Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 08 August 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८
ऑगस्ट २०१८ सकाळी ६.५० मि.
****
vइतर
मागासवर्गीय विकास महामंडळाला ५०० कोटी रुपये निधी जाहीर
vमराठा
आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असतांना आंदोलन करू नये - मुंबई उच्च न्यायालय
vतामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांचं निधन
vराज्य सरकारी कर्मचारी संपाला काल राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद
आणि
vविठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार साहित्यिक रा. रं. बोराडे यांना जाहीर
****
आगामी
दोन वर्षांच्या अर्थसंकल्पात इतर मागासवर्गीय विकास महामंडळाला ५०० कोटी रुपये
निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत
ओबीसींच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेत ते काल बोलत
होते. महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी
केंद्र सरकारकडे शिफारस करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ओबीसी
प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातल्या १९ जिल्ह्यांमध्ये नवीन
वसतीगृह बांधणार असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, ओबीसींच्या
आरक्षणानुसार नोकरी देण्यास शासन कटीबद्ध असल्याचंही नमूद केलं.
****
प्रधानमंत्री
आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संयुक्त भागीदारी धोरणास राज्य
मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, महाराष्ट्र ही कंपनी स्थापन करण्यासही मंत्रिमंडळानं काल मान्यता
दिली. न्यायालयांमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध
करून देण्यासाठी पायाभूत सुविधा धोरणाच्या आर्थिक अधिकारामध्ये वाढ करण्यास मंत्रिमंडळानं
मंजुरी दिली.
****
मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असतांना मराठा
समाजानं आंदोलन करू नये, असं आवाहन मुंबई उच्च न्यायालयानं केलं आहे. राज्यात मागासवर्ग
आयोगानं मराठा आरक्षणाच्या शिफारशी लवकराव लवकर द्याव्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका
मराठा क्रांती मोर्चानं दाखल केली असून त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे आवाहन
केलं. न्यायालयानं समाजाच्या मागण्यांची आणि परिस्थितीची दखल घेतली असून, हिंसक आंदोलन
किंवा आत्महत्या करू नये, असं न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई
यांनी नमूद केलं आहे. या प्रश्नी आयोगानं आपल्या अहवालाच्या प्रगतीचा आढावा १० सप्टेंबरला
सादर करावा, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
****
मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातल्या परळी इथं सुरू
असलेलं ठिय्या आंदोलन, मराठा क्रांती मोर्चानं ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित केलं आहे.
उपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे आणि तहसीलदार शरद झाडके यांनी काल आंदोलकांना अपेक्षित
लेखी पत्र दिल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचं आमच्या बीड इथल्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
मराठा, धनगर, मुस्लिम
समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरु आहे. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत हे उपोषण
मागे घेणार नसल्याचं आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. मराठा आरक्षणप्रश्नी मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्य समन्वयकांची
आज औरंगाबाद इथं तातडीची बैठक होत असून, उद्याच्या प्रस्तावित राज्यव्यापी आंदोलनाबाबत
या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
नांदेड
शहरात काल खासदार अशोक चव्हाण, आमदार
डी पी सावंत आणि आमदार अमर राजूरकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी
हे सर्व लोकप्रतिनिधी आंदोलकांसोबत रस्त्यावर बसून होते, असं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली, बुलडाणा जिल्ह्यातही आज आंदोलन करण्यात
आलं. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी काल जालना
जिल्ह्यातल्या बदनापूर, जाफराबाद इथल्या तहसील कार्यालयासमोर शेळी, मेंढ्यांसह
आंदोलन करण्यात आलं.
****
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र
कळघम-डीएमके पक्षाचे प्रमुख एम.करुणानिधी यांचं काल संध्याकाळी चेन्नई इथं निधन झालं.
ते ९४ वर्षांचे होते. मूळचे लेखक असलेले करुणानिधी यांची अनेक नाटकं, कथा कादंबऱ्या
प्रसिद्ध आहेत. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी कथालेखन केलं. त्यांनी १९६९ पासून २०११
पर्यंत पाच वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रिपद भुषवलं, द्रविड मुन्नेत्र कळघम - द्रमुक
या पक्षाच्या अध्यक्षपदाची सलग पन्नास वर्षांची कारकीर्द त्यांनी गेल्या महिन्यात पूर्ण
केली होती.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी करुणानिधी
यांना श्रध्दांजली वाहिली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पुकारलेल्या
संपाला काल राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. या तीन दिवसीय संपात राज्यातले जवळपास
१७ लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत. मात्र, राजपत्रित अधिकारी या संपात सहभागी झाले
नाहीत. दरम्यान या संपातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या नसल्यानं, रूग्णांचे हाल
झाले. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनाही या संपात सहभागी झाल्यानं काही ठिकाणी
शाळा महाविद्यालयं बंद होती. मराठवाड्यातही या संपाचा परिणाम दिसून आला. औरंगाबाद जिल्हा महसूल कर्मचारी संघटना या संपात सहभागी
झाली असून, यामुळे महसूल विभागातलं कामकाज काल जवळपास बंद होतं. लातूर जिल्ह्यात या संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा कर्मचारी
संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बी बी गायकवाड यांनी केला आहे. उस्मानाबाद
तसंच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर परभणी इथं जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांनी निर्दशनं केली.
हिंगोली जिल्ह्यात कर्मचाऱ्यांनी या संपाला पाठिंबा देत काळ्या फिती लावून काम केलं.
जालना, बीड, जिल्ह्यातले
कर्मचारीही या संपात सहभागी झाले आहेत.
****
सहकार
चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावे देण्यात येणारे राज्यस्तरीय
साहित्य पुरस्कार काल जाहीर झाले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव
विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे
यांना जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार बाबाराव मुसळे, तर
विठ्ठलराव विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार महेश लोंढे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार
निवड समितीचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांनी ही घोषणा केली.
****
नांदेडच्या
इसाप प्रकाशन संस्थेचा साहित्यिक कृतज्ञता गौरव मानकरी पुरस्कार यंदा मुखेडचे
निवृत्ती चांडोळकर, नांदेडचे भगवान अंजनीकर आणि कळमनुरीचे विजय वाकडे यांना
जाहीर झाला आहे. सुवर्ण पदक, मानपत्र आणि शिवचरित्रग्रंथ असं या पुरस्काराचं स्वरुप
आहे.
****
औरंगाबाद इथं ५७ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा
आणि १५ वी राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतल्या औरंगाबाद विभागाचे पारितोषिक
काल वितरीत करण्यात आले. विभागातल्या औरंगाबाद, बीड आणि नांदेड या स्पर्धा केंद्रावरील
प्राथमिक फेरीतील प्राप्त कलाकारांचा नाट्य क्षेत्रातल्या ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते
प्रमाणपत्र, रौप्यपदक आणि धनादेश देऊन गौरविण्यात आलं. त्याचप्रमाणे उत्कृष्ट नेपथ्य,
प्रकाश योजना, दिग्दर्शन, रौप्य पदके आणि अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे यावेळी वितरीत
करण्यात आली.
****
राज्यात प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत जुलै अखेर ५७ हजार ४४३ कोटी रुपये कर्ज
वितरित करण्यात आलं असून आतापर्यंत एक
कोटीहून अधिक कर्ज प्रकरणं मंजूर करण्यात आली आहेत. परभणी जिल्ह्यातल्या दुर्गाबाई दहीवाल यांनी मुद्रा योजनेअंतर्गत
आठ लाख रूपये कर्ज घेऊन आपल्या बेनटेक्स ज्वेलरी व्यवसायाला नवी उभारी दिली आहे. आपल्या
या लाभाविषयी दहीवाल यांनी माहिती दिली. त्या
म्हणाल्या…
दुर्गाबाई दहीवाल परभणी
सुभाषरोड भागात इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे. कमी भांडवलामुळे मर्यादा पडत होत्या.
त्यातच पंतप्रधान मंत्री मुद्रा योजना आली. सर्व कागदपत्र दाखल करून बॅक ऑफ बडोदा कडून
आठ लाख रूपयांचे कर्ज घेतले. खेळते भांडवळ मिळाल्या मुळे व्यवसाय वाढू लागला. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे
व्यवसायात प्रगती साधता आली.
****
ग्रामीण
जीवननोन्नती अभियानांतर्गत जालना
इथं जिल्हा परिषद शाळेत पाचवी ते बारावीपर्यंत
शिक्षण घेणाऱ्या अकरा हजार विद्यार्थिनींना काल ‘अस्मिता
माझा गौरव, माझा हक्क’ स्मार्ट कार्डचं वाटप करण्यात आलं. हे
स्मार्ट कार्ड असणाऱ्या मुलींना बचत गटाच्या माध्यमातून केवळ पाच रुपयांमध्ये सॅनिटरी
नॅपकीन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अंगणवाडी ते बारावीपर्यंत
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची तालुकानिहाय शिबीरं घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना
प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष अर्चना पाटील यांनी काल
ही माहिती दिली. चालू वर्षात दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीची अवजारं तर अपंग कल्याण निधीतून
वैयक्तिक बोअरवर मोटार बसवण्यात येणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
****
परभणी शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती तसंच
वैद्यकीय सहाय्यक आणि आरोग्य समिती सभापतींची निवडणूक उद्या होणार आहे. यासाठी आज कामकाजाच्या
दिवशी कार्यालयीन वेळेत नगर सचिव कार्यालयात अर्ज स्वीकारले जातील.
*****
***
No comments:
Post a Comment