Tuesday, 16 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.07.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जुलै २०१ सकाळी ७.१० मि.
****

v आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाला ४० जागा देण्याची तयारी- वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर 
v पुढचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचाच होईल - पक्षाच्या सरचिटणीस सरोज पांडे यांचा दावा; र मुख्यमंत्री महायुतीचाच होईल- गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मत
v डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नागपूरचे डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती
आणि
v आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात अ आणि ब अशी वर्गवारी करुन आरक्षण देता येणं शक्य - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
****

 आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाला ४० जागा देण्याची तयारी असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. काँग्रेस पक्षानं गेल्या तीन विधानसभा विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या १४४ जागा लढवलेल्या नाहीत, त्यामुळे या सर्व मतदारसंघात त्यांचं पक्ष संघटन अतिशय कमकुवत आहे. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला केवळ एक जागा मिळाली आहे, त्यामुळे पक्षाची ताकद बघता आघाडी करताना या पक्षाला ४० जागा देण्यात येईल, असं काँग्रेस पक्षाला कळवण्यात आलं आहे, आता निर्णय काँग्रेसनं घ्यावा, असं आंबेडकर म्हणाले. आपली आघाडी आणि एमआयएमनं राज्यातल्या सर्व २८८ जागा लढवण्याची तयारी सुरू केली असून उमेदवार ठरवण्याचं काम सुरू असल्याचंही आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.
****

 महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जागा वाटपाचं समीकरण काय ठरलं ते माहिती नाही, मात्र पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं स्पष्ट, मत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलतांना व्यक्त केलं. आगामी विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीसाठी त्यांचा हा दौरा होता. विधान सभा निवडणुकीत भाजपचेच जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
****

 आघाडीचा मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांनी आपल्या पक्षात किती आमदार राहतील याची दक्षता घ्यावी अशी टीका गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल शिर्डी इथं  वार्ताहरांशी बोलताना केली, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  बाळासाहेब थोरात यांनी आघाडीचा मुख्यमंत्री होईल, या केलेल्या क्तव्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सरकारवर जनतेचा विश्वास आहे. राज्यात लोकसभेला मिळालेला जनाधार  विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असा विश्वास  व्यक्त करतानाच मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा यापेक्षा महायुतीचाच होईल असा दावाही त्यांनी केला.
****
 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्याची रक्कम भरण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी काल मुंबईत दिली. या योजनेअंतर्गत जवळपास ५० लाख खातेदारांना २४ हजार ३१० कोटी रूपये रक्कम मंजूर झाले आहेत. यापैकी ४४ लाख खातेदारांना १८ हजार ५०० कोटी रूपयांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आल्याचंही देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
****

 गोर-बंजारा जमातींच्या तांडा विकासासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध व्हावा, यासाठी तांड्याला ग्राम पंचायतीमध्ये गटाचा दर्जा दिला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गोर-बंजारा जमातींच्या विविध मागण्यांसाठी एका शिष्टमंडळानं काल मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
****

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  राज्यपाल तथा कुलपती सी विद्यासागर राव यांनी काल येवले यांच्या नियुक्तीची घोषणा केली.  डॉ येवले यांनी औषधी निर्माणशास्त्र विषयात पीएच डी प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन आणि प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. जून २०१५ साली त्यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली होती. डॉक्टर येवले आज आपला पदभार स्वीकारणार आहेत.
****

 हिंगोली जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळं सध्या सुरू असलेले टॅंकर बंद करण्याची घाई प्रशासनानं करू नये असे आदेश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काल सावे पहिल्यांदाच  जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दिवसभर अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यानंतर सायंकाळी त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. यावेळी पावसाची स्थिती नाजूक असल्याचे सांगत टंचाई असलेल्या भागात प्रशासन सक्रिय असायला हवं, असं त्यांनी सूचित केलं.
****

 राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आज सायंकाळी बीड जिल्ह्यातल्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयास भेट देणार आहेत. जिल्ह्यात अनेक महिलांची गर्भाशय काढून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे, या पार्श्वभूमीवर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. डॉ गोऱ्हे उद्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बीड इथं एक बैठकही घेणार आहेत. त्याचबरोबर वंजारवाडी इथल्या पीडित महिलांशी तसंच आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांशी त्या संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात त्या साखर कारखाना संचालक, मुकादम संघटना प्रतिनिधी तसंच अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींबरोबरही चर्चा करणार आहेत.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात अ आणि ब अशी वर्गवारी करुन आरक्षण देता येणं शक्य असल्याचं मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. सांगली महापालिका क्षेत्रातल्या विकास कामांचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. या कामासाठी नगरोत्थान योजनेतून शंभर कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
****

 ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०१९’च्या मसुद्यावर येत्या २० जुलैपर्यंत लिखित स्वरुपात सूचना मागवण्यात आल्या आहेत. या मसुद्यावर काल नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये अभ्यासात्मक चर्चा झाली, त्यावेळी कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी शिक्षण तज्ज्ञांना या मसुद्याबाबत सूचना सादर करण्याचं आवाहन केलं. या परिषदेला प्रत्यक्षपणे तसंच दूरदृष्य संवाद प्रणाली - व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनही शिक्षणतज्ज्ञांनी सहभाग घेत आपली मतं मांडली.
****

 लातूर जिल्ह्यात पंडित दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ काल जिल्हाधिकारी  जी. श्रीकांत यांच्या तर औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात येत्या १५ ऑगस्टपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहेत.
****

उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात होणारे दोन बालविवाह थांबण्यात बालविवाह प्रतिबंधक समितीला यश आलं आहे. आवाड शिरपुरा इथं गेल्या आठवड्यात हे बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर समुपदेशन करून हे बालविवाह थांबवण्यात आले.
*****

शांत आणि सुरक्षित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी आमदार अमित  देशमुख यांनी पोलीस अधिक्षक राजेंद्र माने यांच्याकडे केली आहे. बोरवटीचे माजी सरपंच भालचंद्र माने यांच्या आत्महत्ये प्रकरणी निपक्ष चौकशी करून दोषी व्यक्तिंवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. 
****

 आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग मतदार याद्यांचा  दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काल या कार्यक्रमाला सुरूवात झाली असून तो येत्या १९ ऑगस्टपर्यंत राबवला जाणार आहे.
****

 यंदाच्या अर्थ संकल्पात सरकारनं कायम खाते क्रमांक- पॅन क्रमांक आधार कार्ड सोबत जोडण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे आर्थिक सर्जिकल स्ट्राईक असल्याचं ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन संस्थेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण आणि उद्योजकांच्या विविघ संघटनांच्या वतीनं आयोजित  अर्थसंकल्प २०१९ उद्योजकांसाठी या विषयावर बोलत होते.
****

 औरंगाबाद इथल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयात ‘रोजगार क्षमता आणि उद्योजकता विकास’ विभागाची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण आणि कार्यकारणी सदस्य विवेक भोसले यांनी काल वार्ताहरांशी बोलतांन ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणं, कौशल्य प्रशिक्षण देणं, स्वयं व्यवसायासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन देणं, तसंच विद्यार्थ्यांना उद्योजक म्हणून घडवण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणं, हा या विभागाचा मुख्य उद्देश असल्याचं चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.
****

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक गणेश पाटील याला सहा हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहात पकडलं. वाळू वाहतुकीसंदर्भात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी नाईक यानं बारा हजार रूपयांची मागणी केली होती. तक्रारदारानं ती दोन हप्त्यात देण्याचं ठरल्यानंतर सहा हजाराचा पहिला हप्ता घेतांना नाईक याला पकडण्यात आलं.
****

 जर्मनी इथं सुरु असलेल्या  आतंरराष्ट्रीय नेमबाजी खेळ महासंघाच्या ज्युनिअर विश्व कप स्पर्धेच्या पहिल्याचं दिवशी, भारतानं दोन सुवर्ण पदकांसहीत सहा पदकं कमावली आहे. पुरुषांच्या ५० मीटर पिस्तुल गटात गौरव राणा यानं सुवर्ण तर अर्जुन सिंह चिमा यानं रौप्य पदकं पटकावलं. तर महिला गटात प्रिया राघव आणि विभुती भाटीया यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकं जिंकली. भारतीय संघानं  या स्पर्धेत आतापर्यंत एकूण अकरा पदकं पटकावली आहेत.
*****
***

No comments:

Post a Comment