Friday, 19 August 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.08.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१९ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा रात्री १२ वाजता जल्लोषात साजरा झाला. त्यानंतर आज राज्यभर दहीहंडी उत्सव रंगणार आहे. राज्य सरकारने दहीहंडीसह सार्वजनिक सण निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोविंदांचा आनंद द्विगुणित झाला आहे. मुंबईत उंचच उंच मानवी मनोरे उभारण्याची स्पर्धा सकाळपासून सुरू झाली आहे.

दरम्यान, दहीहंडी कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत, अशी घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील.

****

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळकाला,  दहीहंडीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दहीहंडी साजरी करताना मंडळे आणि गोविंदांनी सुरक्षेची सर्व काळजी घ्यावी,  असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

देशातल्या पहिल्या वातानुकूलित डबलडेकर इलेक्ट्रिक बसचं उद्घाटन काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईत झालं. देशात ३५ टक्के प्रदूषण हे डिझेल आणि पेट्रोलमुळे होतं, त्यामुळे वाहतुकीसाठी पारंपरिक इंधनाव्यतिरिक्त इतर इंधनांचा वापर करण्याला आपलं प्राधान्य हवं, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. प्रदूषणाला आळा बसावा तसंच आयात इंधन तेलावरचं अवलंबित्व कमी व्हावं, यादृष्टीनं पर्यायी इंधनाचा वापर गरजेचा आहे, असं ते म्हणाले.

****

केंद्रीय दूरसंचार विभागानं `फाईव्ह जी` सेवेसाठीच्या स्पेक्ट्रमचं वितरण दूरसंचार कंपन्यांना केलं आहे. आता दूरसंचार कंपन्यांनी लवकरात लवकर `फाईव्ह जी` सेवा सुरू करण्याची तयारी करावी, असं आवाहन केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. पुढच्या महिन्यापर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

****

पंडित नाथ नेरळकर यांच्या जयंतीनिमित्त काल औरंगाबाद इथं संगीत महोत्सव पार पडला. जालन्याची उदयोन्मुख गायिका अंजली काजळकर, पंडित नेरळकरांचे शिष्य डॉ. अमोघ जोशी, आणि युगंधरा केचे यांचं यावेळी गायन झालं.

****

मराठवाड्यात काल ३३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात औरंगाबाद जिल्ह्यातल्या दहा रुग्णांचा समावेश आहे.

****

No comments:

Post a Comment