आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
६ ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
जागतिक अर्थव्यवस्थेत भारत एखाद्या
उज्ज्वल ताऱ्याप्रमाणे आपलं स्थान प्रबळ करत असून सरकार अर्थव्यवस्थेला मजबूती देण्यासाठी
अनेक सुधारणात्मक कार्यक्रम हाती घेत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. नवी दिल्लीत काल आयोजित भारत-रशिया व्यापार शिखर संमेलनात ते बोलत होते. केंद्र
सरकारनं प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक क्षेत्रात अनेक सुधारणात्मक कार्यक्रम राबवले असून, जनतेला
उत्तम सोयीसुविधा देणाऱ्या भारताचं निर्माण करण्यासाठी आपण वचनबध्द असल्याचंही पंतप्रधान
यावेळी म्हणाले. दरम्यान, भारत आणि रशियात औद्योगिक सहकार्य पुढे वाढवण्याची आवश्यकता
असल्याचं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद शहरातल्या उल्कानगरी वॉर्ड मधल्या भारतीय
जनता पक्षाच्या माजी नगरसेविका अंजली कोंडेकर यांचं आज निधन झालं, त्या ५५ वर्षांच्या
होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होत्या. त्यांच्या
पार्थिव देहावर आज प्रताप नगर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
नांदेड ते जम्मूतावी या नव्या हमसफर साप्ताहिक रेल्वेगाडीला
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री हरसिमरत कौर यांनी काल नांदेड इथं हिरवा
झेंडा दाखवला. ही गाडी अकोला मार्गे धावेल.
दरम्यान, नांदेड स्थानकाहून ही गाडी सुटत असताना
कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. जम्मू तावी ऐवजी मुंबईसाठी गाडी सुरु
करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
****
जालना शहराला पाणीपुरवठा
करणाऱ्या जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी विशेष पोलिस
पथक नियुक्त करावं अशी मागणी जालना नगरपालिकेनं औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक
प्रकाश मुत्याल यांच्याकडे केली आहे. जालन्याच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, मुख्याधिकारी
संतोष खांडेकर, माजी आ़मदार कैलास गोरंट्याल यांनी काल औरंगाबाद इथं पोलीस महानिरीक्षकांची
भेट घेतली. दरम्यान, पाणीचोरी टाळण्यासाठी जे पोलीस पथक नियुक्त केलं जाईल, त्याचा
खर्च जालना पालिका पोलीस प्रशासनाला देईल, याबाबतच पत्र यावेळी पोलीस महानिरीक्षकांना
देण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment