▼

Thursday, 19 November 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.11.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 November 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ नोव्हेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

·      वीजदेयकं थकवल्यामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम - ऊर्जामंत्री नितीन राऊत.

·      वीजदेयकं माफीसंदर्भात राज्य सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा भाजपचा आरोप. 

·      पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी राज्य सरकार सकारात्मक - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले.

·      राज्यात काल आणखी पाच हजार ११ कोविड बाधितांची नोंद.

·      मराठवाड्यात काल नवे ३८३ रुग्ण तर ९ कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू.  

·      जालन्यातल्या मंठा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवर रिजर्व्ह बँकेचे सहा महिन्यांसाठी निर्बंध.

आणि

·      अंबाजोगाई इथं २५ आणि २६ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं आयोजन.

****

कोविड प्रादुर्भावाच्या काळात वीजदेयकं भरली न गेल्यामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. भाजप सरकारनं आपल्या कार्यकाळात वीज बिलांची वसुली न केल्यानं महावितरणची थकबाकी ५० हजार कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचली होती, कोविड काळात त्यात नऊ हजार कोटी रुपयांनी वाढ होऊन ऑक्टोबर महिन्यात वीज देयकांची थकबाकी एकोणसाठ हजार १०२ कोटी रुपयांवर पोचल्याचं त्यांनी ट्विटरवरून सांगितलं. मार्च २०२० मध्ये घरगुती ग्राहकांकडे असलेली देयकांची थकबाकी एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांवरून चार हजार आठशे चोवीस कोटींवर, व्यावसायिक ग्राहकांची थकबाकी आठशे एकोणऐंशी कोटींवरून एक हजार दोनशे एक्केचाळीस कोटीपर्यंत, तर औद्योगिक ग्राहकांची थकबाकी चारशे बाहत्तर कोटींवरून नऊशे ब्याऐंशी कोटींवर पोहोचल्याचं राऊत यांनी या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.

****

वीजबिल माफीसंदर्भात राज्य सरकार जनतेची फसवणूक करत आहे असा आरोप विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. महावितरणची वीज देयकं अव्वाच्या सव्वा आली असून त्यासंदर्भात भाजप सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा असल्याचं, फडणवीस म्हणाले.

वीज देयक प्रकरणी सत्तारूढ तसंच विरोधी पक्षाच्या सदस्यांची समिती गठीत करण्याची मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. कोविड काळातल्या वीजदेयकांमध्ये सवलत देण्याचं जाहीर केल्यानंतर आता ऊर्जामंत्र्यांनी ग्राहकांना पूर्ण देयकं भरावीच लागतील, असं सांगितलं आहे. हा सरकार पुरस्कृत मोठा घोटाळा असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. ग्राहकांना वीज देयकाबाबत दिलासा द्यावा अशी मागणी करतानाच, याबाबत निर्णय होईपर्यंत राज्यात वीज ग्राहक मेळावे होऊ देणार नाही, असा इशारा दरेकर यांनी दिला

****

मराठा आरक्षणासंदर्भातला अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीनं घटनापीठ स्थापन करण्यात यावं, याकरता राज्य सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात चौथा अर्ज सादर केला. नवी दिल्लीतले सरकारी वकील सचिन पाटील यांनी हा अर्ज दाखल केला. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय पीठानं नऊ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती सरकारनं सरन्यायाधीशांना केली होती. त्यावेळी या अर्जावर लवकरात लवकर विचार केला जाईल, असं सूचित करण्यात आलं होतं, मात्र अद्याप यासंदर्भात निर्णय झाला नाही, म्हणून राज्य शासनाने काल चौथा अर्ज सादर केला.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा २४ नोव्हेंबरला असलेली पंढरपूरची कार्तिकी वारी, यशस्वी व्हावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत विधानभवनात वारीच्या नियोजनासंदर्भात वारकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बोलत होते. मर्यादित संख्येतल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत कार्तिकी वारी करायला परवानगी द्यावी असा प्रस्ताव वारकऱ्यांच्या वतीनं राज्य सरकारला देण्यात आला आहे. वारीदरम्यान वारकऱ्यांना सर्व सोयीसुविधा उपलबध व्हाव्यात, कायदा आणि सुरक्षा राखली जावी यासाठीही राज्य सरकार योग्य नियोजन करेल असा विश्वासही पटोले यांनी वारकऱ्यांना दिला. वारीला जाण्यासाठी फड परंपरेच्या दिंड्यांसाठी वारकऱ्यांशी समन्वय साधून त्यांना एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्याचे निर्देशही पटोले यांनी संबंधितांना दिले.

****

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेच्या प्रभावी संनियंत्रणासाठी पुणे इथल्या पशुसंवर्धन आयुक्तालयात मध्यवर्ती कॉल सेंटर उभारण्यात येणार आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसात मंत्री सुनिल केदार यांनी ही माहिती दिली. हे कॉल सेंटर उभारणीसाठी काल मुंबईत भारत फायनांस इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला, या कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून या केंद्राची कामं करण्यात येणार असल्याचं, केदार यांनी सांगितलं.

****

मुंबई विद्यापीठात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अध्यसन केंद्र सुरु करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. या अध्यसन केंद्रात व्यंगचित्रकला, साहित्य, कला आदी अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा मुंबई विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

****

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गा विषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकांत सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन जालन्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केलं आहे.

****

भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी अटकेत असलेले सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव यांना पुढच्या १५ दिवसांसाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्याची परवनागी मुंबई उच्च न्यायालयानं दिली आहे. राव यांची प्रकृती ढासळली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका त्यांच्या पत्नी हेमला यांनी न्यायालयात दाखल केली होती.

****

भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांना काल सकाळी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि काही वेळानंतर सोडून दिलं. कदम यांनी पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले हत्याकांड प्रकरणी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून, तो दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया कदम यांनी दिली आहे.

****

गोव्याच्या माजी राज्यपाल तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मृदुला सिन्हा यांचं काल पणजी इथं निधन झालं, त्या ७७ वर्षांच्या होत्या. कुशाग्र राजकारणी आणि हरहुन्नरी साहित्यिक अशी ख्याती असलेल्या सिन्हा, ऑगस्ट २०१४ पर्यंत भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य होत्या. २०१४ ते २०१९ या काळात त्या गोव्याच्या राज्यपाल होत्या. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय समाज कल्याण मंडळाचं अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं होतं. सिन्हा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

राज्यात काल आणखी पाच हजार ११ कोविड बाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १७ लाख ५७ हजार ५२० झाली आहे. काल १०० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४६ हजार २०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल सहा हजार ६०८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ३० हजार १११ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ८० हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ७५ टक्के इतका आहे.  

****

मराठवाड्यात काल ९ कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३८३ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात काल चार रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे १३८ रुग्ण आढळले. नांदेड तसंच बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, नांदेडमध्ये नव्या ४३ तर बीडमध्ये नव्या ६५ रुग्णांची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर १३ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात काल नवे ५६, जालना ४५, उस्मानाबाद २० तर हिंगोली जिल्ह्यात काल नवे तीन रुग्ण आढळले.

****

मुंबईत काल आणखी ८७१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर १६ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ६६६ नवे रुग्ण, तर १९ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ४६५ रुग्ण आढळले, तर सात जणांचा मृत्यू झाला.

सोलापूर जिल्ह्यात २४८, सातारा १३०, भंडारा ११४, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येकी ७८, रत्नागिरी ६१, बुलडाणा ५५, सांगली ४९, पालघर २६, सिंधुदुर्ग १३, तर वाशिम जिल्ह्यात नव्या ११ रुग्णांची नोंद झाली.

****

जालन्यातल्या मंठा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवर रिजर्व्ह बँकेनं सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. यानुसार बँकेला परवानगी शिवाय कोणतेही कर्ज वाटप करता येणार नाही. जुन्या कर्जांचं नूतनीकरण तसंच कोणतीही गुंतवणूक करायला देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. १७ नोव्हेंबरपासून पुढचे सहा महिने हे निर्बंध लागू राहणार आहे. दरम्यान, या बँकेत गुंतवणूक केलेली रक्कम परत देण्याची मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे.

****

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं प्रस्थापितांविरोधात वंचित उमेदवाराला संधी दिली असल्याचं, आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते. ज्यांना त्यांच्यावर अन्याय झाला असे वाटत असेल, त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहावे, आम्ही त्यांना न्याय देऊ, असं आंबेडकर यावेळी म्हणाले. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं नागोराव पांचाळ यांना उमेदवारी दिली आहे.  

****

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतले अपक्ष उमेदवार डॉ. विलास तांगडे यांनी विभागातल्या पदवीधरांच्या अकराशे समस्या मांडल्या आहेत. निवडणुकीतल्या इतर उमेदवारांना या समस्यांवर चर्चा करण्याचं आव्हान तांगडे यांनी दिलं आहे. प्राध्यापक भरती, पदवीधर ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मराठा, धनगर, इतर मागासवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातल्या पदवीधरांना शिष्यवृत्ती, मराठा समाजातल्या तरुणांना फेलोशिप, आदी प्रश्नांकडे तांगडे यांनी लक्ष वेधलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात हपसापूर इथं एका शेतातून गांजाची एकूण ३४५ झाडे हट्टा पोलिसांनी जप्त केली आहेत. नामदेव सूर्यभान सवंडकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजाची अंदाजे दोन क्किंटल वजनाची ३४५ झाडं जप्त केली, या गांजाची किंमत सुमारे २१ लाख ८७ हजार २०० रुपये असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद इथले पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी नागरिकांना कोविडपासून बचावासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं २५ आणि २६ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात यंदाचे यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, कृषी उद्योजक चंद्रशेखर कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका रेखा बैजल, गायिका सरोजिनी देशपांडे आणि दिव्यांग युवक योगेश खंदारे यांना प्रदान केले जाणार आहेत. या महोत्सवाच्या संगीत सभेत प्रसिद्ध गायक कृष्णा बोंगाणे आणि अंकिता जोशी हे दिवंगत शास्त्रीय गायक पं. जसराज यांना संगीतमय श्रद्धांजली म्हणून 'जसरंगी जुगलबंदी' सादर करणार आहेत. या समारोहाचं हे ३५ वं वर्ष आहे.

****

२३ तारखेपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिक्षक तसंच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शाळेत येण्यापूर्वी कोरोना विषाणू चाचणी करून घेणं अत्यावश्यक आहे, यासाठी जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महापालिका रुग्णालय याठिकाणी चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परभणी शहर महानगरपालिकेच्यावतीनं शिक्षकांची मोफत चाचणी करण्यात येत आहे.

****

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत इथले माजी आमदार मुंजाजीराव जाधव यांच्या पत्नी निर्मला जाधव यांचं काल निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. सर्वोच्च न्यायालयातले विधिज्ञ तथा भाजपचे हिंगोली जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्या त्या मातोश्री होत.

****

No comments:

Post a Comment