▼

Wednesday, 5 August 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 05 AUGUST 2020 TIME – 13.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 August 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

****

अयोध्येत श्रीराम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच झालं आहे. या सोहळ्याला उत्तरप्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, यांच्यासह देशभरातून निमंत्रित करण्यात आलेले १७५ विशेष पाहुणे उपस्थित होते. या सोहळ्यासाठी पंतप्रधान हेलिकॉप्टरने अयोध्येत पोहोचले. सर्वप्रथम त्यांनी हनुमानगढी इथं जाऊन हनुमानाचं आणि त्यानंतर रामललाचं दर्शन घेतलं. राममंदिराची उभारणी होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या या मंदिरात राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या बालस्वरुप मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. पंतप्रधानांनी या मंदिरात पूजा केल्यानंतर मंदीर प्रांगणातच पारिजातकाचं झाड लावलं. त्यानंतर रामजन्मभूमी स्थळी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनाचे धार्मिक विधी करण्यात आले.

****

अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातल्या मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा झेंडे लावले असून, रांगोळ्या काढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

****

केंद्रशासित प्रदेश जम्मू कश्मीर इथं येत्या १६ तारखेपासून सर्व धार्मिक स्थळांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे वैष्णव देवी यात्रेलाही १६ तारखेपासून सुरुवात होणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर १८ मे रोजी ही यात्रा थांबण्यात आली होती. 

****

मुंबईत आज पावसाचा जोर कमी झाला असून रस्त्यावरचं पाणी ओसरत आहे. तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. परंतु आजही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

****

रायगड जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी किनारी तसेच समुद्र काठावर असलेल्या नागरिकांनी दक्ष राहावं, असं आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे.

****

रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असून रत्नागिरी तालुक्यातली चांदेराई बाजारपेठ तसंच पूलंही पाण्याखाली गेला आहे. या भागातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे.

****

सांगली जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून जिल्ह्यातल्या जत, आटपाडी, खानापूर, कवठे महांकाळ या दुष्काळी भागातही पावसाने हजेरी लावली आहे. चांदोली परिसरात मागील चोवीस तासात अतिवृष्टीची नोंद झाली. तसंच वारणा धरण ७० टक्के भरले असून यावर वीज निर्मिती सुरू करण्यात आली आहे.

****

देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण हे बाधित होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात दुप्पट झालं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत देशात या आजारानं १२ लाख ३० हजारांहून जास्त रुग्ण बरे झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ६६ पूर्णांक ३० दशांश टक्के इतकं झालं आहे. तर मृत्यू दर दोन पूर्णांक दहा शतांश टक्के इतका झाला आहे. आता पर्यंत दोन कोटी पेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या असल्याचंही सचिव राजेश भूषण यांनी पत्रकारांशी बोलताना सागितलं. देशात कोरोना विषाणू मुळे होणारे पन्नास टक्के मृत्यू हे साठ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींचे असून यात ६८ टक्के पुरूष आणि ३२ टक्के महिला आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी अठ्ठावन्न जणांचा अहवाल कोरोना विषाणू बाधित आला आहे. यात ग्रामीण भागातले ३३ तर महानगर पालिका हद्दीतल्या २५ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातली कोरोना विषाणू बधित रुग्णांची संख्या १५ हजार २०८ इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार ३६८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे झाले असून ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ३ हजार ३४७ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण हा चिंतेचा विषय असल्यानं, आतापर्यंत सत्य समोर यायला हवं होतं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, हे प्रकरण बिहार पोलिसांच्या कार्यकक्षेत येत नसल्यानं, या प्रकरणी त्यांना प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्याचा किंवा तपास करण्याचा अधिकार नाही, असं महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं. केंद्र सरकारने या प्रकरणी आपलं म्हणणं मांडताना, बिहार राज्य सरकारनं केलेली केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयमार्फत चौकशीची मागणी मान्य केल्याचं सांगितलं.

****

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा उदयोन्मुख टेनिटपटू सुमीत नागल याला थेट प्रवेश मिळाला आहे. या स्पर्धेच्या पुरुष एकेरी लढतीच्या आज झालेल्या सोडतीत सुमीतचा या स्पर्धेतला प्रवेश निश्चित झाला. यंदाच्या या स्पर्धेत सुमीत हा एकमेव भारतीय पुरुष टेनिसपटू आहे.

**** 


No comments:

Post a Comment