Thursday, 4 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.10.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

४ ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या सुधारणांशिवाय संयुक्त राष्ट्राच्या सुधारणा पूर्ण होऊ शकत नाहीत, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनात संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. सुरक्षा परिषदेच्या सध्याच्या स्थायी सदस्यत्वामध्ये पारंपारिक जागतिक वास्तवाचं प्रतिबिंब उमटत नाही, असं राष्ट्रपती म्हणाले. परिषदेच्या सदस्यत्व आणि कार्य पद्धतींमध्ये एकविसाव्या शतकातली आव्हानं लक्षात घेऊन बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****



 रिझर्व्ह बँकेच्या विशिष्ट निर्देशांची पूर्तता न केल्याबद्दल, तसंच इतर कारणांसाठी फेडरल बँकेला पाच कोटी रुपयांचा दंड रिझर्व्ह बँकेनं ठोठावला आहे. जोखमीबाबतच्या सर्वेक्षणांतर्गत मूल्यांकनासाठी मोठ्या कर्जदारांबाबतचा अहवाल फेडरल बँकेनं दिलेला नाही, एटीएमशी संबंधित तक्रारींच्या निराकरणाला विलंब झाल्याबद्दल ग्राहकांना नुकसान भरपाई दिली नाही, शिवाय केवायसी आणि काळा पैसा पांढरा करण्याला प्रतिबंध करण्यासाठीच्या निकषांचं पालनही फेडरल बँक करत नसल्याचं आढळून आलं आहे.

****





 महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूकीसाठी मोठी संधी असल्याचा विश्वास राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ऊर्जा परिषदेचं उद्घाटन काल नवी दिल्लीमध्ये झालं, त्यांतर ते बोलत होते. महाराष्ट्रात आतापर्यंत आठ हजार तीनशे त्रेचाळीस मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण केली गेली असून, भविष्यात इथं बासष्ट गीगा वॅट सौरऊर्जा निर्माण केली जाऊ शकते, अशा स्थितीत विजेचे दर कमी होऊन उद्योजकांना तसंच खाजगी वापरकर्त्यांनाही लाभ होऊ शकतो, असं बावनकुळे यांनी सांगितलं. या परिषदेमध्ये पन्नासहून जास्त देश सहभागी झाले आहेत.

****



 लातूर इथं येत्या सात ऑक्टोबरला अटल महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. लातूर, औसा, रेणापूर, निलंगा आणि शिरूर अनंतपाळ या पाच तालुक्यातल्या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी गरजू रुग्णांनी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्वतपासणी करून घेऊन नोंदणी करावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

*****

***

No comments:

Post a Comment