▼

Thursday, 8 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.08.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ ऑगस्ट २०१९ दुपारी १.०० वा.
****

 पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातल्या पूरस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री हवाई पाहणी करत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, तटरक्षक दल आणि सैन्यदलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.
 कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
 सांगली जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर असून, सांगली शहराच्या अनेक उपनगरात पाणी शिरलं आहे. जिल्हा कारागृहात पाणी शिरल्यामुळे सुमारे चारशे कैदी कारागृहाच्या इमारतीवर अडकून पडले होते, त्यांना बाहेर काढण्याचं काम आज सकाळी सुरू झालं. या दरम्यान दोन कैद्यांनी पाण्यात उडी टाकून पसार होण्याचा प्रयत्न केला, त्यांना शोधून पुन्हा ताब्यात घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 भीमा नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्हा प्रशासनानं २९ गावातल्या साडे सात हजारावर कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. पंढरपूर शहरातही पुराचं पाणी शिरलं असून, शहरातल्या सुमारे अठराशे कुटुंबांना विविध ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे.
 गडचिरोली जिल्ह्यातल्या पर्लकोटा, पामुलगौतम तसंच इंद्रावती नद्यांना पूर आला असून, भामरागड गावात पाणी शिरलं आहे.
 कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असून, कोयना धरणाचे दरवाजे १३ फुटावर स्थिर करण्यात आले आहेत.

 जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे छत्तीस दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. धरणातून सध्या सुमारे सव्वा लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.

 हिंगोली आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. औरंगाबाद शहर परिसरातही पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत.
****

 भारत छोडो चळवळीला आज सत्त्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत. १९४२ साली, आजच्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी, मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भरलेल्या सभेतून इंग्रजांना भारत छोडो असा इशारा देत, भारतीयांना करा वा मरा असं आवाहन केलं होतं.  नऊ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या भारत छोडो चळवळीला स्वातंत्र्यलढ्यात मोठं महत्त्व आहे.
****
 कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं हे कलम रद्द करण्याचा प्रस्ताव संसदेने मंजूर केल्यावर, राष्ट्रपतींनी काल त्यावर शिक्कामोर्तब केलं. या विरोधात काल एम एल शर्मा नावाच्या एका वकिलाने याचिका दाखल करत, त्यावर बारा किंवा तेरा ऑगस्टला सुनावणी घेण्याची विनंती केली होती, मात्र या याचिकेच्या यथाक्रमानुसारच त्यावर सुनावणी होईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.
****
 दरम्यान, जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पाकिस्ताननं घेतलेली भूमिका म्हणजे, भारत पाकिस्तान संबंधांबाबत जागतिक स्तरावर चुकीचा संदेश पाठवण्याचा प्रयत्न असल्याचं, परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्ताननं भारतासोबतचे व्यापारी संबंध थांबवले असून, पाकिस्तानाततल्या भारताच्या राजदूतांनाही परत पाठवलं आहे. कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
 परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात काल एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. विभागीय वनाधिकारी विजय सातपुते यांनी या बिबट्याची पाहणी केल्यानंतर जिंतूर इथं बिबट्याचं शवविच्छेदन करण्यात आलं. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बिबट्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. परभणी जिल्ह्यात बिबट्या आढळल्याबद्दल नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 पालघर जिल्हा परिषदेच्या ६३ शाळांमध्ये पहिली पासून सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आगवण इथल्या शाळेत या उपक्रमाचं उदघाटन पालघर पंचायत समितीच्या सभापती मनीषा पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांची कमी होत चाललेली पटसंख्या, तसचं मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीबाबत न्यूनगंड लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढावी, जि.प. शाळा आणि खाजगी शाळा मधलं अंतर कमी व्हावं आणि मराठी माध्यमाच्या मुलांमध्ये इंग्रजी विषयी गोडी निर्माण व्हावी, ही या उपक्रमाची मुख्य उद्दिष्टं असल्याचं, पालघर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांनी सांगितलं .
*****
***

No comments:

Post a Comment