Thursday, 17 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 17.10.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 December 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

·      साखर निर्यातीवर ऊस उत्पादकांना साडे तीन हजार कोटी रुपये अनुदान; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय; ५ हजार ३६१ कोटी रुपयांचा पहिला हप्ता, आठवडाभरात थेट बँक खात्यात जमा होणार.

·      कोविड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांचं निवारण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी.

·      जलजीवन मिशनचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कालबध्द नियोजन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना.

·      केंद्राच्या योजना महाराष्ट्रात योग्यरित्या राबवल्या जात नसल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका.

·      संजय गांधी तसंच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थींना उत्पन्नाचा दाखला सादर करण्यास सूट.

·      राज्यात चार हजार ३०४ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या २५६ रुग्णांची नोंद.

आणि

·      ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांना ‘अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठान’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर.

****

साखरेच्या सुमारे ६० लाख टन अतिरिक्त साठ्याच्या निर्यातीवर, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साडे तीन हजार कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे, काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सहा हजार रुपये प्रतिटन या दराने अनुदानाच्या रकमेचा ५ हजार ३६१ कोटी रुपयांचा पहिला हप्ता, आठवडाभरात शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार असल्याचं, जावडेकर यांनी सांगितलं. पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी तसंच पाच लाख कामगारांना याचा लाभ होणार असल्याचं, ते म्हणाले. यंदा देशात ३१० लाख टन साखरेचं उत्पादन होणार आहे, देशातली साखरेची मागणी २६० लाख टन राहण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळानं स्पेक्ट्रम लिलावाच्या पुढच्या टप्प्यालाही काल मंजुरी दिली. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. या संदर्भातली सूचना याच महिन्यात जारी होणार असून, लिलाव प्रक्रिया मार्च महिन्यात होणार आहे.

****

कोविड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांचं निवारण करण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार लसीकरणाच्या प्रत्येक सत्रात मर्यादित नागरिकांना लस दिली जाईल, तसंच लसीकरणानंतर प्रत्येकाला किमान अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. लसीकरणानंतर काही प्रमाणात प्रतिकूल परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती स्तरावर प्रत्येक गटात एक दुष्परिणाम निवारण केंद्र स्थापन करण्याचे आदेश, राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, समुदाय आरोग्य केंद्र तसंच खासगी आरोग्य सेवा केंद्रांनाही, अशा प्रकरणांमध्ये वैद्यकीय सेवा देण्यास तत्पर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

****

जलजीवन मिशनचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कालबध्द नियोजन करण्याची सूचना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल या अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. पाण्याचे नियोजन करत असताना, नैसर्गिक तसंच कृत्रिम पाणीसाठ्यांबाबतचा जल आराखडा तयार करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. नांदेड, लातूर, जालन्यासह राज्यातल्या १४ जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, या बैठकीत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

राष्ट्रीय पेयजल योजनेतल्या तीन हजार ४०० योजना अद्याप अपूर्ण आहेत, त्या प्राधान्यानं पूर्ण करण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. जीवनावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला इतर कोणत्याही कामासाठी नियुक्त करू नये, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

****

केंद्र सरकारच्या अनेक योजना महाराष्ट्रात योग्यरित्या राबवल्या जात नसल्याची टीका, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पंतप्रधानांच्या महत्त्वकांक्षी ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेतून, काल मुंबईत आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीत देशात महाराष्ट्राचा १७ वा क्रमांक आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. फेरीवाल्यांसाठी केंद्रशासनाची चांगली योजनाही राज्यात योग्य प्रकारे राबवली जात नसल्याचं ते म्हणाले. केंद्राच्या या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केलं.

उस्मानाबाद इथं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र, प्रतिष्ठान भवन इथं सुरु करण्यात आलं. मुंबईतल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण या ठिकाणी करण्यात आलं. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत, उस्मानाबाद जिल्ह्यात फेरीवाले तसंच पदपथविक्रेते अशा १६० गरजू लोकांना लाभ मिळवून देण्यात आला आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी केलं आहे. 

****

मुंबईत कांजूरमार्ग इथं सुरू केलेल्या मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण- एमएमआरडीएला दिले आहेत. काल या प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, या ठिकाणचा भूखंड आहे त्या स्थितीत ठेवण्यासह जागेच्या हस्तांतरणावरही स्थगिती आणली आहे. राज्य सरकारनं मेट्रो-३ ची कारशेड आरेतून कांजूरमार्ग इथं हलवण्याचा निर्णय घेताच, केंद्र सरकारनं कांजूरमार्गच्या या जागेवर मालकी हक्क दाखवला होता. एका बांधकाम व्यावसायिकानेही ती जागा आपण मिठागराकडून भाडे तत्त्वावर काही वर्षांपूर्वी घेतलेली असून, एमएमआरडीएने मेट्रो कारशेडसाठी सुरू केलेलं खोदकाम तत्काळ थांबवण्याची नोटीस, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांना पाठवली आहे.

****

सुधारित कृषी कायद्यांबाबत तीन दिवसांत निर्णय न घेतल्यास, महाराष्ट्रातूनही आंदोलनाचा इशारा, अखिल भारतीय किसान सभेनं दिला आहे. संघटनेचे सरचिटणीस अजित नवले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना ही भूमिका स्पष्ट केली. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप नवले यांनी केला.

****

दरम्यान, सुधारित कृषी कायद्यांबाबत आंदोलक शेतकऱ्यांकडून येणाऱ्या चांगल्या सूचना स्वीकारण्यास तयार असल्याचं, केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यात यश मिळेल, अशी आशाही सरकारनं व्यक्त केली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच असल्याचं, सांगितलं आहे.

****

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, लाभार्थींना मार्च २०२१ पर्यंत, उत्पन्नाचा दाखला सादर करण्यास सूट देण्यात आली आहे. कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत असल्याचं, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं. या बाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे संजय गांधी निराधार, श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन यांसारख्या अनेक योजनांच्या लाभार्थींना, यावर्षी उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयात सादर करावा लागणार नाही.

दरम्यान, भारतीय संविधानाचं ब्रेल लिपीत रुपांतर करुन ते अंध बांधवांना उपलब्ध करुन देण्याचं काम मोलाचं असल्याचं, धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ठाणे इथल्या अस्तित्व फाऊंडेशन या अशासकीय संस्थेनं ब्रेल संविधान तयार केलं असून, याचं प्रकाशन मुंडे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. विभागाने दिव्यांगांसाठी नुकत्याच सुरू केलेल्या महाशरद पोर्टलची माहितीही मुंडे यांनी यावेळी दिली.

****

राज्यात काल चार हजार ३०४ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ८० हजार ८९३ झाली आहे. काल ९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४८ हजार ४३४ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५८ शतांश टक्के इतका आहे. काल चार हजार ४७८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ६९ हजार ८९७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक एक दशांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ६१ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २५६ रुग्णांची नोंद झाली.

बीड जिल्ह्यात दोन, तर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल ८७ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात ४५, नांदेड ४०, बीड ३८, उस्मानाबाद १८, जालना १५, परभणी नऊ, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवीन चार रुग्ण आढळले.

****

उस्मानाबाद इथले प्रसिद्ध डॉ. एस.एस.अख़लाक़ यांचं काल निधन झालं, ते ८६ वर्षाचे होते. अत्यल्प शुल्कात रुग्णांना तपासून इंजेक्शन तसंच औषधं देणारे डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती. निष्णात डॉक्टरकडून तपासणी केल्यानंतरही सल्ला घेण्यासाठी शेकडो रुग्ण अद्यापही डॉ अख़लाक़ यांची भेट घेत असत. त्यांच्या या रुग्णसेवेबद्धल उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघानं, उस्मानाबाद भूषण हा पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला होता.

****

नागपूर इथल्या अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानचे पत्रकारिता पुरस्कार काल जाहीर झाले. ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार समितीचे कार्याध्यक्ष डॉ. आशिष देशमुख यांनी काल नागपुरात ही घोषणा केली. एक लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र, असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. पत्रकारिता पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांमध्ये औरंगाबाद इथले ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचा समावेश आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अनेक प्रलंबित मात्र महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी, अशी मागणी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, कौडगाव औद्योगिक वसाहतीत टेक्निकल टेक्सटाईल हब उभारणं, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं केंद्र सरकारला सादर करणं, सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्ग, यासह अनेक मुद्दे प्रलंबित असल्याकडे, पाटील यांनी या निवेदनातून लक्ष वेधलं. हे सर्व प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती पाटील यांनी विधानसभाध्यक्षांकडे केली आहे

****

नांदेड जिल्हा परिषदेनं ६३ अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेतलं आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी काल याबाबतची नियुक्तीपत्रं या सर्वांना प्रदान केली. यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार पशुधन पर्यवेक्षक- १, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक- १, अंगणवाडी पर्यवेक्षीका- २, वरिष्ठ सहाय्यक लेखा- ४, आरोग्य सहाय्यक पुरुष- १४, ग्रामसेवक - ५ तर ३६ परिचरांचा समावेश आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन उस्मानाबादचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ धनंजय पाटील यांनी केलं आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात मासोळी नदीसह इतर प्रमुख नद्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधावेत, तसंच पाझर तलावाची कामं हाती घेण्याची मागणी, गंगाखेडचे  आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी, राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांच्याकडे केली आहे. या मागणीचं पत्र आमदार गुट्टे यांनी गडाख यांच्याकडे सादर केलं.

****

शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांना एक वर्षासाठी कर माफी मिळावी, तसंच कर्जाचे हप्ते आणि व्याज माफ व्हावं, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी महासंघानं केली आहे. या मागण्यांना पाठिंबा देणारं एक निवेदन अहमदनगर जिल्हा विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना सादर करण्यात आलं आहे. या वाहनांना सार्वजनिक वाहतुकीस परवानगी द्यावी, विमा हप्त्यात सवलत मिळावी, आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत ‘हर घर - नल से जल’ या योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या उपक्रमात गावस्तरावरील पदाधिकारी तसंच ग्रामस्थांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर काल धडक कारवाई करण्यात आली, काल दिवसभरात २८ जीप पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्याची आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिकेनं ‘लव्ह औरंगाबाद’ अभियानांतर्गत घेतलेल्या छायाचित्रण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. प्रथम पुरस्कार डॉ. अजिंक्य मिस्त्री यांनी पटकावला असून, दुसरा पुरस्कार संतोष राखेमल्लू यांनी तर तिसरा पुरस्कार, करिष्मा साहुजी यांनी पटकावला आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या छायात्रिकारांना मनपा स्वच्छता कर्मचारी सफाई काम करताना, किंवा स्वच्छतेशी संबंधित कोणतेही काम करतानाचं छायाचित्र काढणं आवश्यक होतं. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन तसंच नागरीकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज ॲडलेड इथं खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments:

Post a Comment