Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 5 October 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या वार्षिक द्विपक्षीय
बैठकीनंतर, उभय देशांदरम्यान आठ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
मानवाला अंतराळात पाठवण्याच्या, ‘गगनयान’ या भारताच्या, महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी
रशियानं सहकार्य करणं, तसंच रशियाकडून एस चारशे ट्रायंफ, ही हवाई संरक्षण प्रणाली भारतानं
खरेदी करणं, यासंदर्भातल्या करारांचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रपती पुतिन यांच्याशी
झालेल्या चर्चेनं द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीला नवी दिशा मिळाली, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी या चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. तर, दहशतवाद
आणि मादक द्रव्यांची तस्करी, यांच्याविरोधात लढण्यासाठी सहकार्य वाढवण्याबाबत दोन्ही
देश सहमत झाले आहेत, असं पुतिन यांनी सांगितलं.
****
नक्षलवाद
हे देशासाठी मोठं आव्हान असून, सरकार कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेणार नाही, असं
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीमध्ये एका परिषदेत बोलत होते.
माओवाद मुळापासून नष्ट करण्याची गरज व्यक्त करतानाच, शहरी नक्षली फक्त हिंसा भडकवू
इच्छितात, असं त्यांनी नमूद केलं. नक्षलवाद्यांना टिपण्यात सरकारला यश येत असल्याचंही
राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
****
भारतीय
रिझर्व्ह बँकेनं आज आपल्या चौथ्या द्वैमासिक पतधोरणाची घोषणा करताना, महत्त्वाच्या
व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला नाही. या निर्णयामुळे रेपो दर सहा पूर्णांक पाच दशांश
टक्क्यांवर स्थिर असून, यामुळे कर्जदारांना दिलासा मिळू शकणार आहे. रिव्हर्स रेपो दरही
सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्क्यांवर कायम आहे. या वर्षीच्या उत्तरार्धासाठी याआधी
वर्तवलेल्या महागाई दराच्या अंदाजात रिझर्व्ह बँकेनं घट केली असून, आता हा दर तीन पूर्णांक
नऊ ते चार पूर्णांक पाच टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा तर, सकल घरगुती उत्पादनाचा
वृद्धी दर सात पूर्णांक चार टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
****
पोलीस
सेवेत दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांनी देशसेवेचं ध्येय समोर ठेवून आणि कोणत्याही भय किंवा
दबावाला बळी न पडता आपल्या कर्तव्याचं पालन करावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केलं आहे. नाशिक इथं आज त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीच्या
प्रशिक्षणार्थी पोलिस उप निरिक्षकांच्या एकशे पंधराव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा झाला,
त्यावेळी ते बोलत होते. प्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते यावेळी पारितोषिकं प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी परिसरातल्या
खुल्या सभागृहाचं आणि सप्तश्रृंगी संकुलाचं उद्घाटनही यावेळी मुख्यमांत्र्यांच्या हस्ते
करण्यात आलं.
****
पेट्रोल
आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात आज नाशिक मध्ये शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर
मोर्चा काढण्यात आला. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य भरडले जात असून दर नियंत्रित करण्यासाठी
इंधन, वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणावं, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात
आलेल्या निवेदनात करण्यात आली. माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप आणि खासदार हेमंत
गोडसे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं.
****
आणेवारी
कमी करावी आणि दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी छावण्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स
सुरू करावेत या मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या बोधेगाव इथल्या शेतकऱ्यांनी आज
बैलगाड्यांसह रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे शेवगाव-गेवराई राज्य मार्गावरची वाहतूक
तीन तास बंद झाली होती. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात
आलं.
****
देशातला
तरुणवर्ग निरोगी रहावा, यासाठी ‘क्रीडा’ हा विषय शिक्षणात समाविष्ट करून शालेय आणि
महाविद्यालयातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी दिवसातून किमान एक तास खेळासाठी द्यावा,
तसंच सगळ्या विद्यापीठांमध्ये ‘तरुण आणि स्वस्थ भारत’ मोहीम राबवावी अशी मागणी प्रसिद्ध
क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांनी राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्याकडे केली आहे.
तेंडुलकर यांनी काल मुंबईत राज्यपालांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.
विद्यापीठांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आणि आदिवासी
बहुल क्षेत्रामधील खेळाडूंना मदत करण्याची इच्छा दर्शवल्याबद्दल सचिन तेंडुलकर यांची
राज्यपालांनी प्रशंसा केली.
****
No comments:
Post a Comment