Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 5 October 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
५ ऑक्टोबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करत असून
आज डिझेल चार रुपयांनी स्वस्त करण्याबाबत अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज नाशिक इथे पत्रकारांशी बोलत होते.
केंद्र आणि राज्य सरकारनं कर कमी केल्यानं काल पेट्रोलचे दर राज्यात पाच रुपयांनी कमी
झाले असून, आज डिझेल संदर्भातल्या निर्णयांची अंमलबजावणी होईल असं ते म्हणाले. यासंदर्भात
सर्वात महत्त्वाचा निर्णय वस्तू आणि सेवा कर परिषदेनं घेणं अपेक्षित असून, इंधनाचा
वस्तू आणि सेवा कर कक्षेत समावेश केल्यास देशभरात इंधनाचे एक सारखे दर होतील असंही
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, महाराष्ट्र पोलीस अकादमीचा एकशे पंधरावा दीक्षांत सोहळा आज सकाळी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक इथं झाला, यावेळी आठशे एकोणीस प्रशिक्षित
पोलिस उप निरिक्षक अधिकाऱ्यांची तुकडी पोलीस दलात सामील झाली.
****
राज्यातल्या तेरा जिल्ह्यांमधल्या सुमारे एकशे सत्तर तालुक्यांमध्ये यावर्षीच्या
पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं या तेरा जिल्ह्यातल्या धरणांमधली पाणीपातळी
खालावली आहे. राज्यसरकारनं या स्थितीची दखल घेत आवश्यक तिथं टॅंकर्सनं पाणीपुरवठा सुरू
केला असून, दुष्काळ घोषित करण्याच्या दृष्टीनं या स्थितीचा आढावा घेण्याला सुरुवात
केली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात औरंगाबाद आणि नाशिक विभागांमध्ये
सर्वात कमी पाऊस झाला असून, औरंगाबाद विभागातल्या धरणांमध्ये सुमारे अट्ठावीस टक्के
आणि नाशिक विभागातल्या धरणांमध्ये सुमारे पासष्ट टक्के, इतकाच पाणीसाठा आहे. सध्या
राज्यात तीनशे एकोणतीस टँकर्सनं पाणी पुरवलं जात असून, त्यातले एकशे ब्याऐंशी टँकर्स
औरंगाबाद विभागातल्या एकशे एक्काहत्तर गावांना आणि एकशे अठरा टँकर्स नाशिक विभागातल्या
चारशे ऐंशी गावांना पाणी पुरवत आहेत.
****
राज्याच्या ग्रामीण भागातल्या समाजकंटकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि अवैध धंद्यांना
आळा घालण्यासाठी प्रत्येक परिक्षेत्रातल्या पोलीस महानिरीक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रात
अचानक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी
सांगितलं आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. शाळा, महाविद्यालयं आणि आश्रमशाळांमध्ये
मुलींच्या बाबतीत घडणाऱ्या अप्रिय घटनांविरुद्ध तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश राज्यातल्या
पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं, ग्रामीण भागातले अवैध व्यवसाय आणि असामाजिक
तत्वांविरुद्ध तक्रार करणाऱ्या नागरिकांची ओळख गुप्त ठेवण्यात येणार असल्याची माहितीही
केसरकर यांनी यावेळी दिली.
****
येत्या अठरा नोव्हेंबरला राज्यभरात ‘महावॉकेथॉन’ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं
आहे. राज्य शासनाचा परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम, मोटार वाहन विभाग, सीएएसआय ग्लोबल
आणि सीएसआर डायरी यांनी संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली असून, रस्ता सुरक्षेबाबत
जनजागृती करणं, हा यामागचा उद्देश आहे. या स्पर्धेत राज्यातले दीड लाख शालेय आणि महाविद्यालयीन
विद्यार्थी पालकांसह सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. ही स्पर्धा, एकाच दिवशी, एकाच
वेळी दीडशे ठिकाणी घेण्यात येणार असून, या स्पर्धेची, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं
नोंद घ्यावी, असं आयोजकांचं उद्दिष्ट आहे.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त केंद्रीय मनुष्यबळ
विकास मंत्रालयाच्या ‘उन्नत भारत’ अभियानात महाराष्ट्रातल्या एकशे साठ उच्च शैक्षणिक
संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या सात तांत्रिक आणि बावीस अतांत्रिक
अशा एकोणतीस संस्थांचा समावेश आहे.
****
कोल्हापूरजवळ आज पहाटे शिवशाही बसला अपघात होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला,
तर २९ प्रवासी जखमी झाले. पुण्याहून सावंतवाडीला जाणारी ही बस पुणे-बंगळुरू राष्ट्रीय
महामार्गावर कोल्हापूरजवळ रस्त्यावर उभ्या ट्रकला धडकून हा अपघात झाल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान राजकोट इथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी
सामन्यात आज दुसऱ्या दिवशी, भारतानं कालच्या चार बाद तीनशे चौसष्ट या धावसंख्येवरून
डाव पुढे सुरू केला. कर्णधार विराट कोहलीच्या १३९ धावांच्या बळावर भारतीय संघानं सात
बाद ५४९ धावा केल्या. सध्या, रवींद्र जडेजा ३४ तर कुलदीप यादव दोन धावांवर खेळत आहे.
//**********//
No comments:
Post a Comment