपंचायतीचा समावेश आहे. ठाणे जिल्हा परिषदेत मात्र शिवसेनेला सर्वाधिक ५२ पैकी २५ जागा मिळाल्या आहेत. अमरावतीतली चिखलदरा नगरपरीषदेत काँग्रेस, यवतमाळमधधली पांढरकवडा प्रहार संघटना, गडचिरोलीतल्या एटापल्ली नगरपरीषदेत आदिवासी विद्यार्थी संघटना आणि गोंदियातली सालेकसा नगरपंचायतीत अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

नांदेड जिल्ह्यातल्या किनवट नगर परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे आनंद मच्चेवार विजयी झाले. १८ नगरसेवक पदांपैकी भाजप नऊ, राष्ट्रवादी कॉँग्रेस सहा, काँग्रेस दोन आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाला.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपचे सुहास सिरसाट विजयी झाले. एकूण १७ जागांपैकी भाजपनं ११, फुलंब्री विकास आघाडीनं चार आणि एमआयएमनं एका जागेवर विजय मिळवला.

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार ज्योती सरवदे या विजयी झाल्या आहेत.

****

उस्मानाबाद इथं आजपासून राज्यस्तरीय अंध कल्याण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे, याविषयीची अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…….

१५ ते १९ डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीनं राज्यस्तरीय शैक्षणिक अंधकल्याण सप्ताह ‘सामर्थ्य २०१७’ चं आयोजन करण्यात आलं आहे.यात राज्यातील १९ अंध शाळातील चारशे विद्यार्थी सहभागी होत आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, ब्रेल वाचन, निबंध लेखन, वकतृत्व स्पर्धा, बुध्दीबळ, क्रिकेट यासारख्या बारा प्रकारातून क्रीडा स्पर्धा या दरम्यान होणार आहेत. दृष्टी हे सृष्टीचं अनमोल देणं आहे. त्यामुळे दृष्टी वाचवा हा संदेश यातून दिला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाचे उपाध्यक्ष रघुनाथ बराड यांनी दिली.

****

जालना इथं आजपासून जालना एक्स्पो या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्योगांना चालना देण्यासाठी तसंच उद्योजकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शहरातले उद्योजक दर पाच वर्षांनी हे प्रदर्शन भरवतात. १७ डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे.

****

आणि आता ऐकू या पॉझिटीव्ह इंडिया मोहिमे अंतर्गत एक सकारात्मक बातमी…..

नाशिक जिल्ह्यातल्या किरण गाढे यांनी मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन व्यवसाय वृद्धी साधली. ऐकू या त्यांची ही यशकथा

नमस्कार मी किरण साईनाथ गाढे मी नाशिकला राहतो. माझा फोटोग्राफीचा बिझनेस आहे.सुरूवातीला माझ्याकडे फोटोग्राफीसाठी जास्त इक्वीपमेंटस्‍ नव्हतं. इक्वीपमेंटस्‍ वाढवण्यासाठी मी काही बँकमध्ये लोनसाठी प्रपोजल दिलं होतं.पण बँकेचे व्याजदार जास्त असल्याकारणानं मी ते कॅन्सल केलं.२०१५ मध्ये जेव्हा मला या केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेबद्दल माहिती मिळाली.त्यांनतर मी या योजनेची पूर्ण माहिती काढली.आणि  माझ्या परिसरात एक जवळ असलेल्या नॅशनलाईज बॅंकेमध्ये जाऊन मी तिथल्या बँकमॅनेजरकडे इनक्वायरी केली. अगदी पंधरा दिवसाच्या आता बँकने मला सर्वात कमी व्याजदर असलेलं सातलाख रूपयाचं मुद्रा लोन मंजूर केलं. आज माझ्या बिझनेसमध्ये मला जे इक्वीपमेंटस्‍ कमी पडत होते. ते सर्व माझ्याकडे उपलब्ध आहे. आज माझ्या बिझनेसमध्ये माझं ॲन्यूअल इनकमसुध्दा वाढलं आहे. माझ्याकडे अनेक क्लाईटंस वाढले आहेत.आणि हे सगळे शक्य झाले ते फक्त केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेमुळेच शक्य झाले.



****

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई जवळ वरवटी गावाजवळ राज्य परीवहन महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. काल सकाळी हा अपघात झाला. 

****

No comments:

Post a Comment