Thursday, 15 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.08.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१५ ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 लोकसंख्येचा विस्फोट देशासमोर नवी आव्हानं उभी करत असून भावी पिढ्या तसंच केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यांचा सामना करण्यासाठी उपाय योजन्याची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केलं. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित करताना देशातील प्रगतीचा आढावा घेतला. कलम ३७०मधील तरतुदी रद्द केल्यामुळे देशामध्ये `एक देश एक घटना` ही भावना वृद्धींगत झाल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
***

 नागरिकांनी सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करावं, असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला ते राष्ट्राला उद्देशून बोलत होते. जनतेच्या इच्छा, आशा- आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असल्याचं राष्ट्रपती म्हणाले.
***

 राज्यातून मुद्रात वाहून जाणारं १६७ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजवंदन केल्यानंतर राज्यातील जनतेला संबोधित करताना बोलत होते. विविध योजनांद्वारे राज्य सरकार वंचितांच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 
***

 औरंगाबाद इथं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. नांदेड इथं पालकमंत्री रामदास कदम, जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर, परभणी इथं पालकमंत्री गुलाबराव पाटील, हिंगोली इथं पालकमंत्री अतुल सावे, बीड इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, उस्मानाबाद इथं पालकमंत्री तानाजी सावंत, तर लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
****

 वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू असलेली एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं जिंकली आहे. काल झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं सहा गडी राखून विजय मिळवला. 
*****
***

No comments:

Post a Comment