Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 December 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ डिसेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं कामकाज कर्मचारी संघटनांच्या संपामुळं
आज विस्कळित झालं आहे. आंदोलकांचा विजया बँक आणि देना बँकेच्या बडोदा बँकेतील विलीनीकरण
प्रस्तावाला विरोध आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या विविध नऊ संघटनांनी एकत्र येऊन हा संप
पुकारला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार आठवडाभरात बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा दुसरा
संप आहे. गेल्या २१ डिसेंबररोजी अधिकाऱ्यांच्या एका संघटनेनं वेतनाच्या मुद्दावर संप
केला होता.
****
राष्ट्रीय तपास संस्था एनआयएनं
नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादी संघटना इसिससंबंधित प्रकरणांमध्ये कारवाई
केली आहे. संस्थेनं आज सकाळपासून १६ ठिकाणी छापे टाकले आहेत. त्याचा तपशील स्पष्ट व्हायचा
आहे.
****
काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपुरा
भागात सुरक्षादलांनी आतंकवादी संघटना हिजबुलचा कमांडर रियाज नाईकोच्यामूळ गावामध्ये
अतिरेकी लपले असल्याच्या वृत्ताच्या पार्श्र्वभूमीवर कारवाई सुरू केली आहे. पोलिस सुत्रांनी
दिलेल्या माहितीनुसार अवंतीपुरा भागात घेराबंदी करण्यात आली असून कारवाई सुरू आली आहे.
****
देशाच्या अनेक भागात थंडीची लाट
आली असून उत्तर भारतात या लाटेमुळं जनजीवन विस्कळित झालं आह नवी दिल्ली इथं आज सकाळी दाट धुक्यामुळं अनेक विमानाची उड्डाणं रद्द करण्यात
आली आहेत. देशाच्या अनेक भागात आलेली थंडीची लाट आणखी तीन-चार दिवस कायम राहण्याची
शक्यता असून, थंडी आणि दाट धुक्यामुळे उत्तर भारतात जनजीवन विस्कळीत झालं आहे. पंजाब, राजस्थान आणि हरयाणात थंडीची लाट कायम राहणार
असून, ती मध्यप्रदेश, छत्तीसगड, सौराष्ट्र, आणि कच्छमधे पसरण्याची शक्यता आहे, कश्मीरमधे श्रीनगर वगळता इतरत्र पारा गोठ बिंदूच्या
खाली घसरला. तिथं पाणी गोठल्यानं पाणी पुरवठा
थांबला आहे. हिमाचल प्रदेशात केलाँग इथं उणे
नऊ पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान मराठवाड्यामध्ये मात्र दोन दिवसांत थंडी
कमी झाली आहे.
****
मुस्लीम महिला वैवाहिक अधिकार संरक्षण विधेयक २०१८वर उद्या लोकसभेत चर्चा
होणार आहे. मंत्री रविशंकर प्रसाद हे विधेयक सदनात सादर करतील. या विधेयकात मुस्लीम
पतीतर्फे एकाचवेळी तीनदा तलाक म्हणून बेकायदेशीर वैवाहिक संबंध तोडण्याला प्रतिबंध
लावणे प्रस्तावित आहे. विधेयकामध्ये तीन वेळा तलाक म्हणून संबंध तोडण्याला दंडपात्र
गुन्हा ठरवणेही प्रस्तावित असून त्यासाठी तीन वर्षांपर्यंत शिक्षेचा प्रस्ताव आहे.
भाजपनं पक्ष सदस्यांसाठी या विधेयकावरील चर्चेकरता लोकसभेत उपस्थित राहण्याचा व्हीप
काढला आले.
****
दिवंगत संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत
शांताराम कुडाळकर आणि पार्श्वगायिका उषा तिमोथी यांना काल मुंबईत एका समारंभात, मोहम्मद रफी पुरस्कार प्रदान
करण्यात आला. लक्ष्मिकांत-प्यारेलाल जोडीतले लक्ष्मीकांत यांच्यासाठीचा हा पुरस्कार
त्यांच्या कन्येनं स्वीकारला. एक लाख रूपये आणि चषक, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तर उषा तिमोथी यांना
पन्नास हजार रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
इयत्ता दहावीच्या विद्यार्थांसाठी राज्य शासनाच्या
वतीनं सुरू करण्यात आलेल्या कलचाचणीला सुरूवात झाली असून सोमवारी रात्रीपर्यंत
राज्यभरात जवळपास पाच
लाख ९ हजार २९१ विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिली.
यातल्या तीन लाख ७० हजार ३५६ विद्यार्थ्यांनी ही चाचणी मोबाईलवर दिली आहे. दरम्यान ग्रामीण आणि दुर्गम भागात विद्यार्थ्यांना
स्मार्ट फोन उपलब्ध होत नसल्यामुळं ही कलचाचणी केवळ मोबाईल ॲपवर न घेता संगणकावरही
घेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी मुख्याध्यापाक संघातर्फे करण्यात आली आहे. येत्या
१७ जानेवारीपर्यंत ही चाचणी घेण्यात येणार
आहे.
****
भारतानं मेलबोर्न इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध
तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी दोन बाद २१५ धावा केल्या आहेत. नाणेफेक
जिंकून प्रथम फलंदाजी पत्करलेल्या भारतीय संघाच्या मयांक अग्रवालनं पदार्पणातच आकर्षक
फलंदाजी करताना १६१ चेंडूंमध्ये ७६ धावा केल्या. चेतेश्र्वर पुजारानंही अर्धशतक झळकवलं.
सलामीवीर हनुमा विहारी मात्र केवळ आठ धावांवर बाद झाला. खेळ थांबला तेंव्हा पुजारा
२०० चेंडुंमध्ये ६८ आणि कर्णधार विराट कोहली १०७ चेंडुंमध्ये ४७ धावा काढून खेळत आहेत.
चार सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे.
****
हैदराबाद इथं सुरू
असलेल्या प्रिमीयर बॅडमिंटन लीग स्पर्धेत आज संध्याकाळी सात वाजता दिल्ली डॅशर्स आणि नॉर्थ ईस्टर्न वॉरियर यांच्यात सामना होणार
आहे. दरम्यान कालच्या सामन्यांत हैदराबाद हंटर्सने चेन्नई
स्मॅशर्सवर ४-१ अशी मात करत, सलग दुसऱ्या विजयाची
नोंद केली. महिला एकेरीत मात्र हैदराबाद हंटर्सच्या पी व्ही सिंधुला चेन्नई
स्मॅशर्सच्या सुंग-जी-ह्यून हीनं १३-१५, १५-१४, ७-१५ असं पराभूत केलं.
त्यापूर्वी पुरूष दुहेरीमध्ये किम-सा-रॅग आणि बोदीन इसरा तसंच एकेरीमध्ये
ली-ह्यूनच्या विजयामुळे हैदराबाद हंटर्सने २-० अशी आघाडी घेतली.
*****
***
No comments:
Post a Comment