Thursday, 18 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.07.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ जुलै २०१ सकाळी ७.१० मि.
****

v माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवरची स्थगिती आंतरराष्ट्रीय न्यायालयात कायम
v राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक २०१९ ला  केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
v पीक विम्याचे दावे पंधरा दिवसात मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन - शिवसेनेचा इशारा
आणि
v गर्भाशय शस्त्रक्रियांप्रकरणी निश्चित कालमर्यादेत निर्णयासाठी शासनास प्रवृत्त करू - डॉ. नीलम गोऱ्हे यांचं आश्वासन
****

 माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवरची स्थगिती आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कायम ठेवली आहे. काल या प्रकरणी हेग इथं, आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली, यावेळी पाकिस्ताननं जाधव यांना भारताकडून कायदेशीर सहकार्य नाकारून व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. जाधव यांना कायदेशीर मदत घेण्यात आडकाठी आणू नये, असं सांगत, जाधव यांना सुनावलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर पाकिस्तान पुनर्विचार करत नाही, तोवर या शिक्षेवर स्थगिती कायम राहील, असं आंतरराष्ट्रीय न्यायालयानं सांगितलं आहे. सोळापैकी पंधरा न्यायाधीशांनी बहुमतानं हा निर्णय सुनावला.
****

 दरम्यान, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावा या संघटनेचा प्रमुख हाफीझ सईद याला काल पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात तिथल्या दहशतवाद प्रतिबंधक विभागानं अटक केली. सईदला अमेरिकेनं विशेष जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे.
****

 कर्नाटक विधानसभेतल्या राजीनामा सादर केलेल्या बंडखोर आमदारांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची सक्ती करण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या निर्णयामुळे, आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार असलेल्या एच.डी.कुमारस्वामी सरकारपुढच्या अडचणी वाढण्याची स्थिती आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं, कर्नाटक विधानसभेचे सभापती के. आर.रमेशकुमार यांनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा, असंही सांगितलं. याबाबतीत संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेणार असल्याचं सभापती रमेशकुमार यांनी म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता मागे फिरण्याचा तसंच विधानसभेच्या कामकाजाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया या बंडखोर आमदारांनी मुंबईत दिली आहे. आमदारांचा हा नैतिक विजय झाला असल्याचं मत भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केलं आहे.
****

 केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक २०१९ ला काल मंजुरी दिली. या विधेयकामुळे, भारतीय वैद्यकीय परिषदेची जागा भारतीय वैद्यकीय आयोग घेईल. तसंच, या विधेयकामुळे भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६, रद्द होईल. यातल्या तरतुदी नुसार, एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाची सार्वत्रिक परीक्षा, `नॅशनल एक्झिट टेस्ट`, या नावानं ओळखली जाईल आणि हीच परीक्षा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा असेल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयं आणि अभिमत विद्यापीठांतल्या पन्नास टक्के जागांच्या शैक्षणिक आणि इतर शुल्कांचं नियमन या आयोगाच्या अखत्यारीत राहील, असं जावडेकर यांनी सांगितलं. धरण सुरक्षा विधेयकाचा मसूदा तसंच दिवाळखोरी आणि नादारी कायदा दुरुस्ती विधेयकाचा मसूदाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजूर केला.
****

 पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातल्या चारशे सहा जिल्हयांमध्ये घरगुती वापराचा गॅस पुरवठा पाईपद्वारे करण्यासाठी परवानगी दिली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी काल राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. परवानगी मिळालेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, आणि अहमदनगर सह एकोणीस जिल्ह्यांचा समावेश आहे.
****

 राज्यातल्या खाजगी पीक विमा कंपन्या आणि बँकांनी, शेतकऱ्यांच्या, पीकविमा आणि कर्जमाफीच्या प्रलंबित प्रकरणांचे दावे येत्या पंधरा दिवसात मार्गी लावावेत अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल, इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शिवसेनेतर्फे काल मुंबईत राज्यातल्या खाजगी पीक विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

 सरकारनं पीकविम्याच्या आणि कर्जमाफीच्या विविध योजना आणलेल्या असतानाही, शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पैसे पीक विमा कंपन्या मिळू देत नाहीत, असा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला.
****

 आदिवासी विकास विभागाच्या वतीनं अनुसूचित जमातीसाठी लागू असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाजाला लाभ घेता यावा, यासाठीची आवश्यक प्रक्रिया लवकर पूर्ण करून येत्या ऑगस्ट महिन्यापासून या योजना लागू करण्यात याव्यात, असे निर्देश सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री डॉ. संजय कुटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
****

 औरंगाबादमध्ये जाहीर झालेल्या क्रीडा विद्यापीठासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल लोकसभेत केली. क्रीडा महासंघांमधे राजकीय नेत्यांचा सहभाग नसावा तसंच औरंगाबाद इथं फुटबॉल खेळासाठी सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणीही खासदार जलील यांनी यावेळी केली.
****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 गर्भाशय शस्त्रक्रियांप्रकरणी निश्चित कालमर्यादेत निर्णय घेण्यासाठी शासनास प्रवृत्त करू असं आश्वासन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलं आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल त्यांनी या विषयाशी संबंधित विविध समाज घटकांशी आढावा बैठक घेतली त्यावेळी, त्या बोलत होत्या. आणखी दोन बैठका घेऊन चौकशी समिती मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करेल तसेच यासाठी आरोग्य मंत्र्यांशी देखील तपशीलवार चर्चा केली जाईल असं त्यांनी सांगितलं. ऊसतोड महिला कामगारांच्या दृष्टीने आरोग्यपूर्ण सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्याची शिफारस करू, यासाठी त्यांना ऊसतोड हंगामावर जाण्यापूर्वी आरोग्य तपासणी आणि प्रत्यक्ष हंगामाच्या कालावधीत संबंधित ठिकाणी उपचार मिळतील, असं ही गोऱ्हे यांनी सांगितलं. त्याआधी गोऱ्हे यांनी काल सकाळी वंजारवाडी इथं पीडित महिला तसंच आशा सेविका, अंगणवाडी ताई यांच्यासमवेत चर्चा केली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं.
****

 राज्य महिला आयोगाच्या प्रज्ज्वला योजनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं काल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते काल अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत इथं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलतांना रहाटकर यांनी बचत गटांतल्या महिलांमध्ये आर्थिक, सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी प्रज्ज्वला योजनेअंतर्गत प्रशिक्षण उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. राज्य महिला आयोगाच्या वतीने अहमदनगर, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, राहता, राहुरी इथं आज आणि उद्या हे प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहेत असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 वाङमयामध्ये नवे प्रवाह आणण्यासाठी पाश्चात्य भाषांकडे न पाहता, देशातल्या विविध भाषांमधल्या अभिजात साहित्यकृतींचं आदान - प्रदान होणं आवश्यक असल्याचं मत ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांनी व्यक्त केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या मराठवाडा विभागीय गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित व्याख्यान आणि गुरूजनांच्या सत्कार समारंभात बोलत होते. भाषांच्या आदान प्रदानातून वाङमयीन प्रवृत्ती आणि जाणीवांची देवाण घेवाण होईल आणि भारतीय साहित्य नावाची संकल्पना अस्तिवात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. गुरूदत्त राजपुत यांचं ‘ज्ञानेश्वरी : एक हिंदी अनुवाद’ या विषयावर व्याख्यान झालं. अध्यापन क्षेत्रात कार्यरत असूनही साहित्यक्षेत्रात मोलाचं योगदान दिलेल्या शिक्षक, प्राध्यापक, साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
****

 त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळ निश्चितीसाठी साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीनं काल उस्मानाबाद इथं दोन मैदानांची पाहणी केली. मुख्य सभामंडपाबरोबरच इतर सभा मंडपांसाठी काही मंगल कार्यालयं तसंच महाविद्यालय परिसराची पाहणी करण्यात आली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यासह समितीच्या सदस्यांनी उस्मानाबादकरांना निराश करणार नाही, असं सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 यावर्षी मराठवाडयात सरासरीच्या तुलनेत केवळ ३४ टक्केच पाऊस पडला असल्यानं पीक परिस्थिती समाधानकारक नसून काही ठिकाणी अजून पेरण्या बाकी आहेत. अशा परिस्थितीत पर्यायी पीक  पेरणी करणं सोईस्कर होईल, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अधिकारी डॉ. यू. एन. आळसे यांनी दिला आहे. पेरणीयोग्य पावसाच्या आगमनानुसार पेरणी करावी, तसंच या महिनाअखेरपर्यंत सोयबीनसोबत सुर्यफूल-बाजरी-तूर, बाजरीसोबत तूर-एरंडी- कारळं-तीळ-हुलगा-मटकी अशा पीकांची पेरणी करावी, असंही डॉ. आ7ळसे यांनी सुचवलं आहे.
****

 शेतकऱ्यांनी पेरणीची वाट न पाहता स्वयं घोषणापत्राच्या आधारावर पिक विमा भरावा असं आवाहन लातूरचे  जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केल आहे. पिक विमा भरण्याची अंतिम तारीख २४ जुलै असून आतापर्यंत फक्त २६ टक्केच पेरण्या झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या एकशे दोन गावात एकशे आठ टॅंकर सुरु आहेत.
****

 उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाशी इथल्या पशू वैद्यकीय दवाखान्यातला पर्यवेक्षक रामदास शिंदे याला साडे सातशे रुपये लाच घेताना काल रंगेहाथ अटक करण्यात आली. तक्रारदाराच्या गाईवर उपचारासाठी शिंदे यानं लाच मागितली होती.
****

 नाशिक जलसंपदा विभागातला उपअभियंता राजेंद्र शिरवाडकर याला 30 हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. वडाळभोई इथल्या एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला भरपाईच्या रकमेचा धनादेश देण्यासाठी शिरवाडकर यांनी ही लाच मागितली होती, काल नाशिक कार्यालयात त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.
****

इंडोनेशियाच्या जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदांबी श्रीकांत आणि पी.व्ही. सिंधू उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. या दोन्ही खेळांडूनी जपानच्या खेळांडून पराभूत केलं.

दरम्यान, म्युनिच इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठगट नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनीष भनवाल यानं २४ मीटर रॅपिड ओहायर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे.
*****
***

No comments:

Post a Comment