▼

Thursday, 8 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.08.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोल्हापूर, सांगली तसंच सातारा जिल्ह्यातल्या पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार छत्रपती संभाजीराजे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंजाब, ओडिसा, गुजराथमधून आपत्ती प्रतिसाद दलाची अनेक पथकं पूरग्रस्त भागात दाखल झाली आहेत. बचाव कार्यासाठीच्या बोटी वाढवण्यात आल्या असून, आवश्यकता भासल्यास, हवाई मार्गानं नागरिकांच्या बचावाची तयारी शासनाची आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी चर्चा करून, अलमाट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याबाबत त्यांना सूचना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानुसार अलमाट्टी धरणातून पाच लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. पडझड झालेली घरं, तसंच अन्नधान्यासाठी सरकार मदत करणार असून, नागरिकांनी घाबरून न जाता, धीर राखण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातून आतापर्यंत सव्वा लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
****
सांगली जिल्ह्यात पूरग्रस्त पलूस जिल्ह्यात बचावकार्य करणारी नाव उलटून चौदा जणांचा मृत्यू झाला. ब्रह्मनाळ इथून सुमारे तीस ते पस्तीस लोकांना घेऊन खटावकडे जाणाऱ्या या नावेच्या पंख्यात झाडाची फांदी अडकून नावेचं संतुलन बिघडून नाव उलटल्याचं, आमच्या वार्ताहरानं सांगितलं. आतापर्यंत चौदा जणांचे मृतदेह हाती लागले असून, शोधकार्य अद्याप सुरू आहे.
****
राज्यात उद्भवलेली पूरस्थिती अभूतपूर्व असून, आपत्ती निवारणात प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. पूरग्रस्त भागात शंभर टक्के कर्जमाफी करण्याची मागणी त्यांनी केली. पूर ओसरल्यावर त्याची भीषणात समोर येईल, सामाजिक तसंच स्वयंसेवी संघटनांनी पूरग्रस्तांना सहकार्य करण्याचं आवाहन पवार यांनी केलं. पूरग्रस्तांना सहकार्य म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी एका महिन्याचं वेतन देणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्हयात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे येळगाव आणि करडी धरण शंभर टक्के भरलं आहे. पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं बुलडाणा चिखली मार्ग बंद होण्याची शक्यता  निर्माण झाली आहे. संग्रामपूर तालुक्यातल्या पाच गावाचा संपर्क तुटला आहे.
****
जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे सर्व एक्केचाळीस दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. धरणातून सध्या सुमारे दीड लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत असून, जिल्हा प्रशासनानं तापी नदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखूर्द धरणाचे ३३ दरवाज़े एक मीटरनं उघडण्यात आले आहेत.
****
अहमदनगर शहराला पाणी पुरवठा करणारं मुळा धरण अठ्ठ्याऐंशी टक्के भरलं आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या दक्षिण भागातले तालुके अजूनही पावसाअभावी कोरडे आहेत. पेरण्या वाया जाण्याची भीती असून, गृह निर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे.
****

वस्तू आणि सेवा कराच्या महसूल संकलनात देशपातळीवर महाराष्ट्र अव्वल असूल, गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या महसूल संकलनात महाराष्ट्रानं १५ टक्के हिस्सा नोंदवला आहे. राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात एक लाख सत्तर हजार कोटी रुपये महसूल संकलित झाला होता, त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण आठ टक्क्यांनी अधिक आहे. करसुलभता, व्यवसायवृद्धी आणि महसूलात वाढ या तिहेरी लाभातून ही कर प्रणाली राज्यात सुदृढ होत असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
****
संसदेच्या दोन्ही सदनांनी मंजूर केलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. लवकरच हे विधेयक राजपत्रात प्रसिद्ध होईल. त्यानंतर निर्धारित नियमावलीच्या आधारे नवीन राष्ट्रीय वैद्यक परिषद स्थापन होईल. पुढच्या सहा महिन्यात ही कार्यवाही पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून पंतप्रधानांच्या भाषणाचं थेट प्रसारण होणार आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या तीन एक दिवसीय सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होईल.
****

No comments:

Post a Comment