▼

Wednesday, 16 January 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 16.01.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 January 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

सूक्ष्म सिंचन पद्धत कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलण्यास सक्षम असल्याचं मत केंद्रीय जलसंपदा आणि नदी विकास मंत्री नीतिन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचं आज त्यांनी औरंगाबाद इथे उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सूक्ष्म सिंचन पद्धत खूप उपयोगी आहे, असं नमूद करत, सूक्ष्म सिंचनाशिवाय शेतीचा विकास शक्य नसल्याचं ते म्हणाले. केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री अर्जुन मेघवाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पाणी वाचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार अनेक नवीन उपाययोजना करत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पिकांच्या स्वरूपात बदल करण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी म्हटलं. सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास कृषी उत्पादनात तिप्पट वाढ होऊ शकते, त्याच वेळी पाण्याची गरजही तेवढ्याच प्रमाणात कमी होते, असं गडकरी यांनी सांगितलं.

निधीअभावी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित न करू शकणाऱ्या राज्य सरकारांना केंद्र सरकार मदत करत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. नवीन आणि परिणामकारक सिंचन पद्धतींची अंमलबजावणी करण्यात केंद्र सरकार राज्य सरकारांना आवश्यक ती सगळी मदत करेल, असं आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिलं.

महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजनेची यशस्वी अंमलबजावणी होत असल्यामुळे चौतीस लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं. राज्यात सूक्ष्म सिंचनाच्या सुविधांमध्ये तिप्पट वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत चार हजार गावांमध्ये शाश्वत सिंचन सुविधा उभारण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. पाईपद्वारे सिंचन करण्यावर तसंच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सिंचनासाठी करण्यावर आपला भर असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

भारतीय निर्यात आयात बँक अर्थात एक्सिम बँकेचं पुनर्भांडवलीकरण करण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशभरात तेरा नवीन केंद्रीय विद्यापीठांसाठी आठ हजार एकशे तेरा कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलं. आसाम मधल्या नोमालीगढ तेल शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता तिपटीनं वाढवण्यालाही मंत्रीमंडळानं आज मान्यता दिल्याचं गोयल यांनी सांगितलं. ऑनलाईन आयकर कर विवरणाची प्रक्रिया सोपी करण्याच्या उद्देशानं एकीकृत ई फाईलिंग आणि केंद्रीकृत प्रोसेसिंग परियोजना दोन - ला ही आज मंत्रीमंडळानं मान्यता दिली. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर, आयकर कर विवरणाची प्रक्रिया केवळ एका दिवसात पूर्ण होईल, असं गोयल यांनी यावेळी सांगितलं.

****

मुंबईतल्या बेस्ट बस कर्मचारी संघटनेनं पुकारलेला संप आज नवव्या दिवशी मागे घेतला आहे. या संघटनेनं संप मागे घेण्याबाबतचं आपलं म्हणणं आज न्यायालयात मांडावं, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते, त्यानुसार आज सुनावणी झाल्यानंतर, संप तात्काळ मागे घ्यावा, असा आदेश आज न्यायालयानं दिला. त्यानंतर कर्मचारी संघटनेतर्फे संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत बेस्ट प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी मध्यस्थाची नियुक्ती केली गेली असून येत्या तीन महिन्यात याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. बेस्टच्या सुमारे तीन हजार बसेसच्या फेऱ्या बंद झाल्यानं सामान्य प्रवाशांची गेले नऊ दिवस मोठी अडचण झाली होती, त्यांना या निर्णयानं मोठा दिलासा मिळाला आहे.  

****

पोलिस कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा अकादमी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एकतिसाव्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते नागपूर इथे झालं, त्यावेळी ते बोलत होते. खेळामुळे तणाव कमी होण्यास मदत होत असल्याचं नमूद करत, सतत तणावाखाली असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना या अकादमीमुळे मदत होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. येत्या अठरा तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातले सुमारे तीन हजार खेळाडू सोळा क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत.

//**************//

No comments:

Post a Comment