▼

Thursday, 17 January 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.01.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 January 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि.

****



§  कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलण्यास सूक्ष्म सिंचन पद्धत सक्षम - केंद्रीय जलसंपदा आणि नदी विकास मंत्री नीतिन गडकरी

§  राज्यात सूक्ष्म सिंचनाच्या सुविधांमध्ये तिप्पट वाढ झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

§  येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात कपात करण्याचा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय

§  पोलिस कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा अकादमी स्थापन करण्याची राज्य सरकारची घोषणा

आणि

§  मराठवाडा आणि विदर्भातल्या औद्योगिक विकासासंदर्भांत नियुक्त आंतरविभागीय समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर .

****



 कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलण्यास सूक्ष्म सिंचन पद्धत सक्षम असल्याचं मत केंद्रीय जलसंपदा आणि नदी विकास मंत्री नीतिन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचं काल औरंगाबाद इथं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सूक्ष्म सिंचन पद्धत अत्यंत उपयुक्त असल्याचं नमूद करत, गडकरी यांनी, सूक्ष्म सिंचनाशिवाय शेतीचा विकास शक्य नसल्याचं मत व्यक्त केलं. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पिकांच्या स्वरूपात बदल करण्याची वेळ आली असल्याचं ते  म्हणाले. सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास कृषी उत्पादनात तिप्पट वाढ होऊ शकते, त्याच वेळी पाण्याची गरजही तेवढ्याच प्रमाणात कमी होते, असं गडकरी यांनी सांगितलं. मराठवाड्यासह राज्याचा एकूणच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दोन नदीजोड प्रकल्पांवर काम करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.



 यावेळी बोलतांना मुख्यमुत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, राज्यात जलयुक्त शिवार योजनेची यशस्वी अंमलबजावणी होत असल्यामुळे चौतीस लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. राज्यात सूक्ष्म सिंचनाच्या सुविधांमध्ये तिप्पट वाढ झाली असून, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत चार हजार गावांमध्ये शाश्वत सिंचन सुविधा उभारण्याचं काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. जलवाहिनीद्वारे सिंचन तसंच सिंचनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  करण्यावर आपला भर असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत ५६ देशांचे १०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

****



 भारतीय निर्यात आयात बँक अर्थात एक्सिम बँकेचं पुनर्भांडवलीकरण करण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. देशभरात तेरा नवीन केंद्रीय विद्यापीठांसाठी आठ हजार एकशे तेरा कोटी रुपये निधीला मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलं. आयकर कर विवरण पत्र ऑनलाईन दाखल करण्याची प्रक्रिया सोपी करण्याच्या उद्देशानं, एकीकृत ई फाईलिंग आणि केंद्रीकृत प्रक्रिया प्रकल्प दोन - ला देखील काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर, आयकर कर विवरणाची प्रक्रिया केवळ एका दिवसात पूर्ण होईल, असं गोयल यांनी यावेळी सांगितलं.

****



 येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं घेतला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही माहिती दिली. येत्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात दहा ते पंधरा टक्के तर पुढच्या वर्षात १५ ते २० टक्के अभ्यासक्रम कमी केला जाईल असं जावडेकर यांनी सांगितलं. या कपातीमुळे विद्यार्थी क्रीडा तसंच कौशल्य विकासाला अधिक वेळ देऊ शकतील, असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला.

****



 मुंबईतल्या बेस्ट बस कर्मचारी संघटनेनं पुकारलेला संप काल नवव्या दिवशी मागे घेतला. या संघटनेनं संपाबाबतची आपली भूमिका काल न्यायालयात मांडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते, त्यानुसार कालच्या सुनावणीत, संप तत्काळ मागे घेण्याचा आदेश न्यायालयानं दिला. त्यानंतर कर्मचारी संघटनेतर्फे संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत बेस्ट प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी मध्यस्थाची नियुक्ती केली गेली असून येत्या तीन महिन्यांत याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

****



 पोलिस कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा अकादमी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एकतिसाव्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते नागपूर इथं काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. खेळामुळे तणाव कमी होण्यास मदत होत असल्याचं नमूद करत, सतत तणावाखाली असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना या अकादमीमुळे मदत होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 मराठवाडा आणि विदर्भातल्या औद्योगिक विकासासंदर्भांत नियुक्त आंतरविभागीय समितीनं मागासलेपणाचा जिल्हानिहाय अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल नागपूर इथं सादर केला. औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागातल्या तज्ज्ञ उद्योजकांचा समावेश असलेल्या या समितीनं १६ सेक्टरमध्ये जिल्हानिहाय औद्योगिक असमतोलासंदर्भांत विविध सूचना केल्या आहेत. या अहवालाच्या अंमलबजावणीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी, अहवालाच्या अभ्यासासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात येईल, असं सांगितलं. तत्कालिन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली होती. औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट हे सहअध्यक्ष होते.

****



  राष्ट्र निर्मितीत शिक्षकांचं योगदान महत्त्वाचं असून शिक्षकांनी विद्यार्थी आणि समाज घडवण्याबरोबरच पर्यावरण संतुलनासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन, पर्यावरण मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केलं आहे. नांदेड इथं आयोजित तीन दिवसीय शिक्षणाची वारी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी ते काल बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पर्यावरणाप्रतीची बांधिलकी सांगताना, पर्यावरण संवर्धनासाठी अभ्यासक्रमात आवश्यक लेखनाचा समावेश करण्यासाठी आपण संबंधितांशी बोलणार असल्याचं ते म्हणाले.

****



 बळकट समाज निर्मितीसाठी समाजाची भावी आई सक्षम असणं आवश्यक असल्याचं, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे संस्थापक अधिक कदम यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेत “काश्मीरचे नवनिर्माणः नव्या नंदनवनाची शोधयात्रा” या विषयावर ते बोलत होते. संघर्षाच्या काळात स्त्रिया आणि मुलांचं विश्व उध्वस्त होतं, त्यांना सावरण्याला प्राधान्य दिलं पाहिजे, असं अधिक कदम यांनी नमूद केलं. व्याख्यानानंतरच्या प्रकट मुलाखतीतून कदम यांनी काश्मीरमधील निराधार मुलींसाठी करत असलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.

****



 बीड जिल्ह्यातील ११ पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.  पाटोदा इथं पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत, निवासस्थान बांधकाम आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांचं भूमिपूजन मुंडे यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या पक्क्या रस्त्यांमुळे सर्वांना फायदा होईल असं मुंडे यावेळी म्हणाल्या.

****



 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी विविध मागण्यासंदर्भात ३० जानेवारीपासून उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काल राळेगणसिद्धी इथं जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. अण्णांनी केलेल्या मागण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार कायम सकारात्मक भूमिका घेत असून त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या असल्यानं, अण्णा उपोषणाचा निर्णय घेणार नाहीत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

****



 पुण्यात सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रानं ६४ सुवर्णपदकांसह आपली आगेकूच सुरू ठेवली आहे. कालपर्यंत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एकूण ६४ सुवर्ण, ५१ रौप्य तर ६२ कांस्य पदकं जिंकली आहेत.

*****

***

No comments:

Post a Comment