Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 4 August 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
४ ऑगस्ट २०१८
दुपारी १.००
वा.
****
मुंबईचा अष्टपैलू क्रिकेटपटू पृथ्वी शॉनं कसोटी क्रिकेट
पदार्पणातच शतक झळकावलं आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात दोन कसोटी सामन्यांच्या
मालिकेला आजपासून गुजरातमधल्या राजकोट इथं सुरुवात झाली. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक
जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या पृथ्वीनं लोकेश राहुल बाद झाल्यावर,
चेतेश्वर पुजाराच्या साथीनं खेळताना ९९ चेंडूत शतक झळकावलं. अशी कामगिरी करणारा तो
जगातला सर्वात कमी वयाचा चौथा, तर पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
दरम्यान,
अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या १८६ धावा झाल्या असून, पृथ्वी शॉ १०२ धावांवर
तर चेतेश्वर पुजारा ७८ धावांवर खेळत आहे.
वेस्ट इंडीजच्या
या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांसह पाच एक दिवसीय किक्रेट सामने तसंच तीन टी ट्वेंटी
सामने खेळवले जाणार आहेत.
****
देशात अवैधरित्या राहत असलेल्या
सात रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारध्ये परत पाठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं परवानगी
दिली आहे. म्यानमारनं या रोहिंग्याचा त्यांचे नागरिक म्हणून स्वीकार केला आहे. या रोहिंग्यांच्या
प्रत्यर्पण निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्यानं न्यायालयानं म्हटलं आहे. या सातही रोहिंग्यांना
विदेशी अधिनियमा अंतर्गत दोषी ठरवण्यात आल्याचं केंद्र सरकारनं न्यायालयात सांगितलं.
म्यानमार सरकारनं या नागरिकांचं ओळखपत्र आणि व्हिसा जारी केल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं सरकारी तेल कंपन्यांना दीर्घकालीन
खेळत्या भांडवलासाठी परदेशातून कर्ज घेण्याची परवानगी दिली आहे. रिजर्व्ह
बँकेनं आपलं धोरण शिथील करत, सरकारी तेल कंपन्यांना दहा अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत
कर्जाची परवानगी दिली. आतापर्यंत भारतीय तेलकंपन्यांना दीर्घकालीन खेळत्या भांडवलासाठी
परदेशातून कर्ज घ्यायला परवानगी नव्हती. मात्र आता
रिझर्व्ह बँकेनं तीन ते पाच वर्ष मुदतीसाठी
किमान कर्ज घेण्याची परवानगी दिली आहे.
****
माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या न्यायालयानं
सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय पुढल्या वर्षी १८ ते २१
फेब्रुवारी दरम्यान सुनावणी करणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या संकेतस्थळावर आणि
संयुक्त राष्ट्राच्या ऑनलाईन दूरचित्रवाहिनीवरुन या सुनावणीचं इंग्रजी आणि फ्रेंच भाषेमधून
थेट प्रसारण केलं जाईल, असं संयुक्त राष्ट्राच्या न्याय विभागानं जारी केलेल्या
प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. जाधव यांच्यावर पाकिस्ताननं हेरगिरीचा आरोप केला आहे.
भारतानं हे आरोप फेटाळले असून, जाधव हे
इराणमध्ये व्यवसायासाठी गेले असताना
तिथून त्यांचं अपहरण करण्यात आल्याचं म्हटलं आहे. पाकिस्ताननं व्हिएन्ना करारातल्या
तरतुदींचं उल्लंघन केलं असून, याप्रकरणी भारतानं हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे
दाद मागितली आहे.
****
व्यापार सुलभतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं
राज्य वस्तू सेवा कराच्या रचनेत ३१ सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार हॉटेल, उपाहारगृह, आणि
व्यापाऱ्यांना आता कर परतावा लवकर मिळेल, सर्व प्रकारच्या सरकारी कंत्राटांची
देयकं चुकती करताना दोन टक्के टीडीएस आकारला जाईल. कितीही
उद्योग असले तरी एकच जीएसटी क्रमांक देण्याचा नियम बदलला असून आता व्यापाऱ्याला वेगवेगळ्या
उद्योगांसाठी वेगवेगळे जीएसटी क्रमांक घेता येतील. हे बदल एक ऑक्टोबरपासून लागू असतील, असं
अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
****
केंद्र सरकारने रब्बी हंगामासाठी आधारभूत किंमतीत
केलेली वाढ, शेतमालाच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ पाहता, अत्यंत तुटपुंजी असल्याची
टीका, राज्य किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ.
अजित नवले यांनी केली आहे. ते आज अहमदनगर इथं बोलत होते. उत्पादन खर्चात होणारी वाढ
आणि उत्पादनात होणारी घट याचा विचार करता, आधारभूत किंमतीत रास्त वाढ करावी अशी मागणी,
त्यांनी केली आहे.
****
येत्या दहा तारखेपासून राज्यातल्या शेतकऱ्यांच्या
मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची योजना सुरू केली जाणार असून, याचा लाभ तीन लाख युवकांना
होणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीनं दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य
विकास मंत्र्यांच्या परिषदेत ते काल बोलत होते. या योजनेअंतर्गत शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या
उपकरणांच्या दुरूस्तीचं कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार असून, यामुळे गावामध्येच रोजगार
निर्मिती होईल, असं पाटील यांनी सांगितलं. राज्यात सहा कौशल्य आधारित विद्यापीठं उभारण्याचा
राज्य सरकारचा मानस असून, राज्य सरकार लवकरच युवा सशक्तीकरण योजना सुरू करणार असल्याचंही
पाटील यांनी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment