Saturday, 17 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 17.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१७ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच भाजपच्या अन्य नेत्यांकडून महापुरुषांबद्दल कथित आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं आज मुंबईत महामोर्चा काढला जाआहे. भायखळा इथल्या रिचर्डसन कुडास कंपनी, जे. जे. मार्ग ते आझाद मैदान असा हा मोर्चा आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षातले सर्व नेते, सामाजिक संस्था, संघटना या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. या महामोर्चासाठी ३१७ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, राज्य पोलिस बल, दंगल नियंत्रण पथक, अशी एकूण ३० पथकं तैनात करण्यात आली आहे.

****

बिहार राज्यातल्या सारन जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्यानं मरण पावलेल्यांची संख्या आता ५९ झाली आहे. या दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगांन बिहार सरकारला नोटिस बजावली आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपशीलवार अहवाल ४ आठवड्याच्या आत सादर करावा, असे निर्देश आयोगानं दिले आहेत.

****

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज म्हणजेच डिक्कीतर्फे काल मुंबईत स्टँड अप इंडियाअंतर्गत स्वावलंबन संकल्प अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. देशहितासाठी नवीन उद्योजक निर्माण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेऊन कार्य करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. उद्योजक निर्मितीसाठी डिक्कीने नवीन धोरण तयार प्रस्ताव शासनाकडे पाठवावा; शासन त्याला सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

****

राज्य सरकारने तृतीयपंथियांना पोलिस भरती प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी सामाजिक आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड शहरातून एका उच्च शिक्षित तृतीयपंथीयाने काल अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवशी पोलिस भरतीसाठी अर्ज केला. तृतीयपंथियांसाठी काम करणाऱ्या कमल फाउंडेशनने सर्वच कागदपत्रांची पूर्तता करत त्याला अर्ज भरण्यासाठी सहकार्य केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर कृषी कार्यालयात कार्यरत कृषी पर्यवेक्षकाला काल तीन हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. श्यामकुमार काळे असं त्याचं नाव असून, पॉवर ट्रिलरसाठी केलेल्या अर्जावर कृषी विभागाकडून मंजुरी घेऊन देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

//*********//

No comments:

Post a Comment