Tuesday, 21 July 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 21.07.2020....Headline Bulletin


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२१ जुलै २०२० सकाळी ११.०० वाजता
****
मराठवाड्यात आज सकाळपासून पावसानं जोर धरला आहे. जालना शहरासह जिल्ह्यात अंबड तसंच बदनापूर तालुक्यातल्या बहुतांश भागात सकाळी चांगला पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना शहरात सध्याही पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचलं आहे.
नांदेड जिल्ह्यात आज सकाळपर्यंत ८० महसूल मंडळापैकी ३७ महसुली मंडळात पावसाची नोंद झाली आहे. देगलूर तालुक्यातील हाणेगाव इथ सर्वाधिक ११० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून किनवट तालुक्यातल्या जलधरा महसूल मंडळात ६१ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला.
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात हादगांव मंडळात काल रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आला असून नदीकाठच्या सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस, ऊस आदी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाथरी तालुक्यातील वडी शिवारात सोमेश्वर नदीला पूर आल्यानं अनेक गांवाचा संपर्क तुटला आहे.
औरंगाबाद शहर आणि परिसरातही आज सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत आज सकाळी १७९ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण बाधितांची संख्या ११ हजार ४२० झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतले १२३ रुग्णांचा, ग्रामीण भागातल्या ४६ रुग्णांचा आणि नाक्यावरील चाचणीत आढळलेल्या १० रुग्णांचा समावेश आहे.
****
प्रसिद्ध उर्दू शायर शम्स जाल्हनवी यांचं आज पहाटे जालना इथं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. जगभरात अनेक मुशायऱ्यांमध्ये सहभाग नोंदवलेल्या शम्स जाल्हनवी यांनी आपल्या गझलांमधून त्यांनी सत्य परिस्थीतीचं मार्मिक वर्णन केलेलं आहे. त्यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे. जालना इथं आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
****
मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचं आज सकाळी उत्तरप्रदेशाची राजधानी लखनौ इथं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या ११ जूनला त्यांना श्वसन तसंच इतर त्रासांवरच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. टंडन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
****

No comments:

Post a Comment