आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
८ ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय वायू दलाचा आज शहाऐंशीवा स्थापना दिन आहे.
या निमित्त आज गाझियाबाद इथल्या वायू दल केंद्रात
विशेष संचलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गेल्या आठ दशकात तंत्रज्ञानातले अनेक बदल
स्वीकारत वायू दलानं स्वत:ला सक्षम आणि सामर्थ्यवान बनवलं आहे. भारतीय सीमेची सुरक्षा
करण्यासोबतच विविध नैसर्गिक आपत्तींदरम्यान मदतकार्य करण्यात भारतीय हवाईदलाचा महत्त्वपूर्ण
सहभाग राहिला आहे. भारताच्या हवाई सीमांचं रक्षण करणाऱ्या वीरांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा
संपूर्ण देश आभारी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये आज शहरी भागातल्या स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकीचं पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. जम्मू, काश्मीर आणि लडाख
या तीन विभागातल्या चारशे बावीस प्रभागांसाठीचं हे मतदान आज सकाळी सात वाजल्यापासून
सुरू झालं आहे. काश्मीरमध्ये या निवडणुकीत पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा
वापर होत आहे.
****
जंगली जनावरांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानाला
आता पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत संरक्षण मिळणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री राधा
मोहन सिंह यांनी ही माहिती दिली आहे. सध्या निवडक जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर
या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पूर, भूस्खलन आणि गारपीट यामुळे झालेलं नुकसानही
या योजनेअंतर्गत संरक्षित करण्यात आलं आहे.
****
विमान प्रवासातल्या अतिरिक्त सामानावर लावण्यात येणाऱ्या
शुल्कात मोठी वाढ केल्याबद्दल संसदीय समितीनं सगळ्या खाजगी विमान कंपन्यांकडून स्पष्टीकरण
मागवलं आहे. विदेशी कंपन्यांच्या तुलनेत हे दर कसे आहेत, याचा अहवाल सादर करण्याचे
निर्देशही या कंपन्यांना देण्यात आले आहेत.
****
अरबी समुद्रात
निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तामीळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि लक्षद्वीपमध्ये
येत्या चोवीस तासात पाऊस होईल, असा अंदाज हवामानखात्यानं वर्तवला आहे. या अंदाजानंतर
या राज्यामध्ये कोणत्याही अशा आपत्तीचा सामना करण्यासाठी तटरक्षक दल सज्ज ठेवण्यात
आलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment