Thursday, 18 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 18.08.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१८ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

आरोग्य, पोषण, शिक्षण आणि निर्यात या परिमाणांच्या कसोटीवर आकांक्षी जिल्हा कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. आकांक्षी जिल्हा कार्यक्रमामुळे लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन झाल्याचं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण २०२२ या दोन दिवसीय परिषदेचा आज होणार समारोप होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. 

****

देशात चित्त्यांचा अधिवास पुन्हा नव्यानं निर्माण व्हावा यासाठी सरकारनं प्रोजेक्ट चित्ता हा महत्त्वकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. पर्यावरण रक्षणाच्या जागतिक संघटनेनुसार नष्टप्राय झालेली चित्त्याची ही प्रजाती पुन्हा नव्याने स्थापित करण्याचा प्रयत्न देशात चालू झाला आहे. यासंदर्भात नामेबिया देशाशी करार करण्यात आला असून दक्षिण आफ्रिकेबरोबरचा करार लवकरच आकारास येत आहे.

****

नांदेड स्थानकावरून सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी सुटणारी हुजूर साहिब नांदेड ते श्रीगंगानगर एक्सप्रेस गाडी आज पाच तास उशिरा, म्हणजे सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे .

****

जालना जिल्ह्याच्या परतूर इथल्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यास एक लाख रुपयाची लाच घेताना काल पकडण्यात आलं. गजानन सोनकांबळे असं या अधिकार्याचं नाव असून, शेडनेटचं अनुदान देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे चार फुटानं उघडण्यात आले असून, ७५ हजार ४५६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपत्रात सोडण्यात येत आहे. पैठण शहरालगर नदीपत्रालगत असलेल्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज झिम्बाब्वेमधल्या हरारे इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी बारा वाजून ४५ मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments:

Post a Comment