Sunday, 3 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.06.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



आज पहिला जागतिक सायकल दिवस पाळण्यात येत आहे. वाहतुकीच्या साध्या, योग्य, विश्वासनीय, स्वच्छ, पर्यावरण अनुकूल पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं तीन जून रोजी जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. यानिमित्त नवी दिल्लीत आज सकाळी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सायकल दौडला सुरुवात केली. केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन, संसदीय कार्य राज्यमंत्री विजय गोयल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

****



 जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगभरातल्या एकूण बँक खात्यांपैकी भारतातल्या बँक खातेदारांची संख्या ५५ टक्के आहे, असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं आहे. केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, गुजरातमध्ये अहमदाबाद इथं त्या काल वार्ताहरांशी बोलत होत्या. जनधन योजनेद्वारे ३१ कोटी ५० लाख लोक बँकींग व्यवस्थेशी जोडले गेले, असं त्या म्हणाल्या.

****



 केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं काल पुण्यातल्या आकुर्डी इथल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातल्या एका अंमलबजावणी अधिकाऱ्याला अटक केली. हा अधिकारी वीस हजार रुपयांची लाच घेत असताना त्याला सीबीआयनं ताब्यात घेतलं. या अधिकाऱ्याला आज पुण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

****



 अहमदनगर जिल्ह्यातल्या  कोल्हार खुर्द शिवारात गवत खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेतून २१ जनावरं दगावल्याची घटना घडली. यात १४ मेंढ्या, चार शेळ्या, तीन कोकरू दगावले असून, दीड ते दोन लाखाचं नुकसान झालं आहे. पशु  वैद्यकीय आधिकऱ्यांनी सागितलं

****



 बहुजन समाजाला एकसंघ करून विषमतावादी व्यवस्थेविरोधात संघर्ष करण्याच्या हेतूनं  सुरू झालेल्या परिवर्तन यात्रेचं काल अहमदनगर इथं आगमन झालं. बहुजन क्रांती पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेतून राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यात एकशे अकरा ठिकाणी सभा घेण्याचा आयोजकांचा मानस असून आतापर्यंत पस्तीस जिल्ह्यांतल्या सभा पार पडल्या आहेत.

****



 हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या जरोडा गावाच्या जलसंधारणाच्या कामांची काल दक्षता पथकानं पाहणी केली. या कामाबाबत पथकानं समाधानकारक अभिप्राय दिला. जरोडा गावातल्या पाणी फाऊंडेशनच्या कामाची पाहणीही यावेळी करण्यात आली.

*****

***

No comments:

Post a Comment