Saturday, 14 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.07.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१४  जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 ओडीशा मधल्या जगन्नाथ पुरीच्या प्रसिद्ध रथ यात्रेला आज पासून प्रारंभ होत आहे. आषाढ शुद्ध द्वितीयेला हा महोत्सव दरवर्षी साजरा होतो. भगवान जगन्नाथ-म्हणजेच श्रीकृष्ण, त्याचे वडील बंधू बलभद्र-आणि बहीण देवी सुभद्रा यांच्या मूर्ती मंदिरा बाहेर आणून रथातून वाजत गाजत मिरवणूकीनं श्री गुंडीचा मंदिरात नेण्यात येतात. तिथे या दैवतांचा मुक्काम नऊ दिवस असतो. हा रथ ओढण्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक हातभार लावतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रथयात्रे निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

****



 लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका मुदतपूर्व होण्याची शक्यता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी फेटाळून लावली आहे. हैद्राबाद इथं काल ते पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांच्या बैठकीत बोलत होते.

****



 बीड जिल्ह्यात काल विविध अपघातात चार जण ठार झाले तर, सहा जण जखमी झाले. बीड गेवराई मार्गावर पाडळशिंगी जवळ ट्र्कनं दुचाकीला आणि कारला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला.



 दुसऱ्या एका अपघातात वडवणी तालुक्यात पोखरी फाट्या जवळ डंपरनं दुचाकीला मागून धडक दिल्यानं दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

 अन्य एका अपघातात धारुर अंबाजोगाई मार्गावार कार आणि दुचाकीची समोरा-समोर धडक झाल्यानं दुचाकीवर जात असलेले आडसचे माजी सरपंच विष्णू पोटे यांचा जागीच मृत्यू झाला.

****



 राज्यस्तरीय पोषण अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ काल नागपूर इथं ग्रामविकास आणि महिला तसंच  बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. बालमृत्यू थांबवण्यासाठी तसंच कुपोषण निर्मूलनासाठी या कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, असं आवाहन मुंडे यांनी यावेळी केलं.

****



 महिला सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्य पातळीवर ‘महिला सेफ्टी ऑडिट’ हा पथदर्शी उपक्रम हाती घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काल जालना इथं ही माहिती दिली. या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातल्या चार गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन करून गाव आणि वॉर्ड पातळीवर दबाव गट तयार केला जाईल असं त्यांनी सांगितलं.

*****

***

No comments:

Post a Comment