▼

Saturday, 18 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.08.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१८  ऑगस्ट  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 पाकिस्तानमधे तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी आज पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. इस्लामाबादच्या प्रेसिडंट हाऊस मधे हा सोहळा पार पडला. इम्रान खान यांची काल संसदेतल्या नवनिर्वाचित सदस्यांनी पंतप्रधान म्हणून निवड केली. इम्रान खान यांना एकशे सदूसष्ठ मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज पक्षाचे प्रमुख शहबाज शरीफ यांना ९६ मतंच मिळू शकली.

****



 नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६० पूर्णांक ३३ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ७१ पूर्णांक ८७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातल्या १६ पैकी आठ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. किनवट आणि माहूर तालुक्यात पैनगंगा नदीला काल पूर आला होता, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या ५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. नांदेड शहरात आज पहाटे मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 महावितरण वीज कंपनीच्या लघुदाब वाहिनीतून वीज चोरी केल्याप्रकरणी औरंगाबादच्या सिडको पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. श्याम खातोड असं या व्यक्तीचं नाव असून गेल्या दोन वर्षापासून ही वीज चोरी सुरू होती. या काळात ४७ हजार ३२२ युनिट वीज चोरी करून दोन लाख ७१ हजार ३०६ रूपयाचं आर्थिक नुकसान झालं असल्याचं वीज वितरण कंपनीनं दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे

****



 शेतकऱ्यांना पावसाचा अचूक अंदाज देता यावा यासाठी कृषी विभागाच्या वतीनं रायगड जिल्ह्यातल्या पंधरा तालुक्यात ६० स्वयंचलित हवामान केंद्रं कार्यान्वित करण्यात आली आहेत. यंदाच्या खरीप हंगामापासूनच या स्वयंचलित हवामान केंद्राचा वापर प्रायोगिक तत्वावर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके यांनी दिली. उपग्रहाशी संलग्न ६० स्वयंचलित हवामान केंद्रात प्रत्येक १० मिनिटांनी हवामान विषयक नोंदी संकलित केल्या जातील, त्याच्या आधारे पावसाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांना देणं शक्य होईल.

****



 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमानी योजनेअंतर्गत भूमिहीन अनुसूचित आणि नवबौद्ध कुटुंबांना भूखंड वितरीत करण्यासाठी, भूसंपादन करणाऱ्या समितींची जिल्हानिहाय रचना होणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला जमीन खरेदीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येईल आणि उरलेल्या ५० टक्के रक्कमेसाठी व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करुन दिलं जाणार आहे.

*****

***

No comments:

Post a Comment